‘देहली सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करणार्या कु. मनीषा माहुर यांचा कार्तिक कृष्ण अष्टमी (५.१२.२०२३) या दिवशी २९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे मी श्री गुरूंच्या पावन चरणी अर्पण करते.
कु. मनीषा माहुर हिला २९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. व्यवस्थितपणा
मनीषाताईंचे सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले असते आणि त्यांचे रहाणेही अगदी नीटनेटके आणि व्यवस्थित असते.
२. साधनेची ओढ
मनीषाताईंना १२ वीच्या परीक्षेत पुष्कळ चांगले गुण मिळाले होते; परंतु त्यांनी ते सर्व सोडून एवढ्या लहान वयात पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यावर त्यांनी सर्व गोष्टी शिकून घेतल्या. आता त्या दायित्व घेऊन सेवा करत आहेत.
३. तत्त्वनिष्ठ राहून चुका सांगतांना ‘चांगली सेवा कशी करायची ?’, तेही शिकवणे
गुरुकृपेने मला मनीषाताईंच्या समवेत स्मरणिकेच्या संरचनेची सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्याकडून संरचनेच्या सेवेत काही चुका होत होत्या. मनीषाताई मला तत्त्वनिष्ठतेने त्या चुका सांगत होत्या. त्याच समवेत त्या ‘चांगले कसे करू शकतो’, हेही मला शिकवत होत्या.
४. साधिकेला स्वतःहून साहाय्य करणे
मला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असल्यामुळे काही वेळा मी दिलेल्या वेळेत सेवा करायला जाऊ शकत नाही. तेव्हा मनीषाताई स्वतःहून माझ्याकडे येतात आणि ‘मला काय त्रास होत आहेत ?’, हे विचारून ‘त्यावर कुठले नामजपादी उपाय करायचे ?’, हे त्या पुढे विचारून घेतात. त्या मला ते नामजपादी उपाय करायला प्रोत्साहन देतात.
५. मनीषाताईंमुळे ‘नामजपादी उपाय केल्यानंतर सेवेची फलनिष्पत्ती वाढते’, हे गुरुकृपेने अनुभवता येणे
मला सेवा करतांना आध्यात्मिक त्रास होतो, तेव्हा मनीषाताई मला नामजपादी उपाय करायला सांगतात. ‘नामजपादी उपाय केल्यानंतर सेवा केली, तर सेवेची फलनिष्पत्ती वाढते’, हे मला गुरुदेवांच्या कृपेने अनुभवता आले. या प्रसंगातून ईश्वराने उपायांचे महत्त्व माझ्या लक्षात आणून दिले.
६. दायित्व घेऊन सेवा करणे
मनीषाताई काही नित्य सेवा आणि प्रासंगिक सेवा, उदा. ‘स्मरणिका संरचना (फॉर्मेटिंग) अंतिम करणे’, अशा अनेक प्रकारच्या सेवा दायित्वाने करतात.
७. स्थिर असणे
मनीषाताईंकडे अनेक सेवा असूनही त्या कुठलीही सेवा करतांना स्थिर असतात. ऐन वेळी एखाद्या साधकाला काही अडचण आली किंवा ऐन वेळी एखादी सेवा आली, तरी मनीषाताई स्थिर राहून ती सेवा स्वीकारून करण्याचा प्रयत्न करतात.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान !’ या सुवचनानुसार गुरुदेवांच्या कृपेमुळे मनीषाताईंमधील अनेक गुणांच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांना शिकता येते. यासाठी मी परम कृपाळू गुरुदेवांच्या श्री चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्री गुरुचरणी,
सुश्री (कु.) पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२३)