सनातन धर्माला विरोध केल्यामुळेच काँग्रेसचा पराभव !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांचा काँग्रेसला घरचा अहेर !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम्

नवी देहली – भारत भावनाप्रधान देश आहे. सनातन धर्माला केलेल्या विरोधामुळे काँग्रेस पक्ष बुडाला. आम्ही सनातन धर्माला विरोध केल्यामुळे पराभूत झालो, यात तथ्य आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांनी ३ राज्यांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून पक्षाला घरचा अहेर दिला आहे. ते ए.एन्.आय. वृत्तसंस्थेशी संवाद साधतांना बोलत होते.

प्रमोद कृष्णम् यांनी मांडलेली सूत्रे !

जातीयवादाच्या राजकारणाला या देशाने कधीही स्वीकारले नाही !

जातीयवादाच्या राजकारणाला या देशाने कधीही स्वीकारले नाही. ६ सप्टेंबर १९९० या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत भाषण केले. ते एकदा सर्वांनी ऐकले पाहिजे. हा देश जर जातीयवादी असता, तर माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंह यांना घरोघरी पुजले गेले असते. त्यांनी मंडल आयोगाची कार्यवाही करून जातीचे राजकारण केले. त्यांच्यापेक्षा मोठा जातीयवादी दुसरा कुणी नाही; पण त्यांची अवस्था काय झाली?, हे संपूर्ण देशाने पाहिले.

लवकरच काँग्रेसची वाटचाल एम्.आय.एम्.सारख्या पक्षाच्या दिशेने होईल !

हा काँग्रेसचा पराभव नाही, हा डाव्या विचारसरणीचा पराभव आहे. मागच्या काही दिवसांपासून डाव्या विचारसरणीचे लोक काँग्रेसमध्ये शिरले आहेत. काँग्रेसच्या अनेक निर्णयांवर या डाव्या नेत्यांनी प्रभाव टाकलेला आहे. हे काही नेते काँग्रेसला म. गांधी यांच्या मार्गावरून हटवून साम्यवादी मार्गावर नेत आहेत. काँग्रेस पक्ष म. गांधी यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत येथपर्यंत पोचला आहे. म. गांधी यांच्या सभेचा प्रारंभ ‘रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला ‘सनातन धर्माच्या विरोधतील पक्ष’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने अशा साम्यवादी नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही, तर काँग्रेसची अवस्था लवकरच एम्.आय.एम्. या पक्षासारखी होईल.

काँग्रेसला सनातनचा शाप लागला !

काँग्रेसच्या नेतृत्वाला गंभीरपणे विचार करावा लागेल. काँग्रेसला म. गांधी, नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची काँग्रेस राहू द्यावे लागेल. काँग्रेसला मार्क्स (साम्यवादाचा जनक) याच्या विचारांकडे जे नेते नेऊ पहात आहेत, त्यांना लवकर बाजूला करावे लागेल. ज्या राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्या राज्यांतील उत्तरदायींनी त्वरित त्यागपत्र द्यावे. जर त्यांच्यात लाज उरली असेल, तर त्यांनी स्वतःहून तात्काळ त्यागपत्र दिले पाहिजे. काँग्रेसला सनातनचा शाप लागला आहे.