ओझर (पुणे) येथे चालू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील संत आणि मान्यवर यांचे विचारधन !
ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्याकडे विविध शासकांनीही मंदिरे उभारली. मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रकारची साहाय्यता केली. आजच्या विज्ञानयुगातही मंदिराकडील लोकांचा ओढा लक्षणीय आहे. आज कुठल्याही जातीचा, पक्षाचा, गटाचा, संघटनेचा, भाषेचा हिंदू असला, तरी तो मंदिरातच संघटित होतो. सर्व भेद विसरून हिंदू केवळ मंदिरात देवतेला शरण जातो. मंदिराच्या माध्यमातून समाजाला बांधून ठेवण्याची जी प्रक्रिया होते, त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्महिंदूंचे कर्महिंदूंमध्ये रूपांतर करण्याचे महत्कार्य केवळ मंदिराच्या माध्यमातून होऊ शकते. एकूणच मंदिरे ही केवळ ‘धर्मस्थळे’ नाहीत, तर ती एक ‘संस्कृती’ आहे. ‘मंदिरे ही धर्मकार्याचे अभियान आहेत’, या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे.
देवतांचा सन्मान न झाल्यास विज्ञानालाही पराजय मान्य करावा लागतो ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
देवतांचा सन्मान न झाल्यास विज्ञानालाही पराजय मान्य करावा लागतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे उत्तराखंड येथील बोगद्यामध्ये अडकलेले ४१ कामगार सुरक्षितपणे बाहेर येणे होय. बोगद्याचे काम चालू असतांना तेथील बाबा बौखनाग यांचे मंदिर पाडण्यात आले; मात्र ३ वर्षे उलटूनही त्याची पुनर्स्थापना झाली नाही. ऑस्ट्रेलिया येथून आलेले बोगदातज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनीही बाबा बौखनाग यांना शरण जाऊन, प्रार्थना करून त्यांच्या कामाला प्रारंभ केल्यानेच त्यांना यश आले. त्यामुळे वैज्ञानिकांनाही देवाला शरण जावे लागले. भारतातील राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ मध्ये समानतेच्या संदर्भात विवेचन आहे, अनुच्छेद २५ मध्ये भारतियांंना धर्मस्वातंत्र्यांचा अधिकार देण्यात आला आहे. अनुच्छेद २६ मध्ये धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पहाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. असे असतांना सरकार या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या विरोधात जाऊन हिंदु मंदिरांचे नियंत्रण स्वत:कडे ठेवत आहे. तरी या सरकारीकरणाच्या विरोधात आपल्याला लढ्याची तीव्रता वाढवावी लागेल.
…तर पुढील परिषद राष्ट्रीय पातळीवर घ्यावी लागेल ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
काही कालावधीत चालू झालेले मंदिर विश्वस्तांचे अधिवेशन सद्यःस्थितीत राज्यव्यापी झाले आहे. या परिषदेला ६३४ विश्वस्तांनी नोंदणी केली आणि शेकडो विश्वस्त उपस्थितही राहिले आहेत. धर्मकार्यात विश्वस्तांचा असाच सहभाग लाभला, तर पुढील मंदिर-न्याय परिषद राष्ट्रीय पातळीवर घ्यावी लागेल. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमधील गुहा येथील श्री कानिफनाथ देवस्थानात घुसून धर्मांधांनी भाविकांना मारहाण केली. यापूर्वी मंदिरांना कुणी वाली नव्हता; परंतु आता विश्वस्त संघटित झाले आहेत. यापुढे या संघटनेच्या माध्यमातून मंदिरांच्या समस्या सोडवल्या जातील.
मंदिरांवरील इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात एकीचे बळ आवश्यक ! – बबनराव मांडे, विश्वस्त, विघ्नहर देवस्थान, ओझर
सर्व देवभक्तांनी एकत्र येणे, हा ऐतिहासिक क्षण आहे. मंदिर म्हणजे ‘देवालय’, म्हणजेच ‘भगवंताचा साक्षात् वास असणारे ठिकाण’ होय. त्यामुळे आपले दायित्वही मोठे आहे. मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंची परंपरा आणि संस्कृती जतन केली जाते. पुढील काळात मंदिरांवरील इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात आपल्याला एकीचे बळ वाढवावे लागेल. यासह मंदिर रक्षण करणार्यांनी एकमेकांचे कार्य समजून घेतले पाहिजे.
मराठी सनातन पंचांग २०२४ च्या ‘अँड्रॉइड’ आणि ‘आय्.ओ.एस्.’ अॅपचे लोकार्पण !या वेळी मराठी सनातन पंचांग २०२४ च्या ‘अँड्रॉइड’ आणि ‘आय्.ओ.एस्.’ अॅपचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. |
मंदिर परिषदेसाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचा संदेशपरिषदेच्या आयोजनातून हिंदु धर्म संघटित करण्यासाठी मोलाचे कार्य करू शकेल ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधामद्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेस आम्हास निमंत्रित करण्यात आले. त्याविषयी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीज यांच्या वतीने आपले अभिनंदन करण्यात येत आहे. या परिषदेचे आयोजन वर्तमान स्थितीमध्ये हिंदु धर्म संघटित करण्यासाठी मोलाचे कार्य करू शकेल, असा आत्मविश्वास वाटतो. या परिषदेमध्ये हिंदु धर्म संघटित होण्याच्या दृष्टीने जे विषय निवडलेले आहेत, त्यावर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घ्यावेत. हिंदु धर्माची मंदिरे आणि त्यांचे विश्वस्त शासनाने प्रशासक नेमून स्वत:च्या कह्यात ठेवलेले आहेत. हे अयोग्य असून आमचे मंदिर, मठ, आश्रम संबंधित विश्वस्तांच्या किंवा भक्तांच्या कह्यात दिले पाहिजे. यासाठी सर्वच आध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांनी एकत्रित येऊन हा लढा उभा केला पाहिजे अन् रचनात्मक, तसेच संघटनात्मक कार्य करून अन्यायाला वाचा फोडायला पाहिजे. हे कार्य विस्तीर्ण होण्यासाठी यामध्ये भक्तगण, संप्रदाय, मंदिरांचे पुरोहित, विश्वस्त मंडळे याशिवाय हिंदु धर्माचे हितचिंतक आदी मंडळींचे जनजागरण करून या कार्याला जोडून घेतले पाहिजे. १. भारतातील हिंदु मंदिरांचे पावित्र्य, संस्कार, संस्कृती, अध्यात्म कायम ठेवण्यासाठी वस्त्रसंहितेची नितांत आवश्यकता आहे. मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी तुटपुंजी वस्त्रे परिधान करणे संस्कृतीला शोभनीय नाही. यासमवेतच सर्वांच्या विचाराअंती वस्त्रसंहिता ठरवावी. जी पुरातन असणार नाही आणि जी ‘फॅशन’च्या नावाखाली तेथे असलेल्या भाविकांच्या मनाला लज्जा निर्माण करेल अशीही असता कामा नये. अशा प्रकारे वस्त्रसंहिता ठरवावी आणि ती सर्वच मंदिर, आश्रम, मठाच्या व्यवस्थापनाने पाळावी. २. मंदिरांतील धर्मपरंपरांचे आणि प्राचीन धार्मिक संस्थानचे रक्षण करण्यासाठी, तसेच धर्मविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी सर्वच ईश्वरप्रेमी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हिंदु बांधवांना धार्मिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. आपल्या प्रथा-परंपरा, व्रत-वैकल्ये, सण इत्यादी गोष्टींमध्ये सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक दृष्टीकोन काय आहेत ? याविषयीचे मार्गदर्शन धार्मिक शिक्षणातून देता आले पाहिजे. यांची संहिता बनवून प्रत्येक मंदिर, मठ, आश्रमांमध्ये ही सुविधा उपलब्ध असली पाहिजे. ३. धर्माचे रक्षण ही काळाची आवश्यकता आहे, हे ओळखून सर्व संप्रदायाच्या, मठ, मंदिर, आश्रम यांनी एकत्र येऊन हिंदु धर्माचे संवर्धन आणि जतन करावे. पीठ देवतेचे आशीर्वाद या कार्यात आपल्या पाठीशी असतील. ‘हिंदु धर्म खतरेमें है, सभी हिंदुआें में एकता हो ।’, या घोषणेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यातच हिंदूंचे सौख्य दडलेले आहे. आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परिषदेस उपस्थित रहाता येत नाही; म्हणून संदेशाद्वारे आमचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पाठवत आहोत. |