‘मुंबई पोलिसांमध्ये काही असे पोलीस अधिकारी होते जे ‘एन्काऊंटर’(गुन्हेगारांशी सामना करतांना पोलिसांना त्यांना स्वरक्षणासाठी ठार करावे लागणे)च्या नावाखाली थंड डोक्याने गुन्हेगारांना ठार करत १ मासाला १ कोटी रुपयांची कमाई करत होते’, असा खुलासा स्पष्टपणे माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काही दिवसांपूर्वी केला. ‘मी माझी १ मासाची १ कोटी रुपयांची हानी करून घेत आहे’, असे त्या वेळी २ महत्त्वाच्या अधिकार्यांनी मला सांगितले होते, असे बोरवणकर यांनी म्हटले आहे. शासकीय कार्यालयाप्रमाणे पोलीस खातेही कसे भ्रष्टाचाराने बजबजले आहे, याचे हे पुराव्यासहित समोर येणारे एक उदाहरण आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकार्याने असे वक्तव्य केल्यानंतर त्यावर कुणाकडूनही काहीही प्रतिक्रिया आलेली नाही ! अर्थात् बोरवणकर ज्या संदर्भाने बोलल्या त्या घटनांनाही बर्याच वर्षांचा काळ लोटला आहे; मात्र ‘गुन्हेगारांचे ‘एन्काऊंटर’ करणारे पोलीस अधिकारी हे पैसे कसे कमावतात ? त्यांना हे पैसे कोण देते ? त्यांचे गुन्हेगारांशी लागेबंधे कसे असतात ?’, या ‘उघड गुपिता’ची चौकशी कुठेतरी झाली पाहिजे, असे अनेकांना वाटते.
प्रशिक्षणामध्ये, पोलीस मुख्यालयात कामांच्या वाटपामध्ये, पोलीस कल्याण विभागामध्ये होणारा भ्रष्टाचार, पोलीस अधिकार्यांचे अमली पदार्थ माफियांशी असलेले संबंध आणि आरोपींकडून लाच स्वीकारणारे पोलीस आदी प्रकारच्या भ्रष्टतेविषयी तर जनता सतत वाचतच असते. पोलीस अधिकारी गृहमंत्र्यांना ‘१०० कोटी’ पोचवत असल्याच्या सूत्रावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही काही मासांपूर्वी झालेली उलथापालथ सर्व देशाने पाहिली. पोलीसदलाच्या संस्कृतमधील ब्रीदवाक्याचा मराठी अर्थ ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ असा आहे. तो पोलीस सार्थकी लावतात का ? भूतकाळातील रामदेवबाबा, संतश्री आसारामबापू आदी संतांना त्रास दिल्याच्या घटना पाहिल्यास अक्षरशः दुर्दैवाने सांगावेसे वाटते की, ‘संतांना लाथ आणि दुर्जनांना हात’, अशी पोलीसदलाची स्थिती आहे !
सध्या जनता आणि गुन्हेगार यांच्याकडूनच पैसे घेऊन ते स्वतःच कित्येकदा श्रीमंत झालेले दिसतात; जसे बोरवणकरांनी वरील उदाहरणात सांगितले ! पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते आणि जनतेला येणारे अनुभव यांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडले आहे. पोलीस हे अंतर अल्प करण्यासाठी प्रयत्न करणार का ?
– श्री. सचिन कौलकर, सांगली.