भारतद्वेष्टी नि आत्मघातकी अमेरिका !

गुरपतवंत सिंह पन्नू

भारताचा तुकडा पाडून ‘खलिस्तान’ निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर खलिस्तानी आतंकवादी प्रयत्न करत आहेत. यात कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असून खलिस्तान्यांना पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’चे छुपे समर्थन असल्याचे सत्य उघड आहे. जून २०२३ मध्ये कॅनडाचा नागरिक आणि खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सप्टेंबरमध्ये केला होता. अशातच कॅनडाचा मित्र अमेरिकेने आता तेथील एका खलिस्तान्याच्या हत्येचा कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. तिने यासंदर्भात आरोपपत्र प्रविष्ट केले असून त्यात थेट भारताला गोवले आहे. अशा प्रसंगी भारताने मुत्सद्दीपणाने या संदर्भात उच्च स्तरीय अन्वेषण समिती स्थापन केली असून ‘या विषयाचे अन्वेषण करू’, असे म्हटले आहे.

या आतंकवाद्याचे नाव आहे गुरपतवंत सिंह पन्नू ! ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा तो प्रमुख आहे ! तो भारताच्या विरोधात सतत गरळओक करत असतो आणि शिखांना चिथावणी देऊन खलिस्तानच्या निर्मितीला सातत्याने खतपाणी घालत असतो. वर्ष २०२० मध्ये भारत शासनाने आणलेल्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी देहलीत जी आंदोलने झाली, त्यामध्ये खलिस्तानी शक्तीही घुसल्या होत्या. त्यांतील एक प्रमुख नाव होते ते या पन्नूचेच ! हल्ली म्हणजे अगदी २ आठवड्यांपूर्वी १९ नोव्हेंबरला या पन्नूनेच देहलीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला बंद ठेवण्याची धमकी दिली होती. त्या दिवशी काही खलिस्तान्यांनी विमानतळाबाहेर निदर्शनेही केली. मूळचा भारतीय असलेला पन्नू याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोनही देशांचे नागरिकत्व आहे. भारताने पन्नूला अटक करून त्याचे प्रत्यार्पण करावे, अशी अमेरिकेकडे अनेक वेळा मागणीही केली आहे; परंतु अमेरिकेने नेहमीच त्याकडे दुर्लक्ष केले. यामागे तिने कारण काहीही दिले असले, तर वस्तूत: हा सार्वभौम भारताचा अवमान आहे. भारताच्या अखंडतेला सुरुंग लावणार्‍या या खलिस्तान्यांना पाठीशी घालण्याचा हीन प्रयत्न करणारे अमेरिका आणि कॅनडा यांसारखे देश हे त्यामुळेच भारताचे मित्र होऊ शकत नाहीत. हे आरोपपत्र त्याचाच आणखी एक पुरावा !

आरोपपत्रातील काळेबेरे !

पन्नूच्या विरोधात हत्येचा कट रचल्यावरून जे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे, त्यातील गोष्टींवर दृष्टी टाकली, तर त्यामध्ये पुष्कळ काळेबेरे आहे. येनकेन प्रकारेण भारताला गोवण्याचे चतुराईने प्रयत्न करण्यात आले आहेत. पन्नूला मारण्यासाठी म्हणे माजी भारतीय अधिकारी असलेल्या आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या निखिल गुप्ता नावाच्या कुणी माणसाने अमेरिकी नागरिकाला ‘मर्डर फॉर हायर प्लॉट’ म्हणजेच हत्या करण्याची सुपारी दिली. गंमत अशी की, गुप्ताने ज्याला हत्या करण्याचे दायित्व सोपवले, तो अमेरिकेतील प्रतिष्ठेची मानली जाणारी गुप्तचर संस्था ‘डीईए’ म्हणजेच ‘ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशन’चा हस्तक आहे. गुप्ता हा एका भारतीय अधिकार्‍याच्या संपर्कात होता आणि तो देत असलेल्या आदेशांनुसार काम करत होता म्हणे ! जर भारतीय अधिकार्‍याला म्हणजेच भारत सरकारला पन्नूची हत्या करायची असती, तर त्याने गुप्ताला हाताशी धरून या कथित हस्तकाची पार्श्वभूमी पडताळली नसती का ? भारतीय गुप्तचर संघटनेने यात गुप्ताला साहाय्य केले असते. यासाठी गुप्ताला अमेरिकेत अन्य कुणी नाही, तर एक गुप्तचरच कसा सापडला ? आता या गुप्ताला ३० जून २०२३ या दिवशी चेक रिपब्लिक येथून अमेरिकेने अटक केली, असाही दावा आहे. १९ जून या दिवशी निज्जरला अटक केली आणि त्याच काळात पन्नूचाही काटा काढण्याचा भारताचा विचार होता, असा आरोपही आरोपपत्रात आहे. हे अत्यंत सुरेखरित्या रचलेले भारतविरोधी कथानक आहे आणि याचे सूत्रधार अमेरिका आणि कॅनडा आहेत, हे लवकरच समोर येईल.

आपण गृहीत धरू की, भारतावर झालेले आरोप हे सत्य आहेत. आता प्रश्न असा पडतो की, भारताने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात त्याच्या नागरिकाच्या हत्येचा कट रचणे, ही खरीतर अमेरिकेची नाचक्की आहे. त्यामुळेच अमेरिका चवताळली आणि तिने भारतावर थेट आरोप केले, असे त्यामुळे म्हणायलाही हरकत नाही. कॅनडाचे ‘राहुल गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेले तेथील पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर लेखणी झिजवायला आता वेळ नाही. ट्रुडो म्हणाले की, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे आम्ही आधीपासून जी मागणी करत आलो, तीच अधोरेखित झाली आहे. निज्जरच्या हत्येवरून भारताच्या विरोधात गेल्या ७५ दिवसांत एकही पुरावा सादर करता न आलेले ट्रुडो महाशयांचे हे वक्तव्य लाजिरवाणे नव्हे, तर हास्यास्पद आहे.

मास्टरस्ट्रोक !

आता अमेरिकेने केलेल्या या आरोपांचे ‘टाइमिंग’ कसे आहे, तेही पहा. मध्यपूर्वेत सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीचा कालावधी असतांना भारतावर आरोप करण्याची वेळ अमेरिकेने निवडली. असे करून अख्ख्या जगाला नवीन विषय चघळण्याची संधी अमेरिकेने दिली. अर्थात् आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताच्या विरोधात पश्चिमी शक्ती आता अशा प्रकारे एकवटू लागल्या असतील, तर मोदी शासनाच्या परराष्ट्र नीतीचा खर्‍या अर्थाने कसही या काळात लागणार आहे. आज जागतिक सत्ता एका अमेरिकेकडे न रहाता विविध भूभागांत विभागली गेली आहे. अमेरिकेचे महत्त्व अल्प करण्यासाठी केवळ रशियाच नव्हे, तर चीन आणि भारत हेही कारणीभूत आहेत. अमेरिकेची ही डोकेदुखी भारताच्या विरोधात तिने थेटच दंड थोपटल्याने ती आत्मघात करत आहे, हे आता भारताने त्याला जोरकसपणे दाखवण्याची ही वेळ आहे. भारत हा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळेल का ? हे अमेरिकेने ध्यानात ठेवावे, एवढेच !

खलिस्तानी पन्नूला अटक करण्याऐवजी त्याच्या हत्येच्या कथित कटात भारत असल्याचा दावा करणारी अमेरिका भारतद्वेष्टीच !