आजपासून ओझर (जिल्हा पुणे) येथे चालू होत असलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निमित्ताने…
मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य !
भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे. सरकारीकरण झालेल्या काही देवस्थानांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. शासनाने कह्यात घेतलेल्या काही मंदिरांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत, तसेच मंदिरे हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्रे आणि हिंदूंना चैतन्य पुरवणारी व्हावीत, यासाठी ती सरकारीकरणातून मुक्त करून पुन्हा भक्तांच्या कह्यात येणे आवश्यक आहे. त्यासाठी वैध मार्गाने लढा देणे आवश्यक आहे. हा लढा देण्यासाठी हिंदूंची मंदिरे आणि त्यांच्या परंपरा जपण्यासाठी हिंदूंसह मंदिर विश्वस्तांचे संघटन करणे, हे काळानुसार धर्माचरणच आहे. असे करायचे असेल, तर हिंदूंच्या मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे. त्यासाठी जळगाव येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रथम मंदिर विश्वस्तांची परिषद आयोजित केली होती. यातूनच पुढे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली.
यानंतर महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानात १६ एप्रिल २०२३ या दिवशी पहिली राज्यस्तरीय बैठक यशस्वी पार पडली. मंदिरांवर होत असलेले विविध आघात रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने २ आणि ३ डिसेंबर या दिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन केले आहे. या परिषदेच्या आयोजनामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विश्वस्त मंडळ, श्री विघ्नहर गणपति देवस्थान विश्वस्त मंडळ, लेण्याद्री गणपति देवस्थान विश्वस्त मंडळ, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार ?
१. मंदिरांचे चैतन्य आणि त्यांतील देवतांचे तत्त्व टिकवण्यासाठी मंदिरांचे सुनियोजन करणे
२. समृद्ध असलेल्या मंदिर संस्कृतीचे संवर्धन करणे
३. मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे
४. मंदिर हिताच्या दृष्टीने योजना, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे
– श्री. सुनील ओजाळे आणि सौ. अपर्णा जगताप, पुणे (२९.११.२०२३)
१. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या स्थापनेचा प्रमुख उद्देश
जळगाव येथील मंदिर परिषदेला अनेक मंदिरांच्या विश्वस्तांची उपस्थिती लाभली होती. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा प्रमुख उद्देश, म्हणजे ‘सरकार अधिग्रहित मंदिरे भक्तांच्या कह्यात घेण्ो आणि मंदिर सरकारीकरणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे, मंदिरांवर होणारे आघात, मूर्तीभंजनाच्या घटना, हिंदूंच्या मंदिरात होणार्या चोर्या या सगळ्या समस्या निवारण करण्यासाठी संघटितपणे कृती करणे’, हा आहे. मंदिरांचे संघटन, मंदिरांचा समन्वय, मंदिरांचे सुव्यवस्थापन, मंदिरे ही सनातन धर्माची प्रचारकेंद्रे झाली पाहिजेत आणि मंदिरांची सुरक्षा, अशा पंचसूत्रींच्या आधारे मंदिर महासंघ कार्य करत आहे.
२. जळगाव येथे झालेल्या राज्य परिषदेनंतर महासंघाने केलेले कार्य !
हिंदूंच्या मंदिरांच्या परंपरांचे रक्षण करणे, मंदिर सरकारीकरणातून मुक्त करणे, मंदिरात वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) लागू करणे, पुजार्यांचे योग्य नियोजन करण्यासह त्यांच्या समस्या सोडवणे, अशा अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा होऊन कृतीशील कार्य करण्याचे प्रयत्न जळगाव येथे झालेल्या राज्य परिषदेत ठरवण्यात आले. त्या संघटित प्रयत्नांना मिळालेले यश म्हणजे महाराष्ट्र राज्यात केवळ ९ मासांत २६२ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.
३. महाराष्ट्र मंदिर महासंघाने अल्पावधीतच केलेले कार्य
जळगाव येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून आता ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देणे, मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होण्यासाठी आग्रह धरणे, मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे शासकीय-प्रशासकीय हस्तक्षेप होऊ न देणे, अशी भूमिका ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या स्थापनेच्या वेळी निश्चित करण्यात आली. विविध कृतीच्या सूत्रांसमवेत या बैठकीत प्रामुख्याने सर्व मंदिर सदस्यांची प्रत्येक मासाला ‘ऑनलाईन’ बैठक, प्रति ३ मासांनी प्रत्यक्ष बैठक आणि वर्षातून एकदा ‘मंदिर न्यास परिषद’ घेण्याचे निश्चित करण्यात आले. यानुसार हे कार्य चालू आहे. याचसमवेत मंदिर सरकारीकरणातून मुक्त व्हावीत, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.
४. आजच्या काळातही असुरक्षित असलेली मंदिरे !
पूर्वी परकीय आक्रमक हे हिंदूंची मंदिरे आणि त्यांतील संपत्ती यांवर डोळा ठेवून आक्रमण करून ती लुटायचे, तसेच त्या मंदिरासह देवतांच्या मूर्तींची नासधूस करायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हिंदूंची मंदिरे आजच्या काळातही सुरक्षित नाहीत. नुकतेच शनिशिंगणापूर देवस्थानात सरकारी विश्वस्त मंडळाच्या अनुमतीने चालू असलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि अनधिकृत कामगार भरती उघडकीस आली आहे. याचसमवेत अहिल्यानगर येथील मौजे गुहा येथील श्री कानिफनाथ मंदिरात १३ नोव्हेंबर या दिवशी काही मुसलमान समाजकंटकांनी भजन करत असलेले वारकरी बांधव आणि भगिनी यांना धक्काबुक्की करत टाळ, मृदंग यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. श्री कानिफनाथ महाराज मंदिराची जागा वक्फ बोर्डद्वारे बळकावण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत.
५. छत्रपती शिवरायांप्रमाणे मंदिरांचे रक्षण करूया !
हिंदु धर्म आणि परंपरा जपण्यासाठी मंदिर महासंघाच्या माध्यमांतून कृतीप्रवण होण्यासाठी प्रतिदिन किमान १ घंटातरी या कार्यासाठी देणे आवश्यक आहे. ज्या सरकारीकरण झालेल्या मंदिरांत घोटाळे झाले आहेत, त्यांच्या विरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी सर्व मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित होणे आणि जागरूक रहाणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कह्यातून अनेक मंदिरे पुन्हा स्वतःच्या कह्यात घेऊन ती भक्तांच्या स्वाधीन केली होती. आता आपल्याला मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरे सुरक्षित ठेवण्यासाठी कार्य करायचे आहे. हिंदु धर्मात ‘मंदिरे’ हीच धर्माचे प्राण आहेत. या प्राणाला, म्हणजेच मंदिरांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे, हे प्रत्येक हिंदूचे प्रथम कर्तव्य आहे.
हिंदु समाजाला संघटित होऊन मंदिरांच्या मुक्ततेसाठी तीव्र लढा उभारण्याखेरीज पर्याय नाही. प्रत्येक हिंदु खर्या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस कुणाचेही होणार नाही.
– श्री. सुनील ओजाळे आणि सौ. अपर्णा जगताप, पुणे (२९.११.२०२३)