कवळे (फोंडा, गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागराज कुवेलकर यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती !

श्री. नागराज कुवेलकर

१. नामजप करत असतांना आवाज ऐकू येणे आणि ‘तो आवाज कुणाचा होता ?’, हे न समजणे

‘१२.७.२०२३ या दिवशी मी नामजप करत होतो. त्या वेळी माझा ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप चालू होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘माझी साधना व्यवस्थित चालली आहे ना ?’ नंतर मला आवाज ऐकू आला, ‘ये. मी तुला दाखवतो.’ ‘तो आवाज कुणाचा होता ?’, ते मला कळले नाही.

२. सूक्ष्मातून एक वाट दिसणे, त्या वाटेवरून चालतांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणे आणि ते अडथळे आपोआप दूर होणे

त्यानंतर मला सूक्ष्मातून एक वाट दिसली. मी त्या वाटेवरून चालत होतो. थोडे चालत गेल्यावर मला काटेरी झाडे आणि दाट जंगल दिसले. माझा नामजप चालू होता. थोड्या वेळाने काटेरी झाडे एका बाजूला झाली आणि मला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला. जंगल संपल्यावर मला नदी दिसायला लागली. तिचे पाणी माझ्या गळ्यापर्यंत होते. मी नामजप करत नदी पार करत होतो. थोड्या वेळाने पाण्याची पातळी न्यून होऊन ती माझ्या कमरेपर्यंत झाली. मी पाण्यातून चालायला प्रारंभ केला आणि ती नदी पार करू शकलो. त्यानंतर माझ्या समोर गेंडा आणि वाघ यांसारखे हिंस्र प्राणी दिसायला लागले. ते माझी वाट अडवून उभे होते. थोड्या वेळाने ते बाजूला झाले. मी पुढे जात असतांना २ मोठे नाग माझी वाट अडवून उभे असलेले मला दिसले. तेसुद्धा थोड्या वेळाने बाजूला झाले.

३. डोंगरावर चढत असतांना थकवा आल्याने पुढे जाता न येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तेथेच बसून नामजप करून वर जाण्याचा प्रयत्न करण्यास सांगणे

त्यानंतरचा मार्ग पुष्कळ डोंगराळ आणि दगडधोंड्यांनी भरलेला होता अन् मला वर चढून जायचे होते. प्रयत्न केल्यावर मला डोंगरावर थोडे चढता येत होते. मार्ग निसरडा झाल्यामुळे मी परत खाली येत होतो. पुन्हा मी थोडे वर चढून गेलो आणि नंतर थकवा आल्याने मला पुढे जाता आले नाही. मी तिथे शेजारीच सपाट जागेवर बसलो. तेथे मला परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) दिसले आणि मला म्हणाले, ‘‘इकडेच बसून साधना कर आणि थोड्या वेळाने परत वर जाण्याचा प्रयत्न कर.’’

४. भगवान शिवाने साधकाभोवती संरक्षककवच निर्माण करणे

नंतर मला स्वतःभोवती संरक्षककवच दिसले. ते भगवान शिवाने माझ्या भोवती निर्माण केले होते. मी बसलेल्या ठिकाणाहून वर बघितले. तेव्हा मला भगवान शिव आणि परम पूज्य यांचे दर्शन झाले.

‘परम पूज्य, ‘तुमच्याच कृपेने मला वरील अनुभूती आली आणि तुम्हीच ती माझ्याकडून लिहून घेतली’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. नागराज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५३ वर्षे), कवळे, फोंडा, गोवा. (१४.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक