मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे; मात्र शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये आपण मागे पडत आहोत. शाळांतील पायाभूत सुविधांसाठी ३५ टक्के निधी दिला जातो. पायाभूत सुविधा सुधारल्या, तर शाळांच्या दर्जामध्ये आपण देशात प्रथम दर्जाचे ठरू, असे वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले. या वेळी दीपक केसरकर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे दायित्व शासनाचे आहे. शासनाकडून वाहतुकीसाठी भत्ताही दिला जातो. दुर्गम भागातील एकही शाळा बंद होणार नाही. नवीन सुविधा आणतांना मुंबईतील शाळांच्या गच्चीवर स्वयंपाक बगीचा करण्यात येणार आहे.’’
भावी शिक्षकांनी प्रश्न विचारतांना शिस्त पाळायला हवी !
‘बीडमध्ये माझी पत्रकार परिषद चालू असतांना शिक्षक भरतीच्या प्रक्रियेविषयी एका विद्यार्थी उमेदवाराने प्रश्न विचारला. त्या वेळी उत्तर दिल्यानंतरही तो विद्यार्थी बोलत राहिला. हे शिस्तीला धरून नाही. हे सांगणे म्हणजे कुणाचा अपमान होत नाही. भावी शिक्षकांनी शिस्त पाळायला हवी’, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले. २ दिवसांपूर्वी बीड येथील एका कार्यक्रमात शिक्षक भरतीच्या विलंबाविषयी उमेदवार मुलीने प्रश्न विचारला असता दीपक केसरकर रागावले असल्याचे व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाले आहेत. त्यावर दीपक केसरकर यांनी त्यांची भूमिका सांगितली. |
संपादकीय भूमिका :आतापर्यंत राज्यातील शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा का झाल्या नाहीत ? हेही पहाणे आवश्यक ! |