१. ‘हमास’च्या आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यामागे ‘क्रिप्टो’ (आभासी) चलनाची भूमिका
‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भयानक आक्रमण केल्यानंतर आतंकवाद्यांना पैसा पुरवण्यासाठी ‘क्रिप्टो’ चलनाच्या करण्यात येणारा वापर समोर आला आहे. ‘क्रिप्टो’ चलनामध्ये ते ‘पैसे कुणी दिले ?’, याची गुप्तता ठेवता येते, तसेच ते परदेशातून त्वरित हस्तांतर करता येते आणि त्यामुळे आतंकवाद्यांना अवैध कामे करण्यास प्रोत्साहन मिळते. ‘ब्लॉक चेन’ यासंबंधीच्या व्यवहाराच्या सार्वजनिक नोंदी निर्माण करत असल्याने वैयक्तिक आणि एका गटाने केलल्या व्यवहाराच्या नोंदी शोधणे अजून कठीण होऊन जाते. आतंकवादी आणि बंडखोर गटांना पैसा पुरवण्यामध्ये क्रिप्टो चलनाच्या भूमिकेविषयी आता छाननी केली जात आहे. इस्रायलने हमासशी संबंधित ‘क्रिप्टो’ची खाती कह्यात घेतली आहेत. हमास आणि त्याच्याशी संबंधीत गटांकडून वापरल्या जाणार्या क्रिप्टो चलनाविषयी गंभीरपणे उपाययोजना करण्याची अमेरिकेतील कायदेतज्ञांनी मागणी केली आहे. ‘क्रिप्टो’ चलन हा एक मार्ग आहे, ज्याद्वारे हिंसाचारी आतंकवादी आणि त्यांच्या संघटना पैसा मिळवून त्याचा अपवापर करत आहेत.
२. ‘गूगल’ने इस्रायलमधील नकाशे दाखवणे केले बंद !
इस्रायल आणि गाझा या ठिकाणी इस्रायली सैन्याच्या विनंतीवरून ‘गूगल’ने या भागातील नकाशे दाखवणे बंद ठेवले आहे. गाझामध्ये आक्रमण केल्यानंतर इस्रायली सैन्याच्या विनंतीवरून गाझा पट्टीतील रहदारीविषयीची स्थिती दाखवणे गूगलने बंद ठेवले आहे. याविषयी गूगलचे प्रवक्ते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या संघर्षाच्या वेळी आम्ही जे केले होते, तसेच आता येथील भागातील परिस्थिती जाणून घेऊन आम्ही या भागातील स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रहदारीविषयीची माहिती आणि व्यवसाय यांविषयीची माहिती दाखवणे तात्पुरते बंद केले आहे.’’
३. इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात झालेली हानी
इस्रायली सैन्य हमासला धडा शिकवण्यासाठी गाझामध्ये प्रवेश केला असतांना ‘१० वर्षांपूर्वी झालेल्या युद्धावरून कोणत्या प्रकारचे युद्ध होऊ शकते ?’, याची कल्पना येते. वर्ष २०१४ मध्ये इस्रायलच्या हमासच्या विरोधातील तिसर्या युद्धाच्या वेळी गाझा शहराच्या शेजारी असलेल्या दाट लोकवस्ती असलेला शिजाया हा भाग युद्धभूमी झाला होता. या भागातील नागरिकांना तेथून जाण्याची चेतावणी देऊनही ते तिथेच राहिले आणि त्यामुळे अनेक जण घायाळ झाले. इस्रायलचे निवृत्त जनरल म्हणाले, ‘‘या वेळी मोठ्या प्रमाणात डावपेच आखून विमाने आणि तोफा यांच्या साहाय्याने आम्ही प्रवेश केला आहे. आम्ही आमच्या सैनिकांचे घायाळ होण्याचे प्रमाण न्यून करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला पुष्कळ प्रमाणात पाठिंबा पाहिजे.’’ मोठ्या प्रमाणात झालेल्या संघर्षामुळे सैन्याची हानी झाली आहे; परंतु नागरिकांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन तेथील वसाहत भुईसपाट झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार संघर्षात जवळजवळ ६७० इमारती नष्ट झाल्या, तसेच जवळजवळ १ सहस्र २०० इमारतींची मध्यम प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात हानी झाली.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे