सतत साधकांच्या उद्धाराचा विचार करणार्‍या आणि उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही अतिशय विनम्र असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘२६.८.२०२३ या दिवशी श्री गुरुकृपेने मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा अमूल्य सत्संग लाभला. त्यांच्या सत्संगातून मला चैतन्य आणि त्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मिळून साधनेची पुढील दिशाही मिळाली. त्यांनी मला केलेले मार्गदर्शन आणि मला त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

१ अ. संतांशी बोलल्यावर साधकांना संतांमधील चैतन्य आणि त्यांचे मार्गदर्शन या दोन्हींचा लाभ होणे : साधकांच्या मनात संतांविषयी आदरयुक्त भीती असते, तर काही वेळा साधकांच्या मनात अपराधीपणाची भावना असते, ‘संतांनी मला जे करायला सांगितले, ते मी काहीच केले नाही, तर त्यांच्याशी कसे आणि काय बोलू ?’ या विचाराने साधक संतांशी बोलत नाहीत किंवा त्यांना भेटत नाहीत. याविषयी मार्गदर्शन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला म्हणाल्या, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जे सद्गुरु आणि संत झाले आहेत, त्यांच्या षट्चक्रांतून सतत चैतन्य प्रक्षेपित होत असते. साधक संतांशी काही न बोलता केवळ त्यांना भेटले, तरी त्यांना ते चैतन्य आणि ऊर्जा मिळते. साधक संतांशी बोलले, तर त्यांना संतांमधील चैतन्य आणि त्यांचे मार्गदर्शन दोन्ही मिळून दुहेरी लाभ होतो. संतांकडे गेल्यावर साधकांनी केवळ पाय घट्ट रोवून उभे राहिल्यास साधकांना सर्व स्तरांवर लाभ होतो.

श्री. प्रणव मणेरीकर

१ आ. ‘कुठल्याही सेवेचे दायित्व हे शिकण्यासाठी मिळालेले असणे’, हे लक्षात घेऊन साधकांनी सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक ! : साधकाने सतत शिकत रहायला हवे. जे आपल्यापेक्षा लहान आहेत, साधनेत नवीन आहेत, साधक नाहीत किंवा साधनेत नाहीत, त्यांच्या माध्यमातूनही देव आपल्याला काही ना काही शिकवत असतो. त्यासाठी आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे; कारण सर्वात महत्त्वाचे सूत्र, म्हणजे ‘आपल्याला एखाद्या सेवेचे दायित्व शिकण्यासाठीच मिळालेले असते.’ त्यासाठी आपण सतत शिकत रहाण्याचे महत्त्व आपल्या मनावर बिंबवले पाहिजे.

१ इ. सहसाधकांना साधनेत साहाय्य करतांना स्वतःच्या साधनेचा पाया भक्कम करणे आवश्यक असणे : सहसाधकांना साधनेत साहाय्य करतांना स्वतःच्या साधनेचा पाया भक्कम असला पाहिजे. स्वतःच्या क्रियमाणाचा पूर्ण वापर केला पाहिजे. स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करून साधकत्व वृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील अनुभवलेली विनम्रता आणि साधकांच्या उद्धाराची तळमळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला विचारले, ‘‘तुमच्या समवेत रहाणारे साधक कसे आहेत ? ते साधनेत कुठे न्यून पडतात ? त्यांच्यासाठी आम्ही आणखी काही करायला हवे का ? आम्ही त्यांना मार्गदर्शन करायला कुठे न्यून पडतो का ?’’ त्यांच्या बोलण्यातून त्यांना असलेली साधकांच्या उद्धाराची तळमळ प्रकर्षाने जाणवत होती. अध्यात्मातील उच्च अधिकारी असूनही त्यांच्यातील शिष्यभाव आणि अतिशय विनम्रता या गुणांचे मला दर्शन झाले.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील अनुभवलेली प्रीती !

त्यांनी मला ‘सेवेत काय अडचणी आहेत ?’, असे विचारून त्याविषयी जाणून घेतले आणि त्यावर उपाययोजनाही सांगितल्या. त्यांनी माझी आणि माझ्या कुटुंबियांची पुष्कळ प्रेमाने विचारपूस केली. यातून ‘साधकांवर प्रीती कशी करायला हवी ?’, हे मला शिकता आले.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा सत्संग आणि त्यांची अमृतमय वाणी यांतून मला साधना करण्याची नवीन प्रेरणा मिळून उभारी आली. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री गुरुचरणी शरणागत,

श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४४ वर्षे), देहली सेवाकेंद्र. (२७.८.२०२३)