२८ नोव्हेंबरपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ ! – रोहन कडोले

पत्रकार परिषदेत माहिती देतांना अभाविपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

सांगली – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुर्गवंदन यांच्या वतीने २८ नोव्हेंबरपासून ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला, तो दुर्गराज रायगड ते देशाची राजधानी देहली ते पुणे येथील लाल महाल अशी आयोजित केली आहे, अशी माहिती अभाविपचे जिल्हा संयोजक रोहन कडोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी चैतन्या फडके, सूरज मालगावे, पंकज जत्ते उपस्थित होते.

रोहन कडोले पुढे म्हणाले की, या यात्रेसमवेत शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ आणि मावळ्यांच्या पेहराव्यामध्ये विद्यार्थी दुचाकीवरून ४ सहस्र किलोमीटरचा प्रवास करतील. या चित्ररथासमवेत ७५ गडांवरील मावळ्यांच्या बलीदानाने पवित्र झालेली माती कलशामधून नेण्यात येईल. या यात्रेत देशातील विविध ऐतिहासिक ठिकाणे, शहरात, तसेच देहली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ही यात्रा देहली येथे ७ ते १० डिसेंबर असेल, तर १४ डिसेंबरला पुणे येथे त्याचा समारोप होईल. ‘मावळा हिंदवी स्वराज्याचा, संकल्प राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा’, हे या यात्रेचे घोषवाक्य आहे.