माजी आमदार नितीन शिंदे यांची सातारा जिल्हाधिकार्यांकडे मागणी
सातारा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोथळा बाहेर काढून वध केला होता. राज्य सरकारच्या वतीने या शिल्प निर्मितीचे काम चालू आहे. अनुमाने ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे शिल्प तातडीने पूर्ण करून हा परिसर शिवभक्तांना पहाण्यासाठी खुला करावा, अशी मागणी माजी आमदार तथा ‘श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक नितीन शिंदे यांनी सातारा जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, अफझलखानवधाचे शिल्प अफझलखान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यासमोर उभे करून त्या परिसराचे नाव ‘शिवप्रताप भूमी’ असे करावे. तसेच हा परिसर शिवभक्तांना पहाण्यासाठी खुला करावा. या मागण्यांचे निवेदन गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले होते. या निवेदनाची नोंद घेत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांच्या वतीने निविदा मागवल्या होत्या. हे शिल्प निर्मितीचे काम पुणे येथील मूर्तीकाराला देण्यात आले होते. या शिल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करून घ्यावे आणि लवकरात लवकर हे शिल्प अफझलखान थडग्याजवळ बसवावे. तसेच या वधाची विस्तृत माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत लिहावी. गतवर्षी मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड संवर्धन, देखभाल-दुरुस्ती आणि सुशोभिकरण यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी संमत केला होता; मात्र तो अद्याप संबंधित विभागाला मिळालेला नाही. तो तातडीने उपलब्ध करून द्यावा.