साधना करून उन्नती केलेल्याच्या हाताच्या बोटांतून तेजतत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे दाखवण्याच्या संदर्भातील प्रयोग

ईश्वर सूक्ष्मातीसूक्ष्म असून त्याला जाणायचे, तर साधनाच वाढवायला हवी ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘साधक किंवा जिज्ञासू यांच्या संत्संगामध्ये ‘साधना करून उन्नती केलेल्याच्या हाताच्या बोटांतून तेजतत्त्व कसे प्रक्षेपित होते ?’, याचे प्रयोग दाखवण्यात येतात. यामध्ये पुढील ३ प्रयोग दाखवण्यात येतात.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. पाण्यामध्ये बोटे बुडवल्यावर पाण्याला गुलाबी रंग येणे

 १ अ. प्रयोगाची सिद्धता (तयारी) : या प्रयोगासाठी पांढर्‍या रंगाच्या प्लास्टिकच्या ५०० मि.लि. च्या (१२ सें.मी. व्यास आणि ६.५ सें.मी. उंची असलेल्या) भांड्यात ४०० मि.लि. पाणी घेण्यात आले. पटलावर (टेबलावर) पांढर्‍या रंगाचे कापड अंथरण्यात आले. त्या पटलावर पाणी असलेले पांढर्‍या रंगाचे प्लास्टिकचे भांडे ठेवण्यात आले. एका वेळी प्रयोग बघणार्‍या क८ – १० साधकांना (किंवा जिज्ञासूंना) पटलाभोवती उभे रहाण्यास सांगण्यात आले. त्यांची सावली प्लास्टिकच्या भांड्यातील पाण्यावर पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली.

१ आ. प्रत्यक्ष प्रयोग : प्रयोग बघणार्‍यांना प्लास्टिकच्या भांड्यातील पाण्याच्या रंगाकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले. पाण्यात प्रथम तर्जनी (अंगठ्याच्या बाजूचे बोट) बुडवण्यात आली आणि त्या वेळी ‘पाण्याचा रंग पालटला का ?’, हे बघण्यास सांगण्यात आले. तेव्हा प्रयोग बघणार्‍यांनी पाण्याचा रंग फिकट गुलाबी झाल्याचे सांगितले. त्यानंतर तर्जनी आणि तिच्या बाजूचे मधले बोट ही दोन्ही बोटे पाण्यात बुडवण्यात आली. त्या वेळी प्रयोग बघणार्‍यांनी ‘पाण्याचा रंग आधीपेक्षा गडद झाल्याचे सांगितले.’ त्यानंतर तर्जनी, मधले बोट आणि अनामिका ही तिन्ही बोटे पाण्यात बुडवण्यात आली. त्या वेळीही पाण्याच्या रंगाचे निरीक्षण करण्यास सांगण्यात आले. शेवटी करंगळीसह एकूण ४ बोटे बुडवण्यात आली. त्या दोन्ही वेळी पाण्याचा रंग आणखी आणखी गडद गुलाबी झाल्याचे प्रयोग बघणार्‍यांनी सांगितले.

१ इ. पाण्यामध्ये बोटे बुडवल्यावर पाण्याला गुलाबी रंग येण्यामागील शास्त्र

१ इ १. मनुष्याचा देह पंचतत्त्वांनी बनलेला असणे आणि त्याला स्थुलातील पंचतत्त्वांची जाणीव त्याच्या पंचज्ञानेंद्रियांद्वारे येत असणे : जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू ही पंचमहाभूतांनी (पंचतत्त्वांनी) बनलेली असते. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही ती पंचतत्त्वे आहेत. मनुष्याचा देहही पंचतत्त्वांनी बनलेला असतो. त्याला स्थुलातील पंचतत्त्वांची जाणीव त्याच्या पंचज्ञानेंद्रियांद्वारे येत असते. येथे ‘पंचतत्त्वे, पंचतत्त्वांच्या होणार्‍या जाणिवेची लक्षणे आणि पंचतत्त्वांची जाणीव होणारी पंचज्ञानेंद्रिये’ याची सारणी दिली आहे.

१ इ २. देहातील पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर प्रक्षेपित होऊ लागल्यावर त्या त्या पंचतत्त्वामुळे येणार्‍या अनुभूती : साधना न करणार्‍या सामान्य व्यक्तीमध्ये दोष आणि अहं यांचे प्रमाण पुष्कळ असल्याने रज-तमाचे अधिक्य असते. अशा व्यक्तीमध्ये पंचतत्त्वांपैकी पृथ्वी आणि आप या तत्त्वांचे प्रमाण अधिक असते. अशी व्यक्ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने साधना करू लागल्यावर तिच्यातील रज-तमाचे प्रमाण अल्प होत जाऊन सत्त्वगुणाचे प्रमाण वाढत जाते. सत्त्वगुण वाढला की, व्यक्तीमध्ये चैतन्य येते आणि ती व्यक्ती तेजस्वी दिसू लागते. त्या वेळी त्या व्यक्तीतील तेजतत्त्व वाढलेले असते. साधना करून आणखी आध्यात्मिक उन्नती झाली की, तिच्यातील वायुतत्त्व वाढते आणि आणखी पुढे आकाशतत्त्वही वाढते. अशा प्रकारे साधना केल्याने व्यक्तीतील पृथ्वी आणि आप ही तत्त्वे अल्प होत जाऊन तेज, वायु आणि आकाश ही तत्त्वे वाढत जातात. देहातील पंचतत्त्वे चैतन्याच्या स्तरावर प्रक्षेपित होऊ लागल्यावर कोणत्या पंचतत्त्वामुळे कोणत्या अनुभूती येतात, हे पुढील सारणीमध्ये दिले आहे.

साधना केल्याने देहातून प्रक्षेपित होणारी पंचतत्त्वे ही सूक्ष्म स्तरावरील असतात; म्हणून त्यांच्या संदर्भातील अनुभूती पंचज्ञानेंद्रियांना येत नसून पंचसूक्ष्मज्ञानेंद्रियांना येतात; म्हणून त्या सूक्ष्मातील अनुभूती असतात. सूक्ष्मातील अनुभूती साधना करणार्‍यांनाच येऊ शकतात.

१ इ ३. बोटातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वामुळे पाण्याला फिकट गुलाबी रंग येणे : साधना केल्याने देहामध्ये पालट होतात आणि देहातून पंचतत्त्वे प्रक्षेपित होऊ लागतात, हे कळले. साधनेमुळे संपूर्ण देहातून तेजतत्त्व प्रक्षेपित होते. त्यामुळे ते बोटांतूनही प्रक्षेपित होते. बोट पाण्यात बुडवल्यामुळे बोटातून पाण्यात जे तेजतत्त्व प्रक्षेपित झाले, त्यामुळे पाण्याला फिकट गुलाबी रंग आला आणि तो आपल्याला स्थुलातून डोळ्यांनी दिसला; कारण डोळ्यांना स्थुलातील तेजतत्त्वाची, म्हणजे रूप, रंग किंवा प्रकाश यांची जाणीव होते.

१ इ ४. एकापेक्षा अधिक बोटे बुडवत गेल्यावर पाण्याचा गुलाबी रंग वाढत गेल्याचे कारण : हाताची सर्व बोटे सारखी नसतात. त्यामुळे प्रत्येक बोटातून पंचतत्त्वांपैकी विशिष्ट तत्त्व अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असते, उदा. करंगळीतून पृथ्वीतत्त्व, अनामिकेतून आपतत्त्व, मध्यमेतून तेजतत्त्व, तर्जनीतून वायुतत्त्व आणि अंगठ्यातून आकाशतत्त्व. असे जरी असले, तरी जशी देहातून पाचही तत्त्वे प्रक्षेपित होतात, तशीच ती हाताच्या प्रत्येक बोटातूनही प्रक्षेपित होतात. त्यामुळे जेव्हा पाण्यात प्रथम तर्जनी (अंगठ्याबाजूचे बोट) बुडवली, तेव्हा तिच्यातून प्रक्षेपित झालेले तेजतत्त्व डोळ्यांना रंगाच्या माध्यमातून दिसले. त्यानंतर जेव्हा तर्जनीसोबत मध्यमाही पाण्यात बुडवली, तेव्हा त्या दोन्ही बोटांतील तेजतत्त्व पाण्यात प्रक्षेपित झाले. त्यामुळे पाण्याचा गुलाबीपणा आधीपेक्षा वाढला. त्याचप्रमाणे क्रमाने ३ आणि ४ बोटे पाण्यात बुडवल्यावर पाण्याचा गुलाबीपणा आणखी आणखी वाढला; कारण बोटांची संख्या वाढल्याने आणखी आणखी तेजतत्त्व पाण्यात प्रक्षेपित झाले.

१ इ ५. पाण्यात बोट किंवा बोटे बुडवलेली असतांना पाण्याला आलेला गुलाबी रंग पाण्यातून बोट किंवा बोटे बाहेर काढल्यावर नाहीसा होत असणे ; पण त्या पाण्यात प्रक्षेपित झालेल्या तेजतत्त्वाची सूक्ष्मातील अनुभूती घेऊ शकत असणे : जोपर्यंत पाण्यात बोट किंवा बोटे बुडवलेली असतात, तोपर्यंत पाण्यात गुलाबीपणा दिसतो आणि बोट किंवा बोटे पाण्याबाहेर काढल्यावर पाण्याचा गुलाबीपणा नाहीसा होऊन ते नेहमीसारखे दिसू लागते. याचे कारण म्हणजे बोटांतून प्रक्षेपित झालेले तेजतत्त्व दिसण्याचे पाणी हे माध्यम आहे. जोपर्यंत पाण्यात बोट किंवा बोटे बुडवलेली असतात, तोपर्यंत पाण्यात तेजतत्त्व प्रक्षेपित होत असते आणि ते डोळ्यांना गुलाबी रंगाद्वारे दिसते. गुलाबी रंग हा तेजतत्त्व दिसण्याचे स्थूल लक्षण आहे; पण बोटांतून पाण्यात प्रक्षेपित झालेल्या तेजतत्त्वाची सूक्ष्मातील अनुभूतीही आपण घेऊ शकतो. बोटे बुडवलेले ते पाणी बोटे न बुडवलेल्या साध्या पाण्यापेक्षा सूक्ष्मातून चैतन्यमय आणि अधिक पारदर्शक दिसते.

१ इ ६. पाण्यात बोटे बुडवली असता पाण्याला गुलाबी रंगाव्यतिरिक्त येऊ शकणारे अन्य रंग : साधना करणार्‍या उन्नत व्यक्तीने पाण्यात बोटे बुडवली असता पाण्याला येणारा गुलाबी रंग हा त्या व्यक्तीतील प्रीतीचा रंग आहे. प्रीतीचा सूक्ष्मातील रंग गुलाबी आहे. ज्या व्यक्तीत इतरांप्रती ‘प्रीती’ हा गुण असतो, त्या व्यक्तीची त्वचा फिकट गुलाबी झालेली दिसते. भक्तीचा सूक्ष्मातील रंग निळसर आहे. भक्तीरसात डुंबलेल्या व्यक्तीचे डोळे निळसर दिसतात. अशा व्यक्तीने पाण्यात बोटे बुडवली, तर पाणी फिकट निळसर दिसेल. चैतन्याच्या स्तरावर असणार्‍या व्यक्तीची त्वचा पिवळसर दिसते. तिने जर पाण्यात बोटे बुडवली, तर पाण्याला फिकट पिवळसर रंग येईल. ज्या व्यक्तीला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, अशा व्यक्तीने पाण्यात बोटे बुडवल्यास पाण्याला काळसर रंग येईल.

२. बोटांतून धूर प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे

२ अ. प्रयोगाची सिद्धता (तयारी) : प्रयोगासाठी बसलेल्या व्यक्तींच्या पहिल्या रांगेपासून साधारण ३ मीटर अंतरावर काळ्या रंगाचा पडदा उभा केला. प्रयोग दाखवणारी उन्नत व्यक्ती त्या काळ्या पडद्यापासून अर्धा ते १ मीटर अंतरावर आसंदीत (खुर्चीत) बसली. तिने उजवा हात वर करून त्या हाताची पाचही बोटे सरळ करून थोडी अलग अलग ठेवली. प्रयोग बघणार्‍यांकडून ‘त्या हाताच्या बोटांमागे काळा पडदा दिसतो ना ?’, याची निश्चिती करण्यात आली आणि दिसत नसेल, तर तो दिसेल असे बसायला सांगण्यात आले. खोलीत मंद प्रकाश ठेवण्यात आला.

२ आ. प्रत्यक्ष प्रयोग : प्रयोग बघणार्‍यांना प्रयोग दाखवणार्‍या उन्नत व्यक्तीच्या वर केलेल्या हाताच्या बोटांच्या टोकांकडे एकाग्रतेने बघण्यास सांगण्यात आले. ‘बोटांच्या टोकांतून पेटवलेल्या उदबत्तीतून निघतो, तसा धूर निघत असल्याचे दिसत आहे का ?’, असे विचारण्यात आले. यावर प्रयोग बघणार्‍यांनी ‘हो’ असे सांगितले. त्यांतील काही जणांनी मधले बोट आणि करंगळी यांतून अधिक प्रमाणात धूर निघत असल्याचे सांगितले.

२ इ. बोटांच्या टोकांतून पेटवलेल्या उदबत्तीतून निघतो, तसा धूर निघत असण्यामागील शास्त्र : हाताच्या प्रत्येक बोटातून पृथ्वीतत्त्व आणि तेजतत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यांच्या संयोगाने धूर प्रक्षेपित होतांना दिसतो. हा धूर बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या वायुतत्त्वामुळे वर जातो आणि विरळ होतो. पाणी तापवल्यावर पाण्याची वाफ होते आणि ती आपल्याला दिसते, तसेच हे आहे.

२ इ १. करंगळी आणि मधले बोट यांतून अधिक प्रमाणात धूर प्रक्षेपित होण्याचे कारण : करंगळीमध्ये पृथ्वीतत्त्व प्रधानतेने असते आणि मधल्या बोटामध्ये तेजतत्त्व प्रधानतेने असते. धूर हा पृथ्वीतत्त्व आणि तेजतत्त्व यांच्या संयोगाने बनतो. त्यामुळे करंगळीतून अधिक प्रमाणात प्रक्षेपित होणारे पृथ्वीतत्त्व, तसेच तिच्यातून काही प्रमाणात प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व यांच्या संयोगामुळे तिच्यातून धूर अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतो. त्याप्रमाणेच मधल्या बोटातून अधिक प्रमाणात प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व, तसेच त्याच्यातून काही प्रमाणात प्रक्षेपित होणारे पृथ्वीतत्त्व यांच्या संयोगामुळे त्याच्यातून धूर अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतांना दिसतो. बाकी बोटांतून पृथ्वीतत्त्व आणि तेजतत्त्व हे दोन्ही अल्प प्रमाणात प्रक्षेपित होत असते. त्यामुळे त्या बोटांतून धूर अल्प प्रमाणात प्रक्षेपित होतांना दिसतो.

३. बोटांतून प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे

३ अ. प्रयोगाची सिद्धता (तयारी) : प्रयोगासाठी बसलेल्या व्यक्तींच्या पहिल्या रांगेपासून साधारण ३ मीटर अंतरावर काळ्या रंगाचा पडदा उभा केला. प्रयोग दाखवणारी उन्नत व्यक्ती त्या काळ्या पडद्यापासून साधारण ३ मीटर अंतरावर पडद्याकडे तोंड करून आणि पडद्याच्या मध्यभागाच्या समोर आसंदीत (खुर्चीत) बसली. खोलीत मंद प्रकाश ठेवण्यात आला. प्रयोग दाखवणारी उन्नत व्यक्ती बसलेल्या ठिकाणाहून आपला उजवा हात बोटे सरळ ठेवून काळ्या पडद्याच्या मध्यभागासमोर करून हळूवारपणे गोल फिरवणार असल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी प्रयोग बघणार्‍यांना पडद्याच्या मध्यभागी दिसणार्‍या काळपटपणाची तुलना पडद्याच्या अन्य (बाजूच्या) भागांशी करण्यास सांगण्यात आले.

३ आ. प्रत्यक्ष प्रयोग : प्रयोग दाखवणार्‍या उन्नत व्यक्तीने जेव्हा खोलीत मंद प्रकाश असतांना काळ्या पडद्याच्या मध्यभागासमोर आपला हात करून तो गोल फिरवला, तेव्हा प्रयोग बघणार्‍यांना पडद्याच्या मध्यभागाचा काळपटपणा अल्प होऊन तो राखाडी झाला आहे किंवा उजळला आहे, असे दिसले. त्या वेळी पडद्याचा अन्य भाग आधीप्रमाणेच काळपट असल्याचे प्रयोग बघणार्‍यांनी सांगितले.

३ इ. खोलीत मंद प्रकाश असतांना काळ्या पडद्याच्या मध्यभागासमोर हात केल्यावर तेथील काळपटपणा अल्प होऊन तो भाग उजळण्यामागील शास्त्र : प्रयोग दाखवणार्‍या उन्नत व्यक्तीच्या बोटांतून तेजतत्त्वरूपी प्रकाश सतत बाहेर पडत असतो. तिने मंद प्रकाशात काळ्या पडद्याच्या मध्यभागासमोर हात करून तो गोल फिरवल्यावर तिच्या बोटांतून प्रक्षेपित झालेला प्रकाश पडद्याच्या तेवढ्या भागावर पडला. त्यामुळे काळ्या पडद्याचा तेवढा मध्यभाग त्या वेळी थोडा उजळलेला किंवा त्याचा काळपटपणा अल्प होऊन तो राखाडी झालेला दिसला. तेव्हा केवळ काळ्या पडद्याच्या मध्यभागासमोरच हात केल्याने पडद्याचा तेवढाच भाग उजळलेला दिसला आणि बाकीचा भाग तसाच काळा राहिला.

४. वरील ३ प्रयोगांच्या मांडणीच्या संदर्भातील सूत्रे

अ. वरील ३ प्रयोग हे बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वाच्या संदर्भातील होते.

आ. ‘पाण्यात बोटे बुडवल्यावर पाण्याला गुलाबी रंग येणे’ या पहिल्या प्रयोगात तेजतत्त्व पाण्यामध्ये प्रक्षेपित झाल्याने ते रंगाच्या रूपात डोळ्यांना सहजतेने दिसले; कारण तेव्हा ‘पाणी’ हे माध्यम होते आणि ते आपल्याला डोळ्यांनी दिसते. ‘बोटांच्या टोकांतून धूर प्रक्षेपित होतांना दिसणे’ आणि ‘हाताच्या बोटांतून प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे’ या अनुक्रमे दुसर्‍या अन् तिसर्‍या प्रयोगांत तेजतत्त्व दिसण्याचे ‘हवा’ हे माध्यम होते. हवा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे प्रयोग दुसरा आणि तिसरा डोळ्यांनी दिसायला थोडे अवघड होते अन् ते अधिकाधिक अवघड होत गेले.

इ. बोटांतून प्रक्षेपित होणारे तेजतत्त्व पहिल्या प्रयोगात रंगाच्या रूपात दिसले. दुसर्‍या प्रयोगात ते धुराच्या रूपात, तर तिसर्‍या प्रयोगात ते प्रकाशाच्या रूपात दिसले. या तीन प्रयोगांत आपण स्थुलातून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्माकडून आणखी सूक्ष्माकडे गेलो. त्यामुळे तिसर्‍या प्रयोगात बोटांतून प्रक्षेपित होणारा प्रकाश दिसायला अधिक अवघड आहे.

५. बोटांतून प्रक्षेपित होणारा प्रकाश दूर अंतरापर्यंत जात असल्याचे दिसणे

५ अ. प्रयोगाची सिद्धता (तयारी) : या प्रयोगात बाहेर अंधार असतांना प्रयोग बघणार्‍यांना रामनाथी आश्रमाच्या पाचव्या मजल्यावरील गच्चीवर नेण्यात आले. तेथून २० – २५ मीटर अंतरावर आश्रमाच्या दुसर्‍या इमारतीचे कौलारू छप्पर आहे. तसेच आश्रमासमोर साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर, तसेच आणखी पुढे २ – ३ किलोमीटर अंतरावर डोंगर आहेत. प्रयोग बघणार्‍यांना प्रयोग दाखवणारी उन्नत व्यक्ती आपला हात प्रथम जवळच्या कौलारू छपराकडे, त्यानंतर जवळच्या डोंगराकडे आणि शेवटी दूरच्या डोंगराकडे करणार असल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी प्रयोग बघणार्‍यांना ‘त्या त्या ठिकाणच्या अंधारामध्ये काय पालट होतो ?’, हे बघण्यास सांगण्यात आले.

५ आ. प्रत्यक्ष प्रयोग : प्रयोग दाखवणार्‍या उन्नत व्यक्तीने प्रथम जवळच्या कौलारू छपराकडे हात करून तो छपराच्या आडव्या भागासमोर डावीकडे-उजवीकडे हालवला. तेव्हा प्रयोग बघणार्‍यांना छपरावरचा अंधार थोडा न्यून झाल्याचे दिसले, तसेच छपरावर प्रकाश हालतांना दिसला. उन्नत व्यक्तीने जवळच्या डोंगराच्या भागासमोर हात करून आडवा-उभा हालवल्यावर तेथेही धूसर पांढरा प्रकाश दिसल्याचे प्रयोग बघणार्‍यांनी सांगितले. समोर लांबच्या डोंगराची आडवी कड अंधारात दिसत होती. उन्नत व्यक्तीने त्या दिशेने हात केल्यावर ती कड प्रयोग बघणार्‍यांना स्पष्ट दिसू लागली. काही जणांनी सांगितले, ‘त्या डोंगराच्या मागून कुणीतरी प्रकाश सोडला आहे’, असे तेव्हा जाणवले. नंतर त्या लांबच्या डोंगराच्या लगतच्या आकाशाच्या दिशेने उन्नत व्यक्तीने आपला हात केला. तेव्हा प्रयोग बघणार्‍यांना तेथील आकाश आणि आकाशातील ढग उजळल्याचे जाणवले.

५ इ. रात्रीच्या अंधारात बोटांतून प्रक्षेपित होणारा प्रकाश दूर अंतरापर्यंत पोचत असण्यामागील शास्त्र : देहातील तेजतत्त्व रंग, धूर यांच्याप्रमाणे प्रकाशाच्या रूपातही प्रक्षेपित होत असते. प्रकाशाला वेग असतो. त्यामुळे तो क्षणात दूरपर्यंत जाऊ शकतो; म्हणून या प्रयोगात ज्याप्रमाणे जवळच्या कौलांवर बोटांतून प्रकाश पडतांना दिसला, तसा तो दूरच्या डोंगरापर्यंतच नव्हे, तर आकाशातही पडतांना दिसला. यावरून या प्रकाशाला स्थुलातील प्रकाशाप्रमाणे मर्यादा नाही, असे लक्षात येते. तसेच बोटांतून दूर अंतरापर्यंत पोचलेला प्रकाश समोर केलेला हात मागे घेतला, तरी २ – ४ मिनिटे टिकून रहातो, असे प्रयोग बघणार्‍यांनी सांगितले.

६. सारांश

साधना करून उन्नती केल्यास देह तेजतत्त्वाने कसा चैतन्यमय होतो आणि दुसर्‍याला अनुभूती देऊ शकतो, हे या प्रयोगांतून लक्षात येते. तसेच या सूक्ष्मातील अनुभूती येण्यासाठीही साधनाच करावी लागते. ईश्वर तर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे. त्याला जाणायचे असेल, तर आपल्याला साधना किती वाढवायला हवी ! ईश्वरप्राप्ती हे साधनेचे ध्येय आहे. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध अन् पवित्र व्हायला हवे, तसेच तेजतत्त्वापुढे वायुतत्त्वाकडे आणि त्याही पुढे आकाशतत्त्वाकडे जायला हवे. यासाठी व्यष्टी साधनेसह समष्टी साधनाही करायला हवी. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या दोन्ही साधना साधकांकडून होण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळेच साधक जलद आध्यात्मिक उन्नती करत आहेत.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.१२.२०२२)

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांच्या देहातील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी साधनेत उन्नती केलेल्यांच्या हाताच्या बोटांतून तेजतत्त्व प्रक्षेपित होत असल्यामागील कारण काय आहे ? या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

संपर्क : श्री. आशिष सावंत

ई-मेल : [email protected]

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक