‘मला पू. दातेआजींच्या खोलीत रहायला येऊन काही दिवस झाले आहेत. त्यांच्या खोलीत रहायला आल्यावर मला पू. दातेआजी आणि त्यांच्या सूनबाई सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे) यांच्यातील अनोखे नाते आणि प्रेम अनुभवता आले. मला सौ. ज्योतीकाकूंचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.
१. उत्साही
सौ. ज्योतीकाकू पहाटे ५.३० वाजता उठतात आणि रात्री ११.३० वाजेपर्यंत कार्यरत असतात. त्या दुपारीही झोपत नाहीत, तरी सकाळी उठतांना त्या जेवढ्या उत्साही असतात, तेवढ्याच त्या रात्री झोपेपर्यंत उत्साही असतात.
२. त्यांचे कपाट अत्यंत व्यवस्थित आणि नीट लावलेले असते.
३. नम्रता
काकूंमध्ये पुष्कळ गुण आहेत; पण त्या म्हणतात, ‘मी पू. दाते आजींकडून शिकले.’
४. पू. आजींची अत्यंत मायेने सेवा करणार्या सौ. ज्योती दाते !
अ. काकू पू. आजींना लहान बाळासारखे प्रेमाने सांभाळतात आणि दुसरीकडे ‘पू. आजी संत आहेत’, या भावाने त्यांची सेवाही करतात.
आ. पू. आजींना वयोमानानुसार काही मर्यादा येतात. त्यामुळे काही वेळा ‘मी काही करू शकत नाही’, असे वाटून पू. आजींच्या डोळ्यांत पाणी येते. तेव्हा काकू त्यांना समजून घेतात आणि ‘तुम्ही आतापर्यंत पुष्कळ केले आहे’, असे त्यांना समजावूनही सांगतात.
इ. ‘पू. आजींना कंटाळा यायला नको’, यासाठी काकू प्रतिदिन रात्री ८ ते ९ हा वेळ पू. आजींसाठीच देतात. या वेळेत त्या पू. आजींना त्यांच्या आवडीचे भक्तीगीत ऐकवतात किंवा एखादी गोष्ट वाचून दाखवतात.
ई. पू. आजी झोपायच्या आधी काकू पू. आजींजवळ बसून त्यांच्या पाठीवरून आणि डोक्यावरून मायेने हात फिरवतात.
उ. पू. आजी झोपल्याची निश्चिती करूनच काकू झोपतात.
ऊ. काकू झोपल्यावर पू. आजींना खोकला आला, तर काकू त्वरित उठून त्यांना पाणी देतात.
‘काकू पू. आजींना अपेक्षित असे वागून परम पूज्यांना अपेक्षित असा संतसेवेचा लाभ करून घेत आहेत’, असे मला वाटते.
५. स्थिर आणि शांत
अ. काकू झोपल्यावर त्यांना कुणाचाही भ्रमणभाष आला, तरी त्या चिडचिड न करता किंवा एकही प्रतिक्रिया व्यक्त न करता प्रेमाने बोलतात.
आ. ‘काकू त्यांच्या सेवेसंबंधी असलेल्या सत्संगांना ‘ऑनलाईन’ जोडून खोलीतूनच ते सत्संग ऐकतात आणि खोलीतूनच त्यांच्या सेवा ‘ऑनलाईन’ करतात. त्याच वेळी त्या पू. आजींना ‘काय हवे-नको’, तेही शांतपणे पहातात.
६. आज्ञापालन
काकू पू. आजी जे सांगतात, ते तसेच आणि त्याच वेळी करतात.
७. श्रद्धा
एकदा एका सेवेसाठी काकू साधक शोधत होत्या; परंतु संध्याकाळपर्यंत पुष्कळ प्रयत्न करूनही त्यांना या सेवेसाठी कुणी साधक मिळाला नाही, तरी त्यांना ताण आला नाही किंवा त्या अस्वस्थही झाल्या नाहीत. त्यांना कुणाकडून कसली अपेक्षा नव्हती. त्यांना वाटत होते, ‘हे देवाचे कार्य आहे. देव काहीतरी सोय करीलच. ‘माझी शरणागती वाढावी’; म्हणून हा प्रसंग घडत आहे. देव देईलच; पण तोपर्यंत मला प्रयत्न करायचे आहेत.’ खरोखरच रात्री त्यांना त्या सेवेसाठी साधक मिळाला.
८. कृतज्ञताभाव
अ. साधकांविषयी आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही त्यांच्या मनात कृतज्ञताभाव असून तो त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो.
आ. ‘कुटुंबियांसह आश्रमात रहाता येत आहे’, यासाठी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२३)