पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर ?

गेल्या काही मासांपासून विविध ठिकाणी झालेल्या भविष्यवाणींमध्ये ‘यापुढील काळात १२ वर्षांखालील मुलांना आरोग्याचा धोका अधिक आहे’, असे सांगण्यात आले होते. त्याची प्रचीती येण्यास प्रारंभ झाला असून चीनमध्ये परत एकदा ‘न्यूमोनिया’सारखा आजार वाढत आहे. हा आजार विशेषकरून लहान मुलांमध्ये वेगाने पसरत असून रुग्णालये मुलांनी भरली आहेत. एका चिनी वृत्तवाहिनीने सांगितले की, या आजाराची कोणतीही नवीन लक्षणे नसून मुलांना सतत ताप येत आहे आणि फुफ्फुसांत गाठी सिद्ध होत आहेत. काही शिक्षकांनाही हा आजार झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमधून सर्व जगात ‘कोरोना’ महामारी पसरल्यावर जागतिक आरोग्य संघटना जागी झाली आणि उपाययोजना सांगण्यास प्रारंभ केला. ‘कोरोना’चा उगम चीनमधून झाल्याचे स्पष्ट असतांनाही जागतिक आरोग्य संघटनेने चीनला यासाठी कारणीभूत न ठरवता किंवा त्याला न खडसावता सौम्य भूमिकाच घेणे पसंत केले.

आताही प्रसिद्धीमाध्यमांतून वृत्त येण्यास प्रारंभ झाल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने बीजिंगला या आजाराविषयी अधिक माहिती देण्यास सांगितले आहे. खरे पहाता इतक्या मोठ्या संख्येने लहान मुलांना झालेल्या या आजाराचा प्रारंभ काही मासांपूर्वी झाला असणार; मात्र कोरोना महामारीप्रमाणे चीनने ही गोष्ट लपवून ठेवली असणार. कोरोना महामारीच्या काळात जगाला दळणवळण बंदीला सामोरे जावे लागले होते. आता हा ‘व्हायरस’ चीनमधून बाहेर पसरला, तर कोरोना महामारीच्या काळाप्रमाणे जग पुन्हा एकदा दळणवळण बंदीच्या विळख्यात सापडू शकते. गतअनुभव पहाता सार्‍या जगानेच आता एकत्र येऊन चिनी प्रवाशांवर कठोर निर्बंध लादणे यांसह अन्य कठोर निर्णय घ्यावे लागतील. यापुढील वर्ष हे आपत्काळाचेच असणार आहे, हे विविध संत, भविष्यवेत्ते यांनी सांगितलेच आहे. त्यामुळे युद्ध, नैसर्गिक आपत्ती यांसह अनेक गोष्टींना मानवाला सामोरे जावे लागणार आहे. अशा स्थितीत संत सांगत असल्याप्रमाणे साधनाच आपल्याला तारणार आहे !

‘कोरोना’चा गतवेळचा अनुभव पहाता जगानेच आता चीनवर कठोर निर्बंध लादावेत !