रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात स्‍वच्‍छतेची सेवा करतांना साधिकेची झालेली मनाची प्रक्रिया आणि तिला शिकायला मिळालेली सूत्रे

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम
कु. आकांक्षा घाडगे

१. प्रारंभी प्रसाधनगृहाची सेवा करण्‍याची इच्‍छा आणि उत्‍साह नसणे अन् सहसाधिकांनी सेवेतील बारकावे शिकवल्‍यावर उत्‍साहात वाढ होऊन शारीरिक क्षमताही वाढणे

‘११.६.२०२३ या दिवशी सनातनच्‍या रामनाथी, गोवा येथील आश्रमात मी एका सेवेसाठी आले होते. या कालावधीत रामनाथी आश्रमात मला आश्रमातील प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता करण्‍याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना प्रारंभी एक आठवडा मला ती सेवा करण्‍याची इच्‍छा होत नव्‍हती. मला ती सेवा करण्‍याचा उत्‍साह नव्‍हता आणि इच्‍छाही होत नसे, तसेच माझी शारीरिक क्षमताही अल्‍प पडायची. मला थकवा यायचा. त्‍यानंतर सहसाधिकांनी मला या सेवेतील बारकावे शिकवले. त्‍यानंतर हळूहळू ही सेवा करण्‍याचा माझा उत्‍साह वाढू लागला. तेव्‍हा ‘माझी शारीरिक क्षमताही आधीपेक्षा अधिक पटींनी वाढली आहे’, असे माझ्‍या लक्षात आले.

२. सेवा करतांना भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न 

अ. ‘आश्रमातील प्रसाधनगृहाच्‍या स्‍वच्‍छतेसाठी वापरत असलेली प्रत्‍येक वस्‍तू ही गुरुसेवक आहे’, या भावाने मी तिच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करायचे.

आ. ‘प्रसाधनगृहातील प्रत्‍येक वस्‍तू, उदा. ब्रश, साबण किंवा द्रव स्‍वरूपातील साबण (लिक्‍विड सोप), पाणी, बालदी, मग इत्‍यादी नसते, तर मी प्रसाधनगृहाची स्‍वच्‍छता कशी केली असती ?’ असा विचार येऊन त्‍या वस्‍तूंप्रती माझ्‍या मनात कृतज्ञताभाव निर्माण झाला.

इ. ‘या सर्व गुरुसेवक वस्‍तूंमुळे मला या वैकुंठ भूमीमध्‍ये जिथे साक्षात् श्रीमन्‍ननारायण वास करतात, तिथे सेवा करण्‍याची संधी मिळाली आहे’, असा मी भाव ठेवायचे.

ई. ‘ही सेवा करतांना माझे कितीतरी जन्‍मांचे प्रारब्‍ध नष्‍ट होत आहे’, असा विचार मनात येऊन मला प्रत्‍येक वस्‍तूप्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटू लागली.

उ. ‘सेवेतील उत्‍साह टिकून रहावा’, यासाठी आम्‍ही सर्व साधक ‘प्रार्थना, जयघोष करणे, श्रीकृष्‍णाचा श्‍लोक म्‍हणून सेवेला प्रारंभ करणे’, असे भावाच्‍या स्‍तरावरील विविध प्रयत्न प्रतिदिन करत  होतो. त्‍यामुळे आमची सेवा भावपूर्ण होऊन आम्‍हाला सर्वांना सेवेतून आनंद मिळायचा.

ऊ. सेवा झाल्‍यावर आम्‍ही सर्वजण एकत्र बसून सेवेत झालेल्‍या चुका, शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभूती सांगायचो अन् शेवटी कृतज्ञता व्‍यक्‍त करायचो. त्‍यांतून आम्‍हाला सर्वांना पुष्‍कळ शिकायला मिळायचे.

३. शिकायला मिळालेली सूत्रे

अ. या सेवेमुळे बरेच काही शिकता आल्‍याने काही दिवसांनी मला ‘शिबिराच्‍या वेळी सेवेसाठी आलेल्‍या ८ – ९ साधकांचे नियोजन करून त्‍यांना सेवा शिकवणे, सेवेतील बारकावे सांगणे आणि त्‍यांच्‍या समवेत सेवा करणे’, अशा प्रकारच्‍या सेवा करण्‍याचे दायित्‍व गुरुकृपेने मिळाले.

आ. या सेवा करतांना ‘दायित्‍व घेऊन सेवा कशी करायची ? प्रेमभावाने बोलणे, सहसाधकांच्‍या अडचणी समजून घेणे आणि परिपूर्ण सेवा करणे’, हे सर्व मला शिकायला मिळाले.

‘कृपाळू गुरुमाऊली, तुम्‍हीच मला आश्रमसेवा करण्‍याची संधी दिलीत. ही सेवा करतांना तुम्‍हीच माझ्‍यात ‘प्रेमभाव, नेतृत्‍वगुण, शिकण्‍याच्‍या स्‍थितीमध्‍ये रहाणे, इतरांना समजून घेणे’, या गुणांची वृद्धी केली. ‘मला या सेवेतून आनंद दिलात’, त्‍याबद्दल मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. आकांक्षा  ज्ञानेश्वर घाडगे , पुणे (१.८.२०२३ )