१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘संतांना स्वतःची निंदा ऐकून आनंद होतो. जनांना स्वतःची स्तुती ऐकून आनंद होतो. संत नेहमी स्वतःचे दोष पहात असतात. जन नेहमी दुसर्याचे दोष पहात असतात. संत हृदयात असेल, ते बोलून टाकतात; म्हणून त्यांच्या जवळ केव्हाही समाधान नांदते. जन थोडेसे बोलून बाकी शिलकी ठेवतात; म्हणून पदोपदी त्यांचे समाधान हरवते. संतांचे लक्ष आत्म्याकडे असते आणि जनांचे लक्ष देहाकडे असते. संत प्रत्येक वस्तूत आत्मनिरीक्षण करतात आणि जन हे राग, द्वेष, मत्सर, असूया, लोभ, अहंकारादिकांच्या मेळ्यात गोंधळ घालतात.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव
(साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘संत संगती’, सुवचन क्र. ४१)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. निंदेकडे पहाण्याच्या सामान्य लोक आणि संत यांच्या दृष्टीकोनांतील भेद !
२ अ १. इतरांनी आपल्या स्वभावातील दोष सांगितल्यास आपल्याला त्यांचा राग येतो ! : ‘खरेतर आपल्या स्वभावात अनेक दोष असतात. ते आपल्याला ठाऊकही असतात; परंतु ते दोष कुणी आपल्याला बोलून दाखवले, तर मात्र आपल्या मनात राग निर्माण होतो; कारण आपला अहंकार दुखावला जातो. बर्याच वेळा आपण चुकत असतो, तसेच चुकीचे निर्णय घेत असतो. दुसर्याबद्दल ठाऊक नसतांना आपण उगाचच वाईट बोलत असतो आणि हे सर्व कुणी आपल्याला दाखवून दिले, तर मात्र आपल्याला राग येतो; परंतु हा राग अनाठायी असतो.
२ अ २. ‘लोकांत आपली नाचक्की होईल’, या भीतीने आपण आपले दोष सगळ्यांसमोर मान्य करत नाही ! : दुसरा जे बोलतो, ते नेहमीच असत्य नसते. आपल्यातले बरेचसे दोष दुसर्याला ठळकपणे दिसतात; परंतु आपण ते दोष सगळ्यांसमोर मान्य करत नाही; कारण त्यामुळे ‘लोकांत आपली नाचक्की होईल’, अशी भीती आपल्याला सतत वाटत असते. आपण ‘आपले व्यक्तीमत्त्व कसे चांगले आहे ?’, हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो; परंतु लोकांना मात्र दोष बघण्याची सवय असते.
२ अ ३. विविध कारणे देऊन आपण आपल्या दोषांवर पांघरूण घालत असतो ! : आपल्यातील दोष कळल्यामुळे माणूस स्वतःला सुधारू शकतो. ‘दोष मान्य करून आपला स्वभाव सुधारणे’, हे त्याच्या हातात असते; परंतु परिस्थिती किंवा अन्य काही कारणे देऊन तो स्वतःच स्वतःचे संरक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. तो आपल्या दोषांवर पांघरूण घालत असतो. हे सर्व त्याला स्वतःला कळत असते; परंतु वळत नसते.
२ अ ४. संत लोकांनी केलेल्या निंदेतून स्वतःतील दोष दूर करून स्वतःचे व्यक्तीमत्त्व लोककल्याणासाठी चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात ! : संतांना मात्र कुणी निंदा केली, तर ते आवडते. संत म्हणतात, ‘निंदकाचे घर असावे शेजारी !’ ‘निंदकाने केलेली निंदा माझ्यासाठी उपकार ठरेल. मी माझ्यातले दोष काढून टाकीन आणि माझे व्यक्तीमत्त्व लोकांच्या हितासाठी, चांगल्यासाठी अन् उपकारासाठी चांगले बनवण्याचा नेहमीच प्रयत्न करीन’, असे विचार संत करतात आणि म्हणूनच त्यांना ‘संत’ म्हणतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
कोणी निंदा कोणी वंदा । आम्हां स्वहिताचा धंदा ॥
काय तुम्हांसी गरज । आम्ही भजूं पंढरिराज ॥
तुम्हांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥
तुका म्हणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥
– तुकाराम गाथा, अभंग ४२८८
अर्थ : कुणी आमची निंदा करा, कुणी आम्हाला वंदन करा, आमची स्तुती करा. तुम्ही काहीही केले, तरी आम्ही आमचे स्वहित सोडणार नाही. तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही आमच्या पंढरीरायाच्या भजनामध्ये आनंदी आहोत. तुमच्यासारखे जीवन जगणे, म्हणजे स्वतःची हानी करून घेण्यासारखेच आहे. शेवटी संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, ‘आता काहीही झाले, तरी चालेल; कारण आम्ही आमच्या जीवनाचा दोर श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला आहे. आता त्याने आम्हाला कसेही नाचवले, तरी चालेल.’
समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ – मनाचे श्लोक, श्लोक ७
अर्थ : हे मना, नेहमी मोठे धैर्य धारण करावे. कुणी अपशब्द बोलले, तर ते शांतपणे सोसावे. स्वतः मात्र नेहमी नम्रतेने बोलावे आणि आपल्या बोलण्याने इतरांना समाधान द्यावे.
२ अ ५. निंदकाला समोरच्याच्या केवळ चुकाच दिसतात ! : दुसर्याची निंदा करणार्याला समोरच्याच्या केवळ चुकाच दिसतात. माणसातील चांगले गुण त्याला दिसत नाहीत आणि दिसले, तरी ते गुण तो कुणाला सांगत नाही आणि त्या गुणांचे कौतुकही करत नाही. ‘दुसर्याच्या डोळ्यांतील कुसळ दिसते; पण स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही’, तसेच ‘आपला तो बाब्या आणि लोकाचं ते कारटं’, अशा म्हणी मराठीत आहेत.
२ आ. संत हृदयात असलेले बोलून त्याप्रमाणे वागतात, तर लोकांचे बोलणे आणि कृती यांत भेद असतो ! : संतांचा स्वभाव पारदर्शी असतो. ‘हृदयात एक आणि जिभेवर एक’, असे त्यांचे नसते. त्यांच्या हृदयात असते, तेच ते बोलून दाखवतात आणि त्याप्रमाणे वागतातही ! परंतु इतर बर्याचशा लोकांच्या मनात मात्र एक असते आणि ते कृती वेगळीच करतात. त्यामुळे ते लोकांचा विश्वास गमावून बसतात. काही लोक बोलघेवडे असतात. त्यांना बोलायला पुष्कळ आवडते; परंतु हे लोक बोलल्याप्रमाणे कृती करत नाहीत. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
पुढे स्तुति मागे निंदा । स्वल्प अपराधे चढे क्रोधा ।
समयीं जो न मिळे संवादा । तो एक मूर्ख जाणावा ॥
अर्थ : जो लोकांच्या तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा करतो, थोड्याशा कारणानेही ज्याच्या रागाचा पारा चढतो, ज्याच्याशी संवादही साधता येत नाही, तो मनुष्य मूर्ख समजावा.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥
अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥
त्याचा होईंन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥
– तुकाराम गाथा, अभंग ४२९३
अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘स्वतःच्या बोलण्याप्रमाणेच आचरण करणार्या संतांच्या चरणांना मी सदैव वंदन करीन. त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यांच्याकडे झाडलोटही करीन. त्यांचा सेवक होऊन कायम हात जोडून त्यांच्या सेवेत तत्पर राहीन. ‘संत म्हणजे परमेश्वराचेच रूप आहे’, असा माझा भाव आहे.’
काही लोक बाताडे असतात, तर काही लोक थापाडे असतात. काही लोक स्वतःची इतकी स्तुती करतात की, ऐकणार्यालाही ते नकोसे होते. त्यांच्या त्या आत्मस्तुतीचे अजीर्ण होते.
२ इ. यंत्रवत् झालेला आजचा माणूस आणि मनमोकळेपणाने बोलणे अन् वागणे यांचे महत्त्व ! : प.पू. कलावतीआई पुढे म्हणतात, ‘संत आपल्या हृदयात जे काही आहे, ते बोलून मोकळे होतात.’ आजच्या या कलियुगात लोक एकमेकांशी बोलणे विसरले आहेत. भ्रमणभाष, दूरचित्रवाणी आणि इतर वैज्ञानिक प्रगती यांमुळे माणूस यंत्रवत् झाला आहे. माणसे केवळ काम करत रहातात. ती एकमेकांशी संवाद टाळतात. सध्या पत्रलेखनसुद्धा बंद झाले आहे. कुणी कुणाला भ्रमणभाष करत नाही आणि जरी भ्रमणभाष केला, तरी बर्याच वेळा कुणी तो उचलतही नाही. कुणी कुणाकडे जात नाही. कुणी कुणाशी संवाद साधत नाही. यामुळे माणसाच्या मनात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी साचून रहातात आणि एके दिवशी वाईट गोष्टींचा स्फोट होतो अन् त्याचे पर्यवसान हत्या किंवा आत्महत्या यांत होते; म्हणून माणसाने आपल्या हृदयातील सुख असो किंवा दुःख, ते आपले मित्र, नातेवाईक, आपल्यावर प्रेम करणारे लोक, आपल्याबद्दल आस्था असणारे लोक यांना बोलून दाखवले पाहिजे, म्हणजे आपले मन मोकळे होते.
रडू आले, तर खुशाल रडले पाहिजे. हसू आले, तर खुशाल हसले पाहिजे. आजकाल हसणे तर दुरापास्त झाले आहे. आजकाल कुणी हसतांना दिसत नाही. ‘हसणे’ ही एक उपचारपद्धत (थेरपी) झाली आहे. जागोजागी ‘हास्य क्लब’ निघाले आहेत. त्या हास्य क्लबमध्ये बरीच माणसे येतात आणि जोरजोरात कृत्रिम हसतात; परंतु ‘त्यामुळे त्यांच्या मनाचे समाधान होते का ?’, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘बोलणे, गप्पा मारणे, हसणे, रडणे, नाचणे, गाणे, गायन ऐकणे, हास्यविनोद करणे’, या कृतींना आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनवले पाहिजे. जीवन मजेत आणि मोकळेपणाने जगता आले पाहिजे.
२ ई. ‘देह नाशिवंत आहे’, हे ओळखून स्वस्वरूपाकडे लक्ष देणे आवश्यक ! : प.पू. कलावतीआई पुढे म्हणतात, ‘संतांचे लक्ष आत्म्याकडे असते आणि जनांचे लक्ष देहाकडे असते.’ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, ‘माणसाने देहबुद्धी सोडली पाहिजे. ‘हा देह म्हणजेच आपण आहोत’, हा विचार टाकून दिला पाहिजे. ‘आपण या देहात काही वर्षेच वास करणार आहोत’, हे लक्षात ठेवले पाहिजे आणि आपल्या आत्म्याकडे, म्हणजेच स्वस्वरूपाकडे लक्ष दिले पाहिजे.’
संत तुकाराम महाराज म्हणतात,
नाशीवंत देह नासेल हा जाणा ।
का रे उच्चाराना वाचे नाम ॥ – तुकाराम गाथा, अभंग ९९४
अर्थ : हे लोकांनो, ‘हा देह नाशिवंत’ आहे’, हे ओळखून तुम्ही मुखाने हरिनाम का घेत नाही ?
आपण जीवनात ईश्वरी उपासनेला योग्य ते महत्त्व दिले पाहिजे. आपण आपल्या अस्तित्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
२ उ. ‘आत्मपरीक्षण’ आणि ‘आत्मनिवेदन’ या दोन गोष्टी संतांच्या जीवनात विशेषत्वाने आढळतात ! : प.पू. कलावतीआई पुढे म्हणतात, ‘संत आपले आत्मपरीक्षण करत असतात; पण सामान्यजन हे द्वेष, असूया, मत्सर, अहंकार आणि क्रोध यांमध्ये लपेटलेले असतात.’ आत्मपरीक्षणाने आपल्यातील दोष आपल्याला कळतात. हे स्वभावदोष घालवण्यासाठी आपण प्रयत्न करत रहातो. ‘आत्मपरीक्षण’ आणि ‘आत्मनिवेदन’ या दोन गोष्टी संतांच्या जीवनात विशेषत्वाने आढळतात. संत स्वतःची स्तुती कधीच करत नाहीत. उलट कुणी जर निंदा केली, तर ते त्यांना आवडते.
२ ऊ. सामान्य माणसाने आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे ! : सामान्यजनांना मात्र सतत त्यांचे कुणीतरी कौतुक करावेसे वाटते. त्यांना ‘आपल्यातील गुणांचे पैसा, सत्ता, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी यांमध्ये परिवर्तन व्हावे’, असे वाटते. कुणी निंदा केली किंवा कुणी टाकून बोलले, तर सामान्य लोकांना राग येतो आणि दुःख होते. अशा प्रकारे ते सुख-दुःखाच्या भोवर्यात सापडतात आणि जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये फिरत रहातात; म्हणून ‘माणसाने आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे’, असे प.पू. कलावतीआई सांगतात.
थोडक्यात, ‘जसे बोलावे तसे वर्तन करावे, आत्मपरीक्षण करावे, जीवनाचा आनंद घेत रहावा आणि आपल्या मनातील भावना सर्वांना मोकळेपणे सांगाव्यात’, असा उपदेश प.पू. कलावतीआई करतात.’
– पू. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२३.८.२०२३)