मथुरेतील बांके बिहारी मंदिर मार्गाला (‘कॉरिडॉर’ला) उच्च न्यायालयाची अनुमती !

५ एकर भूमीवर बांधणार मार्ग !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिर मार्गाला (‘कॉरिडॉर’ला) अलाहाबाद उच्च न्यायालयाने संमती दिली. याखेरीज कुंज रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा आदेशही देण्यात आला आहे; मात्र त्याच वेळी मंदिराच्या बँक खात्यात जमा झालेली २६२ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम हा मार्ग बांधण्यासाठी वापरण्याची अनुमती सरकारला दिली नाही. सरकारने स्वतःचा पैसा यासाठी वापरावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. उत्तरप्रदेश सरकार मंदिराभोवती ५ एकर भूमीवर हा मार्ग बनवणार आहे.

न्यायालयाने सांगितले की, सरकार प्रस्तावित योजनेनुसार पुढे जाऊ शकते; परंतु दर्शनासाठी येणार्‍यांना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागू नये. एकदा अतिक्रमण हटवल्यानंतर या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही आणि मंदिराच्या प्रवेशाच्या रस्त्यांवर कोणताही अडथळा येणार नाही, याची सरकारने दक्षता घ्यावी.

जनहित याचिकेवर न्यायालयाने दिला निर्णय !

अनंत शर्मा, मधुमंगल दास आणि इतरांच्या वतीने वर्ष २०२२ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. सर्वसाधारण दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या ४० ते ५० सहस्र असल्याचे सांगण्यात आले; पण शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी ही संख्या दीड ते अडीच लाखांपर्यंत पोचते. सण आणि शुभ दिवस यांवेळी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या अनुमाने ५ लाखांपर्यंत पोचते. मंदिराकडे जाणारे रस्ते अतिशय अरुंद आहेत. त्यामुळे प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीस अनेक अडचणी येत आहेत. अरुंद रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेकदा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. अलीकडे काही लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. गर्दीच्या वेळी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरते. यानंतरही उत्तरप्रदेश सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. याप्रकरणी राज्य सरकारला योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत, असे आवाहन करण्यात आले होते.

कसा असेल मार्ग (कॉरिडॉर) ?

१. यमुनेच्या बाजूने येणारा रस्ता २ सहस्र १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा असेल. या मार्गावरून ये-जा करणार्‍यांसाठी २ भागांत ‘कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे. एक खालचा भाग असेल आणि दुसरा त्याच्या वर अनुमाने ३.५ मीटर असेल, ज्यावर एक उतार बांधला जाईल.

२. दोन्ही भागांमध्ये प्रसाधनगृह, सामान ठेवण्याची खोली, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बाल संगोपन कक्ष, वैद्यकीय व्यवस्था, महनीय व्यक्तींसाठी खोल्या आणि यात्रेकरूंसाठी प्रतीक्षालय बांधण्यात येणार आहे. कॉरिडॉरचा खालचा भाग अनुमाने ५ सहस्र चौरस मीटर, तर वरचा भाग अनुमाने ६५० चौरस मीटर असेल.

३. कॉरिडॉरच्या खालच्या भागात अनुमाने ८०० चौरस मीटर परिसरात पूजा साहित्याची दुकाने बांधली जाणार आहेत. कॉरिडॉर करण्यासाठी जी दुकाने पाडली जातील, त्यांना येथे दुकान दिले जाणार आहे.

४. यमुना द्रुतगती मार्गावरून येणार्‍या भाविकांसाठी बांके बिहारी पुलाचे वाहनतळ ३७ सहस्र चौरस मीटरमध्ये सिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये अनुमाने ११ सहस्र चौरस मीटर क्षेत्रफळ विकसित करण्यात येणार आहे. येथे एकावेळी अनुमाने १ सहस्र ५५० वाहने उभी  करणे शक्य होणार आहे.