|
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे श्रीरामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरातील पुजारी पदासाठी आतापर्यंत ३ सहस्र अर्ज आले आहेत. त्यांतील २०० जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. या सर्वांच्या मुलाखती येथील ‘कारसेवक पूरम्’मध्ये होत आहेत. वृंदावनचे जयकांत मिश्रा, अयोध्येतील महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि महंत सत्यनारायण दास यांच्या गटाकडून या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत, अशी माहिती श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरि महाराज यांनी दिली. २२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
स्वामी गोविंद देव गिरि महाराज पुढे म्हणाले की, या २०० उमेदवारांमधून २० जणांची निवड करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांना ६ मासांच्या प्रशिक्षणानंतर ‘पुजारी’ म्हणून नियुक्त करण्यात येईल. त्यांची विविध पदांवर निवड केली जाईल. विशेष म्हणजे ज्या लोकांची निवड झाली नाही, अशांनाही प्रशिक्षणामध्ये सामावून घेतले जाईल. या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या उमेदवारांना भविष्यात संधी दिली जाऊ शकते. उमेदवारांचे प्रशिक्षण ज्येष्ठ संतांद्वारे बनवण्यात आलेल्या धार्मिक अभ्यासक्रमाच्या आधारे घेतले जाईल. या काळात उमेदवारांना विनामूल्य जेवण, निवासस्थान आणि २ सहस्र रुपये भत्ता मिळेल.
या मुलाखतीत उमेदवारांना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. यात संध्या वंदन काय आहे ? हा विधी कसा केला जातो ?, त्या पूजेसाठी कोणता मंत्र आहे ? प्रभु श्रीरामाच्या पूजेसाठी कोणता मंत्र आहे ?, त्यासाठी कर्मकांड काय आहे ?, आदी प्रकारचे प्रश्न विचारण्यात येत आहेत.
पुजारी पदासाठी काय आहे पात्रता ?
पुजारी पदासाठी अर्ज मागवतांना पात्रता निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज करणारे २० ते ३० या वयोगटांतील असावेत. त्यांनी गुरुकुलातून ‘रामानंदीय दीक्षा’ घेऊन ते दीक्षित आणि प्रशिक्षित असले पाहिजेत.
रामानंदीय संप्रदायानुसार असेल पूजा पद्धत !
या श्रीराममंदिरातील पूजापद्धत ही सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल. ही पद्धत रामानंदीय संप्रदायानुसार होईल. या पूजेसाठी विशेष अर्चक असतील. आतापर्यंत श्रीरामजन्मभूमी संकुलात असलेल्या तात्पुरत्या मंदिरात पूजा करण्याची पद्धत अयोध्येतील इतर मंदिरांप्रमाणेच पंचोपचार पद्धत आहे; परंतु २२ जानेवारी २०२४ ला श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वकाही पालटण्यात येणार आहे. रामानंदीय पूजा पद्धतीत श्री रामललाची पूजा करण्याची पद्धत असेल. यामध्ये वस्त्रे परिधान करण्याच्या पद्धतीसह पूजेच्या अनेक गोष्टी निश्चित केल्या जाणार आहेत. श्री हनुमान चालीसाप्रमाणेच श्री रामललाची स्तुती करण्यासाठी नवीन पोथी असेल. त्याची रचना करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आहे. यासह स्वामी गोविंद देव गिरि महाराजांनी सांगितले की, पूजा पद्धतीसाठी नवीन पोथी बनवत आहोत. यात सर्व शास्त्रांतील माहिती एकत्र केली जात आहे. यात वेद, आगम आणि रामानंदीय उपासना, या पद्धतींचाही समावेश आहे.
संपादकीय भूमिकापुजारी म्हणून नियुक्त करणार्यांमध्ये भाव आहे का ? ते साधना करत आहेत का ? नियुक्तीनंतर ते भावपूर्ण आणि परिपूर्ण पूजा करतील का ? कि कर्मकांड म्हणून त्यांच्याकडून उरकण्याचा भाग होईल ? या सर्व गोष्टींकडे पाहिले पाहिजे ! |