१. घरून आश्रमात येतांना आलेली अनुभूती
मी बाहेर कुठे गेले की, मला शारीरिक त्रास होतो. माझे डोके पुष्कळ दुखते आणि थकवा येतो. घरापासून आश्रमापर्यंतचा प्रवास ३० घंट्यांचा होता; मात्र पूर्ण प्रवासात माझे डोके दुखले नाही.
२. मला आश्रमात आल्यावर भूवैकुंठाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्या वेळी संपूर्ण वातावरण चैतन्यदायी होते. मला हलकेपणा जाणवत होता.
३. आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
अ. साधिका आश्रमाविषयी माहिती सांगत असतांना माझ्या शरिरावर रोमांच येत होते.
आ. ताई श्री विद्याचौडेश्वरीदेवीने लिहिलेले अक्षर दाखवत असतांना मला गारवा जाणवत होता. त्या वेळी माझा भाव जागृत झाला. मी प्रथमच भावजागृती अनुभवत होते.
इ. स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र सजीव भासणे : स्वागतकक्षात असलेले श्रीकृष्णाचे चित्र पहातांना ‘श्रीकृष्णाच्या ओठांपासून ते कंठापर्यंतचा भाग श्वास घेतल्याप्रमाणे हलत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘श्रीकृष्ण माझ्याशी काहीतरी बोलेल’, असे मला वाटत होते. मला श्रीकृष्णाचे चित्र सजीव भासले.
ई. संपूर्ण आश्रम पहात असतांना माझी भावजागृती होत होती. ‘सद़्गुरु, संत आणि साधक यांच्या माध्यमातून देवतांचे दर्शन झाले’, असे मला वाटले.
४. आश्रमात आल्यानंतर व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले होऊ लागणे
आश्रमात आल्यापासून माझ्याकडून ‘नामजप करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे’ यांसाठी प्रयत्न आपोआप होऊ लागले. मी सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करत होते. माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होऊ लागला. मी निर्विचार स्थिती अनुभवत होते.
५. सुगंधाची अनुभूती येणे
एकदा आश्रमात सभोवती कुठलीही फुले नसतांना मला दिवसभर गुलाबाचा सुगंध येत होता. त्याच दिवशी सायंकाळी माझी पू. अशोक पात्रीकर यांच्याशी भेट झाली.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात आणि सत्संग झाल्यानंतर आलेल्या अनुभूती
अ. एकदा मला गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. त्या वेळी मला गुरुदेवांच्या कपाळावर गुलाबी रंगाच्या कमळाच्या फुलाप्रमाणे आकार दिसत होता. मी ते पुनःपुन्हा पहाण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी ‘मला ते खरंच दिसत आहे ना ?’, असे वाटले. सत्संग संपेपर्यंत मला पूर्णवेळ गुरुदेवांच्या कपाळावर कमलपुष्प दिसत होते. माझा केवळ गुरुदेवांचे रूप डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न होत होता.
आ. सत्संगात माझे मन निर्विचार होते.
इ. ‘माझ्या शरिरावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.
ई. सत्संगानंतर मला पुष्कळ आनंद झाला आणि थंडावा जाणवू लागला.
७. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. प्रीती : ‘इतरांवर निरपेक्ष प्रेम करणे आणि ‘मी’पणा दूर ठेवून इतरांचा विचार करणे’, या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. पूर्वी माझ्यातील अहंमुळे माझ्याकडून इतरांचा विचार होत नव्हता. मला प्रेम व्यक्त करता येत नव्हते. आश्रमातील साधकांकडून मला ‘प्रीती’ हा गुण शिकायला मिळाला.
आ. प्रत्येक कृती भावपूर्ण करणे : ‘भाव ठेवून कृती केल्याने त्यातून आपल्याला आनंद घेता येतो. भाव ठेवून कपडे शिवल्यास शिवलेल्या वस्त्रात सात्त्विकता येते’, हे माझ्या लक्षात आले. मला शिवणकलेतील बारकावे शिकण्याची संधी मिळाली.
इ. प्रार्थना करण्याचेे महत्त्व लक्षात येणे : मी ग्रंथांशी संबंधित सेवा करत असतांना ‘गुरुदेवांना प्रार्थना करून सेवा केल्यास ती सेवा अल्प वेळेत पूर्ण होते’, असे माझ्या लक्षात आले. मला प्रार्थना करण्याचे महत्त्व समजले.
ई. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात आढावासेविका सांगत असलेले दृष्टीकोन ‘मनःपूर्वक लक्ष देऊन कसे ऐकायचे ?’, हे माझ्या लक्षात आले.
८. आश्रमात आल्यानंतर स्वतःत जाणवलेले पालट
अ. ‘मला शिवणकाम येते’, असा अहं होता; मात्र आश्रमात आल्यावर माझ्यातील अहं दूर झाला. मला जाणीव झाली की, मी ‘शून्य’ आहे.
आ. माझी प्रत्येक वस्तूप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती.
इ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असल्यामुळे स्वभावदोषांवर मात करता येणे : मी आश्रमात येण्याच्या आधी माझ्या मनात सतत नकारात्मक विचार असत; मात्र मी आश्रमात असतांना संपूर्ण एक मासाच्या कालावधीत मन निर्विचार होऊन मी सेवेत रमले. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असल्यामुळे माझ्याकडून स्वभावदोषांवर मात करण्याचे प्रयत्न होऊ लागले. साधकांकडून फलकावर लिहिल्या जाणार्या चुका मी वाचत होते. त्यामुळे मला माझ्याकडून होणार्या चुका आणि माझ्यातील स्वभावदोष लक्षात येण्यास साहाय्य झाले. ‘गुरुदेवांना आवडेल’, अशीच सेवा करण्याकडे माझे लक्ष होते.
९. ‘गुरुदेव सर्वांची काळजी घेतात’, असे अनुभवणे
परात्पर गुरुदेवांनी मला अनेक अनुभूती दिल्या. माझे बाबा अनुमाने ४ मासांपासून विनाकारण घरी होते. ते कामाला जात नव्हते. मी आश्रमात येण्याच्या आदल्या दिवसापासून ते कामाला जाऊ लागले. तेव्हा ‘भगवंत प्रत्येकाची कशी काळजी घेतो !’, हे मी अनुभवले.
१०. ‘साधना केल्यामुळे घरातही सकारात्मक पालट होतात’, हे लक्षात येणे
पूर्वी घरातील वातावरण पुष्कळ नकारात्मक होते, तसेच घरात एक प्रकारचा दाब जाणवत होता. मी घरी गेल्यावर नामजपादी उपाय करायला आणि भ्रमणभाषवर स्तोत्रे अन् भजने लावायला आरंभ केला. तेव्हापासून घरातील देवघराकडे पाहिल्यावर मला पुष्कळ प्रसन्न वाटते.
‘गुरुमाऊली, मला तुमच्या चरणांशी ठेवा. तुम्ही माझ्या जीवनात आलात. आता मला कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नाही. ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटते. कृतज्ञता !’
– कु. शिवानी हिराचंद कांबळे ,चंद्रपूर (२५.५.२०२३ )