१. वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधांची अनुभूती येणे
१ अ. स्वतःच्या आज्ञाचक्रासमोर हात धरल्यावर सुगंध येणे
१. ‘मी नामजपादी उपाय करत असतांना आज्ञाचक्रासमोर हात धरल्यावर मला स्पंदने जाणवत असत. माझ्या आज्ञाचक्रातून गरम वाफा आणि दैवी सुगंधही येत असे. तेव्हा ‘माझे आज्ञाचक्र जागृत झाले आहे’, असे मला जाणवायचे. तो सुगंध कधी १५ मिनिटे, कधी ३० मिनिटे, तर कधी १ घंटा टिकून रहात असे.
२. जेव्हा मी आज्ञाचक्रासमोर हात धरत असे, तेव्हा मला मंद सुगंधाची अनुभूती येत असे. हा सुगंध वेगळ्या प्रकारचा असे.
१ आ. सेवा आणि नामजप करतांना, तसेच खोलीत बसून लिखाण करतांना मला सुगंध जाणवत असे.
१ इ. उदबत्तीचा सुगंध येणे : मे २०२१ मध्ये एकदा सर्व प्रयत्न करूनही मला मोकळेपणा वाटत नव्हता. नंतर मी कागदावर माझ्या मनातील विचार लिहायला आरंभ केला. सूत्रेे लिहितांना मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी उदबत्ती पेटल्याप्रमाणे जाणवत होते. नंतर त्याचे प्रमाण वाढत गेलेे. माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी आग आग झाली. त्यातून मला उदबत्तीचा पुष्कळ सुगंध येत होता. तो सुगंध १ घंटा टिकून होता. तेव्हापासून मला उदबत्तीच्या सुगंधाची अनुभूती येऊ लागली. एकदा मला रात्री १२.३० नंतरही उदबत्तीचा सुगंध आला होता.
१ ई. अत्तराचा सुगंध येणे
१ ई १. सेवा करतांना उजव्या हाताच्या मध्यभागी अत्तराचा सुगंध आपोआप येऊ लागणे : एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकाची सेवा करत होते. मी सेवेशी पूर्णपणे एकरूप होण्यासाठी प्रयत्न करत असतांना मला गारवा जाणवला. मी कधीच अत्तर लावत नाही. अत्तर लावले की, मला श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे मी पुष्कळ वर्षांपासून अत्तर लावलेलेे नाही. त्या दिवशी माझ्या उजव्या हाताच्या मध्यभागी सुगंध आपोआपच येऊ लागला. मी सेवा झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करत असतांना तो सुगंध वाढला. मला हा सुगंध रात्री झोपेपर्यंत येत होता.
१ ई २. घसा दुखत असतांना रात्री झोपतांना अत्तराचा तीव्र सुगंध येणे : त्यानंतर एकदा मला बरे वाटत नव्हते. माझा घसा दुखत होता. तेव्हा रात्री झोपतांना मला अत्तराचा तीव्र सुगंध येत होता. त्या वेळी श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तो सुगंध मला नकोसा वाटत होता. त्यामुळे मला झोप लागत नव्हती. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर मला लगेच झोप लागली. हा सुगंध १ घंटा येत होता.
२. गारवा जाणवणे
परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण झाले की, मला काहीही करतांना सभोवताली वातानुकूल यंत्र असल्याप्रमाणे गारवा जाणवतो. अशी अनुभूती मला सेवा करतांना, स्वभावदोष निर्मूलनाच्या सारणीचे लिखाण करतांना आणि अन्य ठिकाणीही यायची. जुलै २०२१ पासून मला कधी कधी माझ्या डोक्यावर गारवा जाणवतोेे. या सर्व अनुभूती लिहितांना मला माझ्या डोक्यावर गारवा जाणवत होता.
३. अंतर्मनातून जप ऐकू येणे
एकदा मला अंतर्मनातून जप ऐकू येत असल्यासारखे वाटत होते. प्रत्यक्षात कुणीही भ्रमणभाषवर जप लावला नव्हता. मी या अनुभूतीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होते आणि मला गुरुचरणी कृतज्ञताही वाटत होती. ‘देव मला अनुभूतींच्या माध्यमातून साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जात आहे’, असे मला जाणवले.’
– कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा. (२६.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |