डॉ. विजय अनंत आठवले आणि त्‍यांची कन्‍या कु. अनघा विजय आठवले यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम आणि आश्रमातील साधक यांंची उलगडलेली वैशिष्‍ट्ये !

कु. तेजल पात्रीकर यांनी डॉ. विजय आठवले (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पुतणे आणि सनातनचे १०१ वे संत पू. अनंत बाळाजी आठवले यांचे पुत्र) आणि त्‍यांची कन्‍या कु. अनघा यांच्‍याशी ‘आध्‍यात्मिकदृष्‍ट्या उन्‍नत आठवले परिवार’ याविषयी केलेला वार्तालाप !

‘२२.७.२०२२ या दिवशी सनातनचे १०१ वे संत पू. अनंत बाळाजी आठवले (पू. भाऊकाका) यांचे पुत्र डॉ. विजय आठवले आणि त्‍यांची कन्‍या कु. अनघा विजय आठवले हे रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. त्‍या वेळी त्‍यांच्‍याशी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.) यांनी संवाद साधला. तेव्‍हा त्‍यांनी सांगितलेली सनातन संस्‍था, रामनाथी आश्रम आणि सनातनचे साधक यांची वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

पू. अनंत आठवले

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : आपण (डॉ. विजय आठवले) आणि आपली कन्‍या अनघा (डॉ. विजय आठवले यांची कन्‍या) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात अनेक वेळा येऊन गेला आहात. तेव्‍हा आपण आम्‍हाला आश्रमाविषयी जाणवलेली काही सूत्रे सांगावीत. गुरुदेवांनी ठिकठिकाणी सर्व साधकांना साधना करण्‍यासाठी असे आश्रम बनवले आहेत, तर या त्‍यांच्‍या कार्याविषयी आपल्‍याला काय जाणवले ?

१. डॉ. विजय आठवले यांना सनातन संस्‍था, रामनाथी येथील सनातनचा आश्रम आणि आश्रमातील साधक यांंची जाणवलेली वैशिष्‍ट्ये !

डॉ. विजय आठवले

१ अ. सनातनचा प्रसार घराघरात झाला असणे

डॉ. विजय आठवले : मला सोलापूरमध्‍ये येऊन ४ मास झाले. सोलापूरमध्‍ये सनातनचेे एक छोटेसे सेवाकेंद्र आहे. तेथे साधक आहेत, हे मला पूर्वीपासूनच ठाऊक होते. नंतर हळूहळू माझ्‍या लक्षात आले की, प्रत्‍येक दुसर्‍या किंवा तिसर्‍या घरात ‘सनातन’ची दिनदर्शिका लावलेली दिसते. आता सनातन पुष्‍कळ लोकांना ठाऊक झाले आहे. पुष्‍कळ लोकांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांविषयी माहिती आहे.

१ आ. आश्रमातील साधक स्‍वभावदोष हसतहसत स्‍वीकारत असणे : रामनाथी आश्रमाविषयी बोलायचे झाले, तर अनेक साधक येथे सेवा करतात. समाजातील लोक स्‍वभावदोष न्‍यून करण्‍यासाठी आयुष्‍यभर प्रयत्न करतात; परंतु ते स्‍वभावदोष नियंत्रित ठेवू शकत नाहीत आणि स्‍वतःतील स्‍वभावदोष काही प्रमाणातच घालवू शकतात; परंतु आश्रमातील साधक स्‍वत:च्‍या चुका हसत हसत स्‍वीकारतात.

१ इ. आश्रमातील साधक प्रत्‍येक कृृती सेवाभावाने करत असल्‍याने त्‍यांच्‍या चेहर्‍यावर सतत आनंद दिसणे : साधकांना कोणतेही काम सांगितले, तरी ते सेवाभावाने करतात. त्‍यांचे ‘सेवा कुणी दिली’, याकडे लक्ष नसते. मिळालेली सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे, एवढाच त्‍यांचा उद्देश असतो. मी कितीतरी शहरांमध्‍ये राहिलो, तर तेथे असे क्‍वचितच दिसून येते. साधक नेहमी आनंदी दिसतात. कुणालाही कसलाही ताणतणाव नसतो. येथील प्रत्‍येक व्‍यक्‍ती प्रफुल्लित असते.

कु. तेजल पात्रीकर

२. साधनेमुळे सर्व साधक आनंदी दिसणे

कु. तेजल पात्रीकर : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना साधना शिकवली आहे. त्‍यामुळे सर्व साधक आनंदी दिसतात. त्‍यांना आतून जो आनंद होत असतो, तो त्‍यांच्‍या चेहर्‍यावर दिसून येतो. आनंद कुणीही चेहर्‍यावर ओढून ताणून आणू शकत नाही.

डॉ. विजय आठवले : हो. आनंद कुणीही ओढून ताणून दाखवू शकत नाही.

कु. तेजल पात्रीकर : पुष्‍कळ हितचिंतक आश्रम पहायला येतात, तर तेसुद्धा हेच वैशिष्‍ट्य सांगतात. मागे एक कलाकार आले होते. त्‍यांनी आम्‍हाला सांगितले, ‘‘खोटे खोटे हसायचे असले, तरी एवढा वेळ कुणी हसू शकत नाही; कारण त्‍याचे तोंड दुखून जाईल. आतून जे हास्‍य आहे, सर्वांना जो आनंद मिळतो, तो आम्‍हाला येथे शिकायला मिळाला.’’ आम्‍हाला ही गुरुदेवांची देणगीच आहे.

३. कृष्‍णच गुरुरूपात मिळाला असल्‍यानेकृष्‍णासारखे हास्‍य सर्वांच्‍या चेहर्‍यावर दिसणे

डॉ. विजय आठवले : चित्रातील भगवान कृष्‍णाच्‍या चेहर्‍यावर स्‍मितहास्‍य असते. तसेच हास्‍य सर्वांच्‍या चेहर्‍यावर असते.

कु. तेजल पात्रीकर : आम्‍हाला कृष्‍णच गुरुरूपात मिळाला असल्‍यामुळे साधक सतत आनंदी दिसतात. अनघा, तू काही सांगणार का ?

४. आश्रमात आल्‍यावर ‘वेगळ्‍याच जगात आले आहे’, असे वाटणे ! –  कु. अनघा आठवले

कु. अनघा आठवले

अ. आश्रमात आल्‍यावर ‘मी एका वेगळ्‍याच जगात आले आहे’, असे मला वाटते. येथे सर्व जण व्‍यस्‍त असतात. सर्वांच्‍या चेहर्‍यावर हास्‍य असते. साधकांना जी सेवा दिलेली असते, ती ते आनंदाने करतात.

आ. साधकांना त्‍यांची चूक सांगितली, तर ती स्‍वीकारतांना त्‍यांना जराही लाज किंवा हीन भावना असल्‍याचे जाणवत नाही. आश्रमात येताक्षणीच ‘हे एक निराळेच जग आहे. येथे सर्वकाही एकदम चांगले चालू आहे. सर्व लोक आनंदी आणि पुष्‍कळ चांगले आहेत’, असे जाणवते.

इ. बाहेरचे जग निराळेच आहे. तेथे लोक दुःखी आहेत. सगळीकडे लढाया, भांडणे चालू आहेत. आश्रमातील एका परिपूर्ण अशा जगाची कुणी कल्‍पनाच करू शकत नाही.

५. श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी या मंदिरांत अधिक प्रमाणात शांत वाटणे

कु. तेजल पात्रीकर : हो. आता तुम्‍ही संपूर्ण आश्रम पाहिला. संपूर्ण आश्रम आपण फिरलात, तर तुम्‍हाला इथे सर्वार्ंत अधिक कुठे चांगले वाटले ?

कु. अनघा आठवले : मला संपूर्ण आश्रमातच पुष्‍कळ चांगले वाटले. आश्रमात शांत आणि चांगलेच वाटले. आज श्रीसिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतलेे. तेथे अधिक प्रमाणात शांत वाटले. मला संपूर्ण आश्रमातील  प्रत्‍येक साधकाला भेटल्‍यावर त्‍याच्‍या चेहर्‍यावरचे हास्‍य पाहून, समाधान पाहून पुष्‍कळ चांगले वाटलेे.


डॉ. विजय आठवले यांनी सांगितलेली आठवले परिवाराची वैशिष्‍ट्ये !

कु. तेजल पात्रीकर : पू. भाऊकाकांविषयी (पू. अनंत बाळाजी आठवले यांच्‍याविषयी) आम्‍हाला थोडे सांगा.

१. नोकरी करत असतांना ‘लवकरात लवकर नोकरीला राम राम करून आपला वेळ वाचन, अध्‍यात्‍म आणि ध्‍यान लावण्‍यात घालवावा’, अशी त्‍यांची इच्‍छा असणे

डॉ. विजय आठवले (पू. भाऊकाकांचे पुत्र) : पू. भाऊकाका, म्‍हणजे माझे वडील नियमितपणे पूजा करत होते. त्‍यांच्‍या जीवनकाळात त्‍यांना उपजीविकेसाठी नोकरी करावी लागली. त्‍यामुळे तेसुद्धा नोकरी करत होतेे. त्‍यांचा अध्‍यात्‍म आणि ज्‍योतिष यांवर विश्‍वास होता अन् त्‍यांचे वाचनही पुष्‍कळ होते; परंतु ‘लवकरात लवकर नोकरीला ‘राम राम’ करून स्‍वतःचा वेळ वाचन, अध्‍यात्‍म यांत घालवावा आणि ध्‍यानधारणा करावी’, अशी त्‍यांची इच्‍छा होती.

२. पू. भाऊकाकांनी कार्यालयात नोकरी करत असतांना अत्‍यंत प्रामाणिक आणि निष्‍कलंक जीवन जगणे

कु. तेजल पात्रीकर : आपण पू. भाऊकाकांविषयी सांगितले. आता ते संतपदावर विराजमान आहेत; परंतु संत होण्‍याच्‍या आधी ते कार्यालयात नोकरी करत होते. त्‍या वेळी त्‍यांचे जीवन कसे होते ?

डॉ. विजय आठवले : माझे वडील प्रामाणिकपणे जीवन जगले. मी चांगल्‍या इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत शिकलो, असेही नाही. मी शासकीय शाळांमध्‍ये शिक्षण घेतले आहे.

डॉ. विजय आठवले : माझे वडील स्‍थापत्‍य अभियंता होते. त्‍यांनी शासकीय कार्यालयात स्‍थापत्‍य अभियंता म्‍हणून नोकरी केली. स्‍थापत्‍य अभियंत्‍यांविषयी लोकांच्‍या मनात एक विशिष्‍ट प्रतिमा निर्माण झालेली असते. तेेथे पुष्‍कळ भ्रष्‍टाचार असतोेे; परंतु त्‍यांच्‍या (वडिलांच्‍या) संदर्भात असे मुळीच नव्‍हते. ते प्रमुख अभियंता (चिफ इंजिनीयर) म्‍हणून निवृत्त झाले; परंतु त्‍यांची कधी कसलीही चौकशी झाली नाही. त्‍यांना नोकरीच्‍या कालावधीत कधी ‘कारणे दाखवा’, अशी नोटीस (सूचना) आली नाही. त्‍यांच्‍यामुळेच आम्‍हाला थोडक्‍यात समाधान मानून जगण्‍याची सवय लागली.

डॉ. विजय आठवले : त्‍यांना शासनाकडून गाडी मिळाली होती. तेव्‍हा चालकांमध्‍ये ‘साहेबांचा चालक कोण होणार ?’, अशी आपापसात स्‍पर्धा असायची; कारण सुटीच्‍या दिवशी ते चालकाला बोलावत नव्‍हते. त्‍यांनी शासकीय गाडीचा वैयक्‍तिक कारणासाठी कधीच उपयोग केला नाही. स्‍वतःच्‍या वैयक्‍तिक कामासाठी त्‍यांनी एक दुचाकी (स्‍कूटर) घेतली होती. साधे रहाणीमान आणि आहे त्‍या परिस्‍थितीत समाधानाने जगणे, असा त्‍यांचा जीवन जगण्‍याचा सिद्धांत होता.

३. पदोन्‍नती झाल्‍यावर कार्यालयातील दायित्‍व वाढणे; परंतु या धावपळीच्‍या जीवनातही देवपूजा आणि नामस्‍मरण चालू असणे

कु. तेजल पात्रीकर : ‘त्‍यांचे जीवन कर्मयोग्‍यासारखे होते’, असे लक्षात आले.

डॉ. विजय आठवले : ते नेहमी कार्यालयीन वेळेच्‍या आधी पोचत असत. नंतर कार्यालयातील सर्व ‘फाईल्‍स’ पूर्ण करूनच घरी यायचे. त्‍यामुळे त्‍यांना घरी येण्‍यास विलंब होत असे. ते अभियंता असल्‍यानेे त्‍यांना प्रत्‍यक्ष कामाच्‍या  ठिकाणी (‘साईट’वर) जावे लागायचे. त्‍यांची पदोन्‍नती झाल्‍यावर त्‍यांचे कार्यालयीन दायित्‍वही वाढत गेले. ते म्‍हणायचे, ‘‘प्रत्‍येक काम व्‍यवस्‍थित व्‍हावे’, असे वाटत असेल, तर ‘खालपासून कुणाचे चुकीचे प्रस्‍ताव येत नाहीत ना ?’, हे पहावे लागते. तसा वचक ठेवावा लागतो.’’ हे पहायला त्‍यांना अधिक वेळ लागत असे.

कु. तेजल पात्रीकर : या सर्व धावपळीच्‍या जीवनातही ते देवपूजा आणि नामस्‍मरण करत होते ना ?

डॉ. विजय आठवले : हो. पूजा करणे आणि सतत नामजप करणे, हे त्‍यांचे चालू होते. आमच्‍याकडे सत्‍यनारायणाची पूजा, महाशिवरात्र हे सर्व होत असे.

४. पू. भाऊकाकांना हा संस्‍कारांचा वारसा त्‍यांच्‍या आई-वडिलांकडून आलेला असणे

कु. तेजल पात्रीकर : याविषयीही एक उत्‍सुकतेने विचारू इच्‍छिते, त्‍यांचे आई-वडील दोघेही संतच होते. भाऊकाकांमध्‍ये हे सर्व संस्‍कार त्‍यांच्‍या आई-वडिलांकडून आले होते का ?

डॉ. विजय आठवले : आम्‍ही त्‍यांच्‍या आई-वडिलांच्‍या समवेत, म्‍हणजे माझ्‍या आजी-आजोबांच्या समवेत रहात नव्‍हतो. आजी-आजोबा मुंबईला रहात होते आणि आम्‍ही मध्‍यप्रदेशातील भोपाळमध्‍ये रहात होतो. माझ्‍या वडिलांची नोकरीच्‍या निमित्ताने सतत बदली होत असे. त्‍यामुळे आम्‍ही वेगवेगळ्‍या शहरांत रहात होतो. आजी-आजोबा आमच्‍याकडे उन्‍हाळ्‍याच्‍या सुटीत १५ दिवस किंवा १ मास रहायला यायचे. त्‍यामुळे मला प्रत्‍यक्ष त्‍यांचा सहवास फार मिळाला नाही; परंतु माझ्‍या वडिलांनी सांगितल्‍यानुसार त्‍यांच्‍यावर त्‍यांच्‍या आई-वडिलांचे संस्‍कार निश्‍चितपणे आहेत.

(क्रमशः)    

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/739479.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक