…तर कृष्‍णनीतीच श्रेयस्‍कर !

जगाच्‍या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्‍बुद्वीपावर लढले गेले. जग त्‍या धर्मयुद्धाच्‍या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्‍हणून ओळखते. या विश्‍वात मानवाच्‍या कल्‍याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्‍हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत. सहस्रो वर्षांपूर्वी हे नियम मानवाच्‍या कल्‍याणासाठी सिद्ध केले गेले, जे आजही जसेच्‍या तसे लागू आहेत. जेव्‍हा हे नियम तोडून केवळ आपला आणि आपल्‍या मुलांचा हट्टी स्‍वार्थ साधण्‍याचा आंधळा खेळ सातत्‍याने खेळला जाऊ लागला, अधर्म केला जाऊ लागला, तेव्‍हा भगवंताने स्‍वतःच्‍या नजरेखाली घडवून आणले ते युद्ध म्‍हणजे धर्मयुद्ध, म्‍हणजेच महाभारत होय. या युद्धातही संसाधनांची मालकी किंवा भूमीची मालकी हे कळीचे सूत्र होते; मात्र मालकी हक्‍क कशा प्रकारे मिळवावा, ते तात्त्विक आणि अधिक महत्त्वपूर्ण सूत्र होते, असे म्‍हणता येईल. या सगळ्‍या इतिहासात ज्‍याने ज्‍याने अधर्म केला, शाश्‍वत नियमांचे पालन केले नाही, त्‍या प्रत्‍येकाला भगवंताने शिक्षा केली, तेही त्‍या प्रत्‍येकाचे पाप, त्‍याच्‍या त्‍याच्‍या पदरात टाकत.

१. भारतात वाढत असलेला इस्‍लामधार्जिणेपणा !

या युद्धात भगवंताने सापेक्षनीतीचा व्‍यवहार्य वापर कसा करावा ? याचे पाठ हिंदु समाजाला गिरवायला दिले; परंतु दुर्दैवाने या सापेक्षनीतीचे पाठ आमचा हिंदु समाज एकत्रितरित्‍या, तसेच वैयक्‍तिकरित्‍याही विसरत असतो, असेच म्‍हणावे लागते. या पृष्‍ठभूमीवर अनेक घटना हिंदु समाजाने लक्षात घेतल्‍या पाहिजेत. एक कुणी महंमद रिझवान नावाचा फडतूस पाकिस्‍तानी क्रिकेटर भारतात चालू असलेल्‍या विश्‍वकप क्रिकेट स्‍पर्धेत त्‍याने श्रीलंकेविरुद्ध भाग्‍यनगर (हैद्राबाद) येथे ठोकलेले शतक हमासला समर्पित करतो. कोणत्‍या तरी सामन्‍यात भर मैदानावर कुणी क्रिकेटपटू नमाजपठण करतो. याच भाग्‍यनगर येथे याच सामन्‍याच्‍या कालावधीत ‘पाकिस्‍तान जितेगा’ म्‍हणून घोषणा दिल्‍या जातात. यावर पाकिस्‍तानमध्‍ये बसून कुणी एक माजी क्रिकेटपटू ‘भाग्‍यनगर हे महत्त्वाचे ‘इस्‍लामी केंद्र’ आहे, त्‍यामुळे तेथील मुसलमान पाकिस्‍तानची नेहमीच पाठराखण करतात’, अशी मल्लिनाथी करतो. आमच्‍याच देशातील कुणी स्‍वरा भास्‍कर नावाची नटी (हो नावाचीच नटी आहे ती !) ‘ज्‍यू लोकांनी पॅलेस्‍टाईनवर किती अत्‍याचार केले’, असे म्‍हणून भारतात गळे काढते. अगदी ८-९ वर्षांपूर्वी या देशात सत्ताधारी असलेली तथाकथित भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस आणि देशाचे पंतप्रधान यांनी जागतिक अन् राष्‍ट्रीय व्‍यूहरचनेचा विचार करून इस्रायलला आधीच पाठिंबा दिलेला असतांनाही ‘हमास’ या पॅलेस्‍टाईन आतंकवादी संघटनेला पाठिंबा देणारा ठराव पारित करते. एवढे सगळे होऊनही आमच्‍यातील काही जण इस्रायल-पॅलेस्‍टाईन युद्धामागे राजनैतिक कारणे कमी, तर धार्मिक तेढ आणि अहंभाव अधिक आहे, हे लक्षात घेण्‍यात कमी पडतात.

२. इस्‍लाम, ज्‍यू आणि ख्रिस्‍ती यांच्‍यातील सुरक्षिततेच्‍या भावनेमागील कारण अन् त्‍यांची मानसिकता

‘अल अक्‍सा मशीद’ इस्‍लामसाठी अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे. मक्‍का-मदिनेनंतरची ही महत्त्वपूर्ण जागा आहे. खरे तर याच प्रदेशातून इस्‍लाम, यहुदी (ज्‍यू) आणि ख्रिस्‍ती हे तीनही अब्राहमिक धर्म स्‍थापन झाले आहेत आणि त्‍यामुळेच या तीनही धर्मांना एकमेकांविषयी प्रचंड द्वेष आहे. याच्‍या पाठीशी तीनही धर्मांच्‍या अंतःकरणातील असुरक्षिततेची भावना आहे. आपला धर्म जीवनपद्धत आणि सशक्‍त तत्त्वज्ञान म्‍हणून चिरंतन अस्‍तित्‍व राखू शकत नाही, ही यामागील खरी जाणीव होय. त्‍यामुळे बरीच सरमिसळ असूनही हे तीनही धर्म एकमेकांना इतिहास काळापासून पाण्‍यात पहातात. यातूनच ‘स्‍वतःचा धर्म इतरांवर लादण्‍याची वाईट प्रवृत्ती’ यातील दोन धर्मांनी जोपासली आहे, तर तिसरा धर्म, म्‍हणजे यहुदी धर्म असे समजतो की, त्‍यांचा वंश हा देवाने निवडलेला वंश आहे आणि जे निवडलेले किंवा निवडक वा विशेष लोक असतात, ते उगाच अवाजवी गर्दी गोळा करत नाहीत. यामुळे ज्‍यू किंवा यहुदी लोक धर्म प्रसार करत नाहीत; किंबहुना इतरत्र जन्‍म घेतलेल्‍यांना यहुदी आपल्‍या धर्मात स्‍वीकारत नाहीत. त्‍यांच्‍याकरता त्‍यांचा वंश हाच त्‍यांचा धर्म आहे. याचा एक परिणाम, म्‍हणजे यहुदी धर्मियांची संख्‍या त्‍यामुळेच अत्‍यंत मर्यादित राहिली आहे.

दुसरा परिणाम, म्‍हणजे स्‍वतःला अत्‍यंत उन्‍नत असा वंशधर्म मानल्‍यामुळे हे नेहमीच इतर मानव समूहांशी फटकून वागतांना दिसतात. त्‍यामुळे सगळे व्‍यवहार ते शक्‍यतोवर आपल्‍याच धर्मियांशी करण्‍याचा प्रयत्न करत असतात आणि इतर धर्मियांशी अत्‍यंत निष्‍ठुरतेने, कपटाने, हीन स्‍तरावर अन् अपमानास्‍पद रितीने वागतांना दिसतात. या सगळ्‍या पृष्‍ठभूमीवर हिटलर जरी जर्मनीतील ज्‍यूंच्‍या हत्‍याकांडासाठी अपकीर्त केला गेला असला, तरी मुळात ते ख्रिस्‍त्‍यांनी ज्‍यूंचे केलेले हत्‍याकांड होते, हे लक्षात घेतले पाहिजे.  या तीनही धर्मांमध्‍ये आपापसांत द्वेष आणि वैरभाव आहेच, याखेरीज जगात अस्‍तित्‍वात असलेल्‍या इतर धर्मांचाही ते द्वेषच करतात. धार्मिक द्वेष हे एक कारण झाले. दुसरे कारण, म्‍हणजे या दोन धर्मांना या पृथ्‍वीवरील अधिकाधिक भूमी आपल्‍या अधिपत्‍याखाली हवी आहे आणि होती. यहुदी मात्र स्‍वतःला उच्‍च समजून इतर धर्मियांच्‍या प्रति निश्‍चितपणे अनुदार असतात. यापैकी दोन धर्मांना ‘केवळ आपलेच लोक या पृथ्‍वीवर हवे आहेत. इतर धर्मियांनी एक तर यांचा धर्म स्‍वीकारावा, परागंदा व्‍हावे किंवा मरून जावे’, अशीच या धर्मांची शिकवण आहे. ‘इतर धर्मियांना जगण्‍याचा अधिकार नाही’, अशीच यांची विचारसरणी होय. ‘ही पृथ्‍वी आपल्‍या सर्व प्राणिमात्रांसाठी आहे. आपण सगळे इथे मिळून मिसळून गुण्‍यागोविंदाने राहू शकतो’, हा विचार अब्राहमिक धर्मांमध्‍ये नाही. त्‍यामुळे सगळ्‍या जगाला हे धर्म गुलाम करण्‍याची मानसिकता जोपासतांना दिसतात.

३. हिंदु समाज म्‍हणून घडामोडींकडे पहाण्‍याचा दृष्‍टीकोन

‘आम्‍ही तुमचे कल्‍याण करण्‍यासाठी इथे आलो, तुम्‍हाला शिकवण्‍यासाठी आलो’, ही आणि अशी धादांत खोटी वचने हे धर्म यांच्‍या जन्‍मापासूनच देतांना दिसतात. या तिन्‍ही धर्मांची अहमन्‍यता किंवा धर्मांधता वरील विवेचनावरून लक्षात येते. यावर हिंदु समाजाने आज कोणती दिशा घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे, यावर विचारमंथन करणे आवश्‍यक आहे. जर मध्‍य पूर्वेतील धार्मिक कट्टरतेला आवर घालण्‍यासाठी किंवा इस्‍लामी कट्टरपंथी गटांना संपवण्‍याचा हा प्रयत्न असेल, तर गाझा पट्टी रिकामी करून हमासला गाझातच संपवण्‍याचा प्रयत्न राहील. त्‍याच वेळी ‘तालिबान’, ‘इसिस’, ‘अल्-कायदा’ यांचेही कंबरडे मोडण्‍यासाठी जागतिक शक्‍ती प्रयत्नशील रहातील; कारण त्‍यांनीच सिद्ध केलेला आतंकी संघटनांचा भस्‍मासुर आता युरोपियन देश आणि पर्यायाने अमेरिकेच्‍या गळ्‍यापर्यंत आला आहे. भारत देशाने मग या स्‍थितीत स्‍वतःची डोकेदुखी दीर्घकाळ शांत राहील, याची तजवीज केलीच पाहिजे. या सगळ्‍या गोष्‍टी कशा घडवून आणल्‍या जातात, हे पहाण्‍यासारखे असणार आहे. कदाचित् आपण सगळेच जण एका ऐतिहासिक घडामोडींच्‍या कालखंडाचे साक्षीदार होऊ; पण हिंदु समाज म्‍हणून आपल्‍याला या सगळ्‍या घडामोडींकडे वेगळ्‍या दृष्‍टीकोनातून पहावे लागणार आहे. भारत देश आणि हिंदु समाजाला बाहेरून आतंकवादी अथवा लष्‍करी धोका आज तरी दिसत नाही.

४. भारताला देशाबाहेरून नव्‍हे, तर देशाच्‍या आतूनच धोका !

या सगळ्‍या परिस्‍थितीत जर जागतिक महायुद्ध झालेच, तर त्‍याचा केंद्रबिंदू हा आशिया खंड न रहाता आफ्रिका खंडात किंवा मध्‍य पूर्वेत रहाण्‍याची शक्‍यता मोठी दिसते. त्‍यामुळे या परिस्‍थितीत आपल्‍या देशाला या प्रकारच्‍या युद्धाची झळ लागू नये आणि लागलीच, तर ती न्‍यूनतम रहावी, याची काळजी आजचे केंद्रात विराजमान असलेले मोदी सरकार नक्‍कीच घेईल; परंतु या देशाला वा हिंदु समाजाला खरा धोका हा देशाबाहेरून नसून देशांतर्गत आहे. मागील आठवड्यात भारतातील काही तथाकथित प्रतिष्‍ठित पुरोगामी; पण जनमानसावर कोणत्‍याही प्रकारची पकड नसलेले, लोकांच्‍या विस्‍मृतीत गेलेले, काही लोक देहलीला पॅलेस्‍टाईन दूतावासासमोर ‘आमचा पॅलेस्‍टाईनला, म्‍हणजे पर्यायाने हमासला पाठिंबा आहे’, हे दर्शवण्‍यासाठी गेले होते. ‘भारत-पाकिस्‍तान सामन्‍यात ‘जय श्रीराम’ची घोषणा देणे, म्‍हणजे धर्मांधता’, असे म्‍हणणारे महाभागही याच देशात मंत्रीपदी विराजमान असतात. टिपू सुलतानचे मोठे फलक लावून त्‍याचे उदात्तीकरण करणारे महाराष्‍ट्रात दिसतात. या महाराष्‍ट्राच्‍या मातीत आमच्‍याच पूर्वजांनी ज्‍याला भूमीत गाडला, तो औरंगजेब आज काही लोक ‘सुफी संत’ म्‍हणून नावाजतात. यावरून ‘आम्‍हाला धोका देशाबाहेरून नव्‍हे, तर देशाच्‍या आतूनच आहे’, याची हिंदूंनी खूणगाठ बांधून घेतली पाहिजे.

५. देशांतर्गत सुरक्षेसाठी बांगलादेशी आणि रोहिंग्‍या मुसलमान यांना भारताबाहेर हाकलणे आवश्‍यक !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे स्‍तोम माजवत या देशात इस्‍लामी आतंकवाद्यांना (हमासला) पाठिंबा देणार्‍यांना आज स्‍पष्‍टपणे खडसावणे आवश्‍यक झाले आहे. अजूनही आमच्‍या देशात गैरमार्गाने आश्रयासाठी आलेले बांगलादेशी आणि रोहिंग्‍या मुसलमान यांना देशाबाहेर काढण्‍यासाठी योग्‍य ती कारवाई होत नाही. या सगळ्‍या परिस्‍थितीत पहिल्‍या प्रथम हे बांगलादेशी आणि रोहिंग्‍या या देशातून बाहेर काढले गेले पाहिजेत. हे बांगलादेशी आणि रोहिंग्‍या सहजपणे ओळखता येतात. तेव्‍हा हिंदु समाजाने त्‍यांच्‍यावर सर्वप्रथम बहिष्‍कार टाकला पाहिजे. त्‍यांना इथे पोटापाण्‍याला न मिळाले, तरच ते या देशातून बाहेर जातील. त्‍यांना प्रत्‍येक प्रकारच्‍या प्रयत्नांनी देशाबाहेर घालवणे आवश्‍यक झाले आहे; कारण उद्या जर कायदा सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न या देशात निर्माण झाला, तर हिंदु समाज आणि भारतीय प्रशासन यांच्‍या विरोधात विद्रोह करणारा पहिला जनसमूह हाच असणार आहे. या देशात आज अस्‍तित्‍वात असलेले मुसलमानधार्जिणे असलेले काही कायदे रहित करणे, हेही अत्‍यंत महत्त्वाचे असणार आहे.

६. केंद्र सरकारने धर्मनिरपेक्षतेच्‍या तत्त्वाला बाधा आणणारे कायदे रहित करणे महत्त्वाचे !

‘प्‍लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्‍ट’ (धार्मिक स्‍थळे कायदा), ‘वक्‍फ अ‍ॅक्‍ट’ आणि ‘मुस्‍लिम पर्सनल लॉ बोर्ड’, ‘मायनॉरिटीज कमिशन’ (अल्‍पसंख्‍यांक आयोग) यांसारखे कायदे रहित होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी पुरेसा सामाजिक दबाव निर्माण होतांना दिसत नाही. केंद्र सरकारने जरी हे कायदे रहित केले, तरी या कायद्याची आवश्‍यकता नाही, तसेच ‘हे कायदे धर्मनिरपेक्षतेच्‍या तत्त्वाला बाधा आणणारे आहेत’, याची जाणीव सर्वोच्‍च न्‍यायालयाला होण्‍यासाठी या विषयावर सातत्‍याने सामाजिक अभिसरण होणे आवश्‍यक आहे. अगदी यासाठीही दबाव गटाची आवश्‍यकता असते आणि आहे. जगात जेव्‍हा अस्‍थिर परिस्‍थिती आहे, आधीच अपकीर्त असलेला जागतिक इस्‍लाम जेव्‍हा यहुदींशी (ज्‍यूंशी) लढण्‍यात गुंतला आहे, तेव्‍हाच आपले इप्‍सित साध्‍य करणे, म्‍हणजेच भगवंताने आपल्‍याला महाभारत युद्धात घालून दिलेला धडा गिरवणे नव्‍हे का ?

– डॉ. विवेक राजे (२५.१०.२०२३)

(साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’चे संकेतस्‍थळ)