श्री विठ्ठलाप्रती निस्सीम भक्ती आणि पराकोटीचा भाव यांमुळे साक्षात् विठ्ठलालाच बोलावून बंधनमुक्त करण्यास भाग पाडणार्या संत सखुबाई वारकरी संप्रदायाच्या इतिहासात कायमच्या अजरामर झाल्या ! कृष्णा नदीच्या काठावर कर्हाड येथे रहाणार्या सखुबाई भगवद़्भक्तीत सदैव लीन असायच्या. त्यांचे पती, सासू आणि सासरे यांना त्यांची भक्ती रुचत नव्हती, त्यामुळे ते तिघेही त्यांचा पुष्कळ छळ करत; मात्र त्या सर्व सहन करत. त्या एकदा कृष्णाकाठी पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना पंढरीकडे निघालेली दिंडी दिसली. विठ्ठलदर्शनाच्या ओढीने त्याही दिंडीत सहभागी झाल्या. याविषयी पतीला कळताच त्यांना मारहाण करत त्यांनी घरी आणले आणि घरात खुंटीला बांधून ठेवले. ‘पंढरपूर यात्रा संपेपर्यंत त्यांना बांधून ठेवायचे, २ सप्ताह काहीच खायला-प्यायला द्यायचे नाही’, असे ठरवले. सखुबाईंना बांधलेला दोर इतका घट्ट होता की, काही दिवसांनी त्यांच्या शरिराला खड्डे पडू लागले. याही परिस्थितीत त्यांनी आर्तभावाने श्री विठ्ठलाला साद घातली, ‘हे नाथा, या डोळ्यांनी तुझे एकदा जरी चरण पाहिले असते, तरी मी तात्काळ प्राण त्यागले असते. तूच मला या बंधनातून मुक्त कर.’ आर्तभावाने आळवलेली सखूची हाक थेट श्री विठ्ठलापर्यंत पोचली. क्षणार्धात सुंदर स्त्रीचे रूप घेऊन भगवंत सखुबाईंकडे आला.
स्त्रीरूपातील भगवंत सखुबाईंना म्हणाला, ‘‘तुझ्या जागी मी उभी रहाते, माझ्याऐवजी तू पंढरपूरला जा.’’ असे म्हणून भगवंताने केवळ दोरखंडातूनच नाही, तर या भवसागरातून सखुबाईंना कायमचे मुक्त केले. १५ दिवस उपाशी राहिलेल्या सखुबाई मृत पावतील, या भीतीने पतीने सखुबाईंचे रूप घेऊन तिथे उभ्या राहिलेल्या भगवंताचे दोरखंड सोडले. पुढे सखुबाई येईपर्यंत त्यांच्या जागी साक्षात् श्री विठ्ठलाने पती आणि सासू-सासरे यांची सेवा केली. भावाचा भुकेला असलेल्या भगवंताने संत जनाबाईची धुणी धुतली, संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनून पाणी भरले, संत गोरा कुंभारांचे बाळ जिवंत केले, जगद़्गुरु संत तुकारामांना सदेह वैकुंठात नेले, तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांसाठी रेड्यामुखी वेद वदवले. टाकीचे घाव सोसल्याविना जसे दगडाला देवपण येत नाही, तसे प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेल्याविना भक्ताच्या भक्तीची कसोटी लागत नाही ! सर्वच संतांनी जीवनात कितीही घनघोर संकट आले, तरी भगवंताची साथ सोडली नाही; उलट ‘मी भगवंताचा आणि भगवंत माझा’ याच उत्कट भावाने त्यांनी भगवंताला आळवले. सखुबाईंसाठी आला, तसा भगवंत आपल्यासाठीही का धावून येणार नाही ?; परंतु त्याला भेटण्याची उत्कटता आपल्यात निर्माण करायला हवी !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.