|
बेंगळुरू – काँग्रेस सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यावरून त्यांचा राजकीय छळ केला जात आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एच्.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. कुमारस्वामी यांच्या विरोधात चोरीची वीज वापरून दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरात रोषणाई केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांनी ६८ सहस्र ५२६ रुपयांचा दंड भरला आहे. दंड भरल्यानंतर कुमारस्वामी यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची त्यांना काहीही कल्पना नव्हती. घरात रोषणाईचे काम चालू असतांना ते घरी नव्हते. कामगारांनी त्यांच्या नकळत हे काम केले, असा दावा कुमारस्वामी यांनी केला.
कुमारस्वामी यांचे वीजचोरी प्रकरण समोर येताच त्यांचे विरोधक सक्रीय झाले. काहींनी त्यांच्या घराबाहेर ‘बिजली चोर’ लिहिलेले फलक लावले. फलक लावल्याच्या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.