दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत रक्‍ताचा तुटवडा !; भारतीय रेल्‍वेत ३ सहस्र नवीन गाड्या !…

मुंबईत रक्‍ताचा तुटवडा ! 

हा तुटवडा लवकर भरून काढायला हवा !

मुंबई – येथे सध्‍या रक्‍ताचा तुटवडा भासत आहे. सुट्टीचा कालावधी असल्‍याने रक्‍तदाते उपलब्‍ध नाहीत. याचा परिणाम रक्‍तपेढ्यांवर होत आहे. राज्‍यातील सर्व रक्‍तपेढ्यांनी ‘ई-रक्‍तकोष’ संकेतस्थळावर रक्‍तसाठ्याची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. सेंट जॉर्ज रुग्‍णालयात ३ युनिट ‘बी पॉझिटिव्‍ह’ रक्‍तगट उपलब्‍ध आहे. राजावाडीमध्‍ये १, सायन रुग्‍णालयात पाच, केईएम् रुग्‍णालयात ५७ आणि नायर रुग्‍णालयात १५२ युनिट रक्‍त उपलब्‍ध आहे.


भारतीय रेल्‍वेत ३ सहस्र नवीन गाड्या !

मुंबई – भारतीय रेल्‍वेच्‍या ताफ्‍यात ३ सहस्र नवीन गाड्यांचा समावेश होणार असल्‍याने कोकणात जाण्‍यासाठी वर्ष २०२७ पर्यंत प्रवाशांना निश्‍चित तिकीट उपलब्‍ध होणार आहे. सध्‍या प्रतिदिन १० सहस्र ७४८ रेल्‍वेगाड्या धावत आहेत. हा आकडा १३ सहस्रांपर्यंत वाढवण्‍यात येणार आहे.


नागपूर येथे हवेची गुणवत्ता खराबच !

नागपूर – येथेही प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. दिवाळीपूर्वी हवेची गुणवत्ता अत्‍यंत खराब श्रेणीत होती; पण ती अजूनही तशीच आहे. फटाक्‍यांमुळे ५० टक्‍के अतिरिक्‍त कार्बन उत्‍सर्जन झाले. हवेतील अतीसूक्ष्म धुलीकण (पीएम् २.५) आणि सूक्ष्म धुलीकण (पीएम् १०) प्रमाण वाढले आहे.


डिसेंबरच्‍या शेवटी मुंबई-गोवा विशेष रेल्‍वेगाड्या सोडणार !

मध्‍य रेल्‍वेचा निर्णय !

मुंबई – नवीन वर्ष अनेकजण उत्‍साहात साजरे करतात. यासाठी अनेक मुंबईकर गोव्‍याला जातात. या प्रवाशांसाठी मध्‍य रेल्‍वेने डिसेंबरच्‍या शेवटी विशेष रेल्‍वेगाड्या सोडण्‍याचा निर्णय घेतला आहे. नियमित रेल्‍वेगाड्यांसह मुंबई – थिवीम, पनवेल  करमाळी या दरम्‍यान २८ विशेष फेर्‍या धावतील. या विशेष रेल्‍वेगाड्यांचे आरक्षण २१ नोव्‍हेंबरपासून चालू होणार आहे.


रंगीबेरंगी बांगड्या घालणार्‍या विवाहितेला सासरच्‍यांकडून मारहाण

गुन्‍हा नोंद

ठाणे – विवाहित महिलेने रंगीबेरंगी बांगड्या घातल्‍याने तिचा पती प्रदीप अरकडे याने तिला पट्‍ट्याने मारहाण केली. तिच्‍या सासूने तिचे केस ओढून मारहाण केली. या प्रकरणी तिच्‍या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला आहे.