ताजमहाल परिसरात मुसलमान पर्यटकाने नमाजपठण केल्याने हिंदु महासभेकडून विरोध !

येत्या सोमवारी ताजमहाल परिसरात शिव आरती करण्याची हिंदूंची घोषणा !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील ताजमहाल परिसरामध्ये १६ नोव्हेंबरला बंगालमधून आलेल्या एका मुसलमान पर्यटकाने नमाजपठण केले. त्या वेळी येथे सुरक्षेसाठी तैनात असणार्‍या पोलिसाने त्याला हटकल्यावर मुसलमानाने क्षमा मागितली. त्यामुळे पोलिसाने त्याला सोडून दिले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्यावर आता वाद निर्माण झाला आहे. हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ता संजय जाट यांनी आरोप केला की, मुसलमानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचा भंग करण्यात येत आहे. केवळ क्षमा मागितल्यावर त्यांना सोडून दिले जात आहे. जर तेथे हिंदूंनी धार्मिक कृती केली असती, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असता. यामुळे पोलीस आणि मुसलमान पर्यटक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला पाहिजे. यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करणार आहोत. याखेरीज २० नोव्हेंबर या दिवशी आमचे सदस्य येथे शिव आरतीही करतील आणि नंतर क्षमाही मागतील, अशी घोषणा त्यांनी केली.

१. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे निरीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, येथे नमाजपठण करण्यास बंदी आहे. या संदर्भात सूचना लिहिण्यात आली आहे. याची माहिती नसल्याने काही पर्यटक येथे नमाजपठण करतात, तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते.

२. हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ताजमहालला ‘तेजोमहालय’ असे संबोधून शिवमंदिर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून येथे आरती करण्याचा, तसेच भगवा ध्वज नेण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. तेव्हा त्यांच्यावरही कारवाई केली जाते. संजय जाट यांच्यावरही या संदर्भात काही गुन्हे नोंद आहेत.

संपादकीय भूमिका 

ताजमहाल हा हिंदूंचा वारसा आहे, हे पुरातत्व विभाग घोषित का करत नाही ?केंद्र सरकारने या संदर्भात पुढाकार घेऊन ताजमहालचे सत्य जगाला सांगितले पाहिजे !