भारत पुढील ५ वर्षांत २०२८-२९ पर्यंत स्वतःची लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्यासाठी सज्ज आहे. ‘प्रोजेक्ट कुश’ याच्या अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या लांब पल्ल्याच्या भूमीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये रशियाच्या ‘एस्-४००’ हवाई संरक्षण प्रणालीइतकी क्षमता आहे.
१. शत्रूची क्षेपणास्त्रे आणि बाँब हवेतच होणार नष्ट !
भारत संरक्षण क्षेत्रातही स्वावलंबी होत आहे. ‘डी.आर्.डी.ओ.’ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) च्या व्यतिरिक्त अनेक भारतीय आस्थापने क्षेपणास्त्र असो किंवा लढाऊ विमान प्राणघातक शस्त्रे सिद्ध करत आहेत. भारत अनेक देशांना शस्त्रे आणि लष्करी उपकरणे यांची निर्यातही करत आहे. दुसरीकडे आपल्या हवाई क्षेत्राच्या सुरक्षेविषयी सांगायचे झाल्यास भारताकडे लवकरच स्वतःची हवाई संरक्षण प्रणाली असेल, जी शत्रूची क्षेपणास्त्रे आणि बाँब पाहून ते हवेतच नष्ट करील. जर हा प्रकल्प योग्य गतीने चालला, तर लवकरच भारताकडे इस्रायलसारखा स्वतःचा ‘आयर्न डोम’ (हवेतल्या हवेत क्षेपणास्त्रे नष्ट करणारी यंत्रणा) असेल.
२. महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट कुश’
वर्ष २०२८-२९ पर्यंत लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली सक्रीयपणे तैनात करण्याची भारताची योजना आहे. ही स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली ३५० किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर येणारी गुप्त लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लक्ष्य ठरवलेली शस्त्रे शोधून खाली पाडेल. ‘डी.आर्.डी.ओ.’ने महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट कुश’ अंतर्गत ‘इंटरसेप्शन क्षमते’सह (लहान तसेच मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे) विकसित केलेली स्वदेशी लांब पल्ल्याची भूमीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (एल्.आर्.-एस्.ए.एम्.) प्रणाली अलीकडेच समाविष्ट केलेल्या रशियन क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणाली ‘एस्-४०० ट्रायम्फ’ हवाई संरक्षण प्रणालीसारखीच असेल. अलीकडेच त्याचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला.
माहितीनुसार मे २०२२ मध्ये मंत्रीमंडळाच्या सुरक्षा समितीने ‘मिशन मोड’ प्रकल्प म्हणून ‘एल्.आर्.-एस्.ए.एम्.’ प्रणाली सिद्ध करण्याच्या प्रकल्पाला संमती दिली. गेल्या मासात संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलाच्या ५ स्क्वॉड्रनच्या खरेदीसाठी ‘ना हरकत दाखला’ दिला होता. लांब पल्ल्याच्या ‘इंटरसेप्टर’ आणि अग्नीनियंत्रण रडारसह फिरत्या ‘एल्.आर्.-एस्.ए.एम्.’ प्रकल्पात अनेक क्षेपणास्त्रे असतील की, जी विशेषतः शत्रूला दिलेल्या अंतरावर नष्ट करण्यासाठी सिद्ध केली गेली आहेत.
(सौजन्य : IndiaTV News)
३. प्रत्येक आघाडीवर प्रभावी ठरेल अशी यंत्रणा !
‘डी.आर्.डी.ओ.’च्या म्हणण्यानुसार ही संरक्षणप्रणाली प्रत्येक आघाडीवर प्रभावी ठरेल. ‘एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम’ अन् ३५० किलोमीटर अंतरावर मोठ्या आकाराच्या विमानांना अडवण्यासाठी ‘मिड-एअर रिफ्युअलिंग’सह २५० किलोमीटर अंतरावर लढाऊ लक्ष्यांवर आक्रमण करण्यासाठी संरक्षण प्रणालीची रचना करण्यात आली आहे.
– सायली डिंगरे
(साभार : ‘हिंदुस्थान पोस्ट, मराठी’चे संकेतस्थळ)