स्‍वतःतील आत्‍मशक्‍ती जागवून मूळ मानवधर्माची (हिंदु धर्माची) स्‍थापना करूया !

महाभारतातील एक अत्‍यंत महत्त्वाचा आणि सर्वश्रुत श्‍लोक आहे…

यदा यदा हि धर्मस्‍य ग्‍लानिर्भवति भारत ।
अभ्‍युत्‍थानमधर्मस्‍य तदात्‍मानं सृजाम्‍यहम् ॥४.७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्‍कृताम् ।
धर्मसंस्‍थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥४.८॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता

हा आपल्‍याला फक्‍त एक आध्‍यात्‍मिक श्‍लोक वाटतो; परंतु खरे पाहिले, तर हा श्‍लोक द्वयर्थी आहे. अर्थात् या श्‍लोकामध्‍ये दोन अर्थ सामावलेले आहेत. समाजामध्‍ये प्रामुख्‍याने दुर्जन (दुष्‍प्रवृत्ती) आणि सज्‍जन असे दोन भाग अन् त्‍यातही सज्‍जनांचे पुनश्‍च दोन भाग पडतात. एक म्‍हणजे दुर्बल आणि दुसरा म्‍हणजे सबल. दुर्बल लोक हे दुर्जनांचे अन्‍याय अत्‍याचार सहन करणारे आणि ती सबल व्‍यक्‍ती अन् ईश्‍वर यांच्‍याकडे ‘त्राहिमाम्’ म्‍हणत रक्षण करण्‍याची विनंती करणारे असतात, तर सबल सज्‍जन हे दुर्जनांचा प्रतिकार करणारे आणि त्‍यांना वठणीवर आणणारे लोक असतात. वरील श्‍लोक हा सर्व समाजाला उपदेशक आणि सामाजिक यंत्रणेचा समतोल राखण्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त श्‍लोक आहे.

डॉ. कुलदीप शिरपूरकर

१. ‘यदा यदा हि धर्मस्‍य ग्‍लानिर्भवति भारत’ म्‍हणजे काय ?

भारत देशात, म्‍हणजेच पृथ्‍वीतलावर ज्‍या वेळी महाभारत घडले, त्‍यामध्‍ये पृथ्‍वीवरील बहुतांश वंशावळीचा उल्लेख आढळतो. त्‍या वेळी अस्‍तित्‍वात असणार्‍या विविध प्रांतातील सर्व राजे-महाराजे यांचे एकत्रितरित्‍या हे महायुद्ध झाले होते आणि त्‍या वेळी युधिष्‍ठिर हे चक्रवर्ती सम्राट होते. चक्रवर्ती सम्राट म्‍हणजेच संपूर्ण पृथ्‍वीची सत्ता ज्‍याच्‍या अधिपत्‍याखाली असेल असा राजा ! संपूर्ण पृथ्‍वीवर सत्ता स्‍थापन करण्‍याचा मानस व्‍यक्‍त करणारा अश्‍वमेध यज्ञाचा उल्लेख आपल्‍याला रामायण, महाभारत आणि इतर बर्‍याचशा ग्रंथांमध्‍ये आढळून येतो. अर्थात् त्‍याकाळी संपूर्ण पृथ्‍वीवर भारत देशाची सत्ता होती, म्‍हणजे संपूर्ण पृथ्‍वी ही भारत देशाच्‍या अधिपत्‍याखाली होती आणि त्‍यामुळेच भगवान श्रीकृष्‍णाने ‘ग्‍लानिर्भवति भारत’ म्‍हणजे या पृथ्‍वीवर कधीही कुठेही ‘यदा यदाही धर्मस्‍य ग्‍लानिर्भवति’ याचाच अर्थ ‘जेव्‍हा जेव्‍हा सत्‍य आणि न्‍याय या दोन धर्माच्‍या प्रमुख अंगांवर घाला घातला जाईल, तेव्‍हा तेव्‍हा’, असे म्‍हटले आहे.

२. धर्माचे अंग

यामध्‍ये अजून एका प्रमुख गोष्‍टीचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे तो, म्‍हणजे धर्माची अंगे. ‘अध्‍यात्‍म’ आणि ‘विज्ञान’ हे धर्मस्‍वरूपी देहाचे नेत्र, शस्‍त्र अन् शास्‍त्र या २ भुजा, तर सत्‍य आणि न्‍याय हे २ पाय आहेत. सत्‍य आणि न्‍याय यांच्‍या आधारावरच हे धर्मस्‍वरूपी शरीर उभे राहू शकते अन् या धर्मस्‍वरूपी देहाचे रक्षण करण्‍यासाठी शस्‍त्र अन् शास्‍त्र या २ भुजा यांचा उपयोग केला जातो.

सत्‍य काय आणि न्‍याय कोणता ? हे जाणून घेण्‍यासाठी मात्र अध्‍यात्‍म अन् विज्ञान स्‍वरूप दोन्‍ही नेत्रांची आत्‍यंतिक आवश्‍यकता असते. शरिराचा मध्‍यभाग म्‍हणजेच धड ! हे म्‍हणजेच समाज ! या मध्‍य देहस्‍वरूपी समाजाचे रक्षण करणे आवश्‍यक असते; कारण या देहामध्‍येच हृदयाचा वास आहे. यामध्‍ये देहातील सर्व विविध अवयव हे समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्‍व करतात. शरिरातील प्रत्‍येक अवयव जसा महत्त्वाचा तसेच समाजातील प्रत्‍येक घटक सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्‍यामुळेच या समाजाचे रक्षण करण्‍यासाठी श्‍लोकाचे वरीलप्रमाणे दोन अर्थ निघतात.

३. श्रीकृष्‍णाच्‍या वचनामुळे दुर्जनांप्रती असलेली भीती नष्‍ट होणे

सामान्‍य आणि कमकुवत माणसांसाठी हा श्‍लोक आश्‍वस्‍त करणारा म्‍हणजेच धीर देणारा आहे. या श्‍लोकाच्‍याच आधारे सामान्‍य आणि कमकुवत वर्गामध्‍ये असा एक विश्‍वास निर्माण होतो की, आपण सत्‍य अन् न्‍याय यांच्‍या मार्गावर चाललो, तर ईश्‍वर आपणास कोणत्‍या ना कोणत्‍या स्‍वरूपात वाचवण्‍यासाठी आपले साहाय्‍य नक्‍कीच करील. ही भावनाच त्‍यांना सत्‍य आणि न्‍याय या मार्गावर चालण्‍यास प्रवृत्त करते; कारण या श्‍लोकाचा अर्थ सांगतांना आपण नेहमी म्‍हणतो की, ‘श्रीकृष्‍ण असे म्‍हणतात की, ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्‍कृताम्’, म्‍हणजेच सज्‍जन लोकांचे रक्षण करण्‍यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्‍यासाठी मी वेळोवेळी अवतार घेईन’ अन् हा विश्‍वास समाजामध्‍ये जेव्‍हा निर्माण होतो, त्‍या वेळेस दुर्जनांप्रती असलेली भीती नष्‍ट होते. त्‍यामुळे लोक सत्‍य आणि न्‍याय यांच्‍या मार्गावर चालू शकतात. हे जर असे झाले नाही, तर मात्र सगळीकडे दुर्जनांचा बोलबाला होईल आणि या दुर्जनांच्‍या भीतीपोटी सर्वच सज्‍जन लोक सुद्धा चुकीचा मार्ग अवलंबतील अन् हे असे घडू नये, यासाठीच या श्‍लोकांमध्‍ये आश्‍वासक अर्थ सामावलेला आहे.

४. समाजात सत्‍य अन् न्‍याय या दोन मूलभूत घटकांची स्‍थापना करण्‍याचा संदेश !

या श्‍लोकाचा दुसरा अर्थ मात्र फार गहन आहे. हा श्‍लोक आपण शांत चित्ताने पुन्‍हा पुन्‍हा मोठमोठ्याने अथवा मनातल्‍या मनात म्‍हणून पहावा. आपल्‍याला एक वेगळी अनुभूती प्राप्‍त होईल. तारुण्‍याने ओतप्रोत स्‍वतःला सक्षम समजणार्‍या बलशाली व्‍यक्‍तींना हा श्‍लोक अत्‍यंत वेगळ्‍या पद्धतीने मार्ग दाखवेल.

यदा यदा हि धर्मस्‍य ग्‍लानिर्भवति भारत ।
अभ्‍युत्‍थानमधर्मस्‍य तदात्‍मानं सृजाम्‍यहम् ॥

यात ‘सृजाम्‍यहम्’ असा उल्लेख आला आहे. यातील ‘सृजाम्‍य’ म्‍हणतांना हा शब्‍द फार महत्त्वाचा आहे. हा शब्‍द स्‍वतःकडे बोट दाखवतो, तर त्‍यातील ‘अहम्’ हा शब्‍द स्‍वतःमधील अहंकार जागृत करतो, म्‍हणजेच अहंकार जेव्‍हा जागृत होतो, तेव्‍हा तो सर्व दायित्‍व स्‍वतःवर ओढवून घेतो आणि ते पार पाडण्‍यासाठी प्रयत्न करतो, हेच यामागील गमक आहे. या श्‍लोकामध्‍ये सज्‍जनांचा मीपणा अहंकार जागृत करून त्‍यांच्‍याकडून दुर्बल सज्‍जनांचे रक्षण घडवून आणण्‍याचा आणि समाजामध्‍ये सत्‍य अन् न्‍याय या दोन मूलभूत घटकांची स्‍थापना करण्‍याचा संदेश दिला आहे.

५. भगवंताने अवतार घेतला आहे, हे कसे ओळखावे ?

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्‍कृताम् ।
धर्मसंस्‍थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

यामध्‍ये ‘संभावामि’ हा शब्‍द आलेला आहे, याचा अर्थ माझा संभव, म्‍हणजेच माझी उत्‍पत्ती अथवा प्रकटीकरण असा आहे. सबल सज्‍जनांनी या श्‍लोकाचा अर्थ असा घ्‍यायचा असतो की, माझी उत्‍पत्ती सज्‍जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्‍यासाठी झालेली आहे, माझे हे उत्तरदायित्‍व आहे की, ‘मी समाजामध्‍ये सत्‍य आणि न्‍याय या दोन आधारभूत घटकांची स्‍थापना करावी. यासाठी दुसरे कुणी येणार नाही, मलाच सक्षम व्‍हावे लागेल आणि मलाच समाजासमोर प्रकट होऊन दुष्‍ट शक्‍तींना सामोरे जावे लागेल’; परंतु ही भावना समाजासाठी समर्पित दुर्दम्‍य इच्‍छाशक्‍ती असणार्‍या व्‍यक्‍तींमध्‍येच येऊ शकते. असे लोक जेव्‍हा स्‍वतः पुढाकार घेऊन समाजावर होणारा अन्‍याय दूर करतात, दुर्जनांचा पराभव करतात, तेव्‍हा समाजातील दुर्बल घटकांना ही जाणीव होते की, श्रीकृष्‍णाने ‘संभवामि युगे युगे’ म्‍हणत अन्‍याय आणि अत्‍याचार यांविरुद्ध लढून सत्‍याची पाठराखण करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या स्‍वरूपात अवतार घेतला आहे. मुळात प्रत्‍येक व्‍यक्‍तीमध्‍ये ईश्‍वर सामावलेला आहे; परंतु त्‍या ईश्‍वराचे प्रकटीकरण होऊ देणे अथवा न होऊ देणे, हे आपल्‍या स्‍वतःच्‍या हातात असते.

थोर क्रांतीकारी, समाजसुधारक यांच्‍यापुढे आपण नतमस्‍तक होतो; कारण यांच्‍यामधील परमात्‍म्‍याचे प्रकटीकरण त्‍यांनी स्‍वतः स्‍वतःच्‍या कर्तृत्‍वाने घडवून आणले आहे. त्‍यांनी वरील श्‍लोकाचा दुसरा अर्थ ग्रहण केला आहे आणि सर्व उत्तरदायित्‍व स्‍वतःवर घेऊन आपण समाजाचे काही देणे लागतो. ‘समाजामध्‍ये सत्‍य आणि न्‍याय व्‍यवस्‍था स्‍थापन करण्‍याचे, म्‍हणजेच धर्मस्‍थापनेचे कार्य हे आपले आहे’, असे समजून त्‍यांनी दुर्बलांचे संरक्षण अन् दुर्जनांचा नाश करण्‍यासाठी कधी शस्‍त्राचा, तर कधी शास्‍त्राचा उपयोग केला आहे.

६. अध्‍यात्‍माची जोड, मानवसेवेची तळमळ आणि अन्‍यायाविरुद्ध लढा देण्‍याचा अट्टाहास हवा !

हे शिवधनुष्‍य पेलण्‍यासाठी लागणारी एकमेव शक्‍ती असते ती, म्‍हणजे इच्‍छाशक्‍ती ! मनुष्‍य इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर पुष्‍कळ काही करू शकतो; परंतु त्‍याच्‍या रस्‍त्‍यामध्‍ये येणार्‍या अडथळ्‍यांवर मात करावी लागते. सगळ्‍यात पहिले म्‍हणजे स्‍वतःच्‍या मनात असलेल्‍या भीतीवर मात करावी लागते. एकदा का भीती दूर झाली की, मग तुम्‍हाला कुणीही रोखू शकत नाही; परंतु ही इच्‍छाशक्‍ती हे धैर्य आणि हा कणखरपणा निर्माण होण्‍यासाठी लागणारी सगळ्‍यात महत्त्वाची गोष्‍ट, म्‍हणजे अध्‍यात्‍माची जोड, मानवसेवेची तळमळ, अन्‍यायाविरुद्ध लढा देण्‍याचा अट्टाहास !

७. महाभारताचे धर्मयुद्ध सत्‍य आणि न्‍याय रूपी धर्माची स्‍थापना करण्‍यासाठीच !

धर्म-अधर्म, म्‍हणजेच सत्‍य-असत्‍य, न्‍याय-अन्‍याय; परंतु आपण नेहमी धर्म या शब्‍दाचा वेगळा अर्थ घेतो आणि त्‍यातच गुरफटून रहातो. महाभारताच्‍या काळात संपूर्ण पृथ्‍वी ही भारत देशाच्‍या अधिपत्‍याखाली होती. त्‍याकाळी झालेल्‍या महाभारताच्‍या युद्धास ‘धर्मयुद्ध’ म्‍हणण्‍यात आलेले आहे म्‍हणजेच सत्‍यासाठीची लढाई, न्‍यायासाठीचे युद्ध म्‍हणजे धर्मयुद्ध. हे मूळ युद्ध होते एकाच कुटुंबातील; परंतु या युद्धामध्‍ये सर्व प्रकारच्‍या जाती, संप्रदाय आणि पंथ यांचा समावेश होता. प्रत्‍येक जाती, पंथ, संप्रदाय यांतील लोक सुद्धा सत्‍य-असत्‍य, न्‍याय-अन्‍याय या दोन घटकांमध्‍ये विभागले गेले होते आणि म्‍हणूनच हे धर्मयुद्ध होते. अशा युद्धाच्‍या वेळी श्रीकृष्‍णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि त्‍या वेळी वरील श्‍लोक सांगितला. तेव्‍हा जर त्‍यांचा फक्‍त एवढा उद्देश असता की, श्रीकृष्‍ण दुर्जनांचा नाश करील, तर अर्जुनाला उपदेश करण्‍याची आवश्‍यकताच नव्‍हती. स्‍वतः श्रीकृष्‍णाने युद्ध संपवले असते; परंतु वरील श्‍लोक श्रीकृष्‍णाने अर्जुनाला जेव्‍हा समजावून सांगितला, तेव्‍हा अर्जुनाने त्‍याचा दुसरा अर्थ जाणून घेतला तो म्‍हणजे सत्‍य आणि न्‍याय रूपी धर्माची स्‍थापना करण्‍याचे कार्य अर्जुनाला पार पाडायचे आहे. होय, तो मीच (श्रीकृष्‍ण) आहे, ज्‍याला हे कार्य पार पाडायचे आहे आणि ते अर्जुनाने केलेही !

८. स्‍वतःतील आत्‍मशक्‍ती जागवा !

आजच्‍या काळातील अर्जुन आपण आहोत आणि आपणही या श्‍लोकाचा दुसरा अर्थ समजून घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. त्‍याकाळी मार्ग युद्धाचा होता, आजच्‍या काळी मार्ग कदाचित् वेगळा असेल; परंतु उद्दिष्‍ट सारखेच आहे ते म्‍हणजे जे सत्‍य आणि न्‍याय रूपी धर्माची स्‍थापना करण्‍याचे ! चला, उठा जागे व्‍हा, स्‍वतःतील आत्‍मशक्‍ती जागवा. रामायणातील खारीप्रमाणे का होईना; पण आपल्‍याला जमेल तेवढा वाटा उचलूया आणि जगाला विभाजित करणार्‍या दांभिक राजकीय हेतूने प्रेरित अशा नाममात्र धर्माची नव्‍हे, तर सत्‍य अन् न्‍याय रूपी मूळ मानवधर्माची (हिंदु धर्माची) स्‍थापना करूया.

– डॉ. कुलदीप शिरपूरकर, नाशिक