‘एप्रिल २०२३ मध्ये एक दिवस मी नामजपाला बसले होते. त्या वेळी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘माझ्या शेजारी परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) बसलेले होते. ते मला म्हणाले, ‘मी तुला सप्तलोकांचे दर्शन घडवतो.’ ते मला हाताला धरून वर वर घेऊन जात होते.
१. भूलोक
भूलोक म्हणजेच पृथ्वीलोक. मी ज्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या, त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला दाखवल्या.
२. भुवर्लोक
मेल्यानंतर पापी आणि भ्रष्टाचारी लोकांना या लोकात आणतात. काही लोकांना शिक्षा म्हणून गरम तेलाच्या कढईत टाकतात आणि तळतात. अशा लोकांना गरम केलेल्या पत्र्यावरून चालायला लावतात आणि काठीने मारतात. त्यांना घाण पाण्याच्या तलावात ढकलून देतात, तसेच उलटे टांगून काठीने मारतात. तिथे मला ही शिक्षापद्धत दिसली.
३. स्वर्गलोक
येथे मला राजा इंद्र भोगविलासात रमलेला दिसत होता. येथे गंधर्व, किन्नर आणि अप्सरा होत्या. त्यांचे गाण्याच्या तालावर नृत्य चालू होते आणि सगळे जण हातातील भांड्यात पेय घेऊन बसले होते.
४. महर्लोक
येथे काही प्रमाणात चांगली आणि सात्त्विक माणसे दिसत होती. कर्मकांड करणारी, भजन म्हणणारी आणि स्तोत्रपठण करणारी माणसेही येथे होती.
५. जनलोक
येथील जीव पोथी वाचत होते आणि नामजप करत होते. येथील सगळेच जीव १०० टक्के सात्त्विक होते. ते भजन-कीर्तनात दंग होते.
६. तपोलोक
येथे तपस्वी, भगवे वस्त्र परिधान केलेली आणि यज्ञ करणारी माणसे होती. त्यांच्या तोंडावर पुष्कळ तेज होते. तेथील स्त्रियाही भगवे वस्त्र परिधान केलेल्या होत्या.
७. सत्यलोक
अ. येथील सगळे लोक देवासारखे दिसत होते.
आ. येथील वातावरण सुंदर होते आणि पशू-पक्षी अन् फुलझाडेही वेगळ्याच प्रकारची होती.
इ. पुरुषांनी मुकूट घातले असून पितांबर आणि शेलाही परिधान केला होता. स्त्रिया देवीसमान दिसत होत्या. त्या मुकूट घातलेल्या आणि सुवर्णालंकारांनी सजलेल्या होत्या.
ई. थोड्या वेळाने मला भगवान विष्णु दिसला. मी त्याला नमस्कार केला. त्याच्या उजवीकडे पुरुषांच्या रांगा होत्या आणि डावीकडे स्त्रियांच्या रांगा होत्या.
उ. पुढच्या रांगेत एक आसन रिकामे होते. देव मला म्हणाले, ‘तुमच्यासाठी एक आसन राखीव ठेवले आहे. त्यावर तुम्ही बसा.’ त्यानंतर परम पूज्य दिसेनासे झाले. मी समोर बघितले, तर परम पूज्य श्रीविष्णूच्या वेशात होते.
ही अनुभूती दिल्याबद्दल मी परम पूज्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– (सद़्गुरु) श्रीमती प्रेमा कुवेलकर (वय ८९ वर्षे), कवळे, फोंडा, गोवा. (१४.७.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |