Portuguese Looted Goa : पोर्तुगिजांनी गोव्याला लुटले, तर कदंबची राजवट हा सुवर्णकाळ होता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्याचा सुवर्णकाळ ‘कदंबा राजवट’ !

पणजी, ११ नोव्हेंबर (वार्ता.) : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जून २०२३ मध्ये पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन एका सार्वजनिक कार्यक्रमात केले होते. त्यांनी १० नोव्हेंबर २०२३ या दिवशी अशाच एका सार्वजनिक कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात वक्तव्य केले.

ते म्हणाले, ‘‘पोर्तुगिजांनी गोव्यात उभारलेल्या साधनसुविधा या गोमंतकियांसाठी उभारल्या नव्हत्या, तर त्या स्वत:च्या लाभासाठी उभारल्या होत्या. पोर्तुगीज काळ हा गोमंतकियांसाठी दडपशाहीचा काळ होता, तर कदंब राजवटीचा काळ गोमंतकियांसाठी सुवर्ण काळ होता.’’

डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘पोर्तुगीज राजवटीच्या पलीकडेही प्राचीन गोमंतकाला इतिहास आहे. आपण तो पहाणे आणि पुढच्या पिढीला शिकवणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांनी गोव्यावर आक्रमण करून सत्ता उपभोगली; मात्र ही सत्ता केवळ गोमंतकियांना लुटण्यासाठीच होती. पोर्तुगिजांच्या आधी सातवाहन, चालुक्य, कदंब, विजयनगर आणि मराठा साम्राज्य, अशा राजसत्ता होऊन गेल्या. या ५ राजसत्तेनंतर पोर्तुगीज गोव्यात आले. असे असली, तरी पूर्ण गोव्यावर त्यांची ४५० वर्षे राजवट नव्हती. बार्देश, सासष्टी आणि तिसवाडी सोडल्यास अन्य भागांवर त्यांनी ४५० वर्षे राज्य केलेले नाही. तांबडी सुर्ल येथे भेट दिल्यास तुम्हाला कदंब राजवट गोव्यासाठी एक सुवर्ण काळ होता, हे लक्षात येईल. गोव्यातील सर्वांत जुने म्हणजे १२ व्या शतकातील तांबडी सुर्ल मंदिर हे कदंब-यादव स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.

पोर्तुगीज काळातील गोव्याचे मार्केट

पोर्तुगीज काळात गावांच्या नावांचा अपभ्रंश !

पोर्तुगीज काळात राज्यातील अनेक गावांच्या नावांचा अपभ्रंश झाला. श्रुंखलापूरचे सांखलीम, चंद्रपूरचे चांदोर आदी पालट झाले, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले; ‘पण सध्या गावांची नावे पालटण्याचा विचार नाही’, हेही त्यांनी स्पष्ट केले.