गंगाखेड (जिल्हा परभणी) शहरात भूमीपूजनासाठी आलेल्या आमदारांना विरोध करून माघारी पाठवले !

प्रतिकात्मक चित्र

परभणी – जिल्ह्यातील गंगाखेड शहरात रस्त्याच्या कामाच्या भूमीपूजनासाठी गेलेले आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलकांच्या आक्रमक विरोधामुळे भूमीपूजन न करताच परत जावे लागले. त्यांच्या जागी गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील माजी सैनिक विश्वनाथ सातपुते यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

  • मराठा आंदोलनाची धग कायम !      
  • माजी सैनिकाच्या हस्ते रस्त्याचे भूमीपूजन !

‘आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळा’चे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे यांच्या वतीने १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरातील नांदेड रस्त्यावरील दत्त मंदिर परिसरात आमदार गुट्टे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सकल मराठा समाजातील नागरिकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन त्यांना विरोध केला.

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की, मी भूमीपूजन कार्यक्रमासाठी गेलो होतो; परंतु तेथे विरोध झाला. यापुढे उद्घाटनांसह सार्वजनिक कार्यक्रम पूर्णतः टाळून समाजाच्या भावनेचा आदर करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, याचे पूर्णतः समर्थन केले आहे. या मागणीसाठी यापुढेही आपण आग्रही राहू.

गंगाखेड येथील ‘मराठा आरक्षण समन्वय समिती’चे तालुकाध्यक्ष श्रीकांत भोसले म्हणाले की, आरक्षण हा समाजाचा भावनिक विषय असल्याने आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी कोणताही राजकीय कार्यक्रम घेऊन मराठा समाजबांधवांच्या भावना दुखावू नये. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहील.