‘गूगल’ने ऐन दिवाळीत ‘प्ले स्टोअर’वरून सनातन संस्थेचे ५ अ‍ॅप्स हटवले !

  • नागरिकांविरुद्ध हिंसाचारात गुंतलेल्या संघटनांशी संबंधित असल्याचे कारण देत कारवाई !

  • ‘हिंदूंनी अध्यात्म कसे जगावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणार्‍या अ‍ॅप्समधून हिंसाचाराला प्रोत्साहन कसे काय मिळू शकते ? – सनातन संस्था

मुंबई – सनातन संस्था सात्त्विक आचारपालन, धर्मशिक्षण आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे अनेक ‘अ‍ॅप्स’ बनवून त्याद्वारे गेली अनेक वर्षे अध्यात्माचा प्रसार करत आहे. यासाठी हे अ‍ॅप्स ‘गूगल प्ले स्टोअर’वर विनामूल्य उपलब्ध होते; मात्र ऐन दिवाळीत ८ नोव्हेंबरपासून सनातन संस्थेचे ५ अ‍ॅप्स तेथून काढण्यात, म्हणजेच ‘सस्पेंड’ करण्यात आले आहेत. याविषयी ‘गूगल’ने सनातन संस्थेला कुठलीही पूर्वसूचना दिलेली नाही. कारवाई केल्यानंतर गूगलकडून ‘कंटेट रिलेटेड टू मूव्हमेंट्स ऑर ऑर्गनायझेशन्स असोसिएटेड विथ व्हॉयलेंस अगेंस्ट सिव्हिलियन्स’ (नागरिकांविरुद्ध हिंसाचारात गुंतलेल्या संघटनांशी संबंधित माहिती) असल्यामुळे हे ‘अ‍ॅप्स’ काढत आहोत’, असे ई-मेलद्वारे कळवण्यात आले. ‘सस्पेंड’ केलेल्या अ‍ॅप्सपैकी ‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅपचे ६५ सहस्र वापरकर्ते आहेत. या अ‍ॅपमध्ये विविध देवतांचे नामजप, श्‍लोक, स्तोत्रे आदी आहेत. ‘श्राद्धविधी’ अ‍ॅपमध्ये हिंदु धर्मातील ‘श्राद्धकर्म’ याविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती देण्यात आली असून त्याविषयी शंकानिरसनही करण्यात आले आहे. ‘श्री गणेश पूजा आणि आरती’ या अ‍ॅपमध्ये श्री गणेशपूजनाविषयी सविस्तर अध्यात्मशास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे समाजाला साधना आणि धार्मिक कृती चांगल्याप्रकारे करण्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे. ‘या अ‍ॅपमधून हिंसाचाराला प्रोत्साहन कसे काय मिळू शकते ?’, असा प्रश्‍न सनातन संस्थेने उपस्थित केला आहे.

‘गूगल’ने केलेल्या या कारवाईचा सनातन संस्था निषेध करते, तसेच याविषयी कायदेशीर सल्ला घेत आहे, असेही सनातन संस्थेच्या वतीने कळवण्यात येत आहे. अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी या अ‍ॅप्समधील माहिती सनातनच्या Sanatan.org या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध असून सर्वांनी आवर्जून त्याचा लाभ घ्यावा, असेही संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

हटवलेले अ‍ॅप्स भ्रमणभाषवर आताही वापरता येणार !

हे ‘अ‍ॅप’ जरी ‘गूगल प्ले स्टोअर’वर दिसत नसले, तरी त्यांवर बंदी आलेली नाही. हे अ‍ॅप ज्यांनी ‘डाऊनलोड’ केले आहेत, त्यांच्या भ्रमणभाषमध्ये ते चालू रहातील; मात्र ही अडचण सुटेपर्यंत ते ‘अपडेट’ करता येणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ‘गूगल प्ले स्टोअर’वरून सस्पेंड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सची नावे पुढे दिली आहेत :

१. ‘सनातन संस्था’ अ‍ॅप
२. ‘सनातन चैतन्यवाणी’ अ‍ॅप
३. ‘गणेश पूजा आणि आरती’ अ‍ॅप
४. ‘श्राद्धविधी’ अ‍ॅप
५. ‘survival guide’ अ‍ॅप (आपत्काळात स्वत:चे रक्षण करण्यासाठी काय करावे ?, याचे मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले आहे.)

संपादकीय भूमिका 

  • सनातन संस्थेचा कोणत्याच गुन्ह्यात सहभाग नसल्याचे भारतीय न्यायालयांच्या निकालांतून वेळोवेळी स्पष्ट झालेले असतांना गूगल असे कोणत्या आधारावर म्हणत आहे ? हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !
  • आतंकवादी झाकीर नाईक याच्याशी संबंधित अ‍ॅप्स न हटवणारे गूगल आस्थापन समाजाला अध्यात्म सांगणार्‍या सनातन संस्थेचे अ‍ॅप्स मात्र हटवते, हे लक्षात घ्या !