तमिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी ‘भाजप सत्तेत आल्यास राज्यातील ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी (हिंदु रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डोअमेंट) मंत्रालय’ बंद करू,’ असे वक्तव्य केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून तमिळनाडूतील सहस्रावधी प्राचीन हिंदु मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे, असा दावा करून त्यांनी ‘सत्तेत येऊ, तेव्हा हे मंत्रालय नसेल’, असे आश्वासन जनतेला दिले आहे. तमिळनाडूमध्ये सध्या द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम् – द्रविड विकास परिषद) या हिंदुविरोधी पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत राज्यात हिंदुविरोधी कारवायांना ऊत आला आहे. याच सरकारच्या हातात राज्यातील धर्मादाय मंत्रालय असल्याने साहजिकच त्या जागी द्रमुक पक्षाचेच सदस्य कार्यरत असणार आणि त्यामुळे मंदिरांचा पैसा लाटणे, मंदिरांचे सरकारीकरण करणे, भूमी हडपणे, ख्रिस्त्यांनी मंदिराच्या भूमीत अतिक्रमण केल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे, ख्रिस्त्यांच्या धर्मांतरासारख्या हिंदुविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष करणे आदी हिंदुविरोधी कारवाया चालू आहेत.
एम्.के. स्टॅलिन हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याच मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी काही मासांपूर्वी एका सभेत सनातन धर्म संपवण्याचे द्वेषपूर्ण वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा देशभरातील हिंदु धर्मियांनी निषेध नोंदवण्यासह त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यांत तक्रारीही प्रविष्ट केल्या होत्या. वरील सर्व गोष्टींतून द्रमुक या पक्षाचा हिंदुविरोधी चेहरा दिसून येतो. यात नवल काही नाही; कारण या राजकीय पक्षाचा इतिहासच हिंदुविरोधी आहे. वर्ष १९४९ मध्ये द्रविड कळघम् नावाची एक सामाजिक चळवळ इ.व्ही. रामास्वामी या व्यक्तीने चालू केली होती. यावरूनच रामास्वामी यांना नंतर ‘पेरियार’ (आदरणीय व्यक्ती) असे संबोधण्यात येऊ लागले. अस्पृश्यतेसह जातीव्यवस्थेतील दुष्कृत्यांचे निर्मूलन करणे आणि तत्कालीन ‘मद्रास प्रेसिडेन्सी’मधून ‘द्रविड नाडू’ (द्रविड राष्ट्र) मिळवणे, हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. असे सर्वसाधारणपणे समजले जात असले, तरी पेरियार यांनी जातीव्यवस्था संपवण्याच्या नावाखाली तमिळनाडूमधून हिंदु धर्म संपवण्याचाच प्रयत्न केला. भाजपचे अण्णामलाई यांनी सांगितल्याप्रमाणे ‘वर्ष १९६७ मध्ये जेव्हा द्रमुक पक्षाने सत्ता हाती घेतली, तेव्हा त्यांनी ‘जे देवाचे पालन करतात, ते मूर्ख असतात. जे देवावर विश्वास ठेवतात, त्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे देवाची पूजा करू नका !’ असे फलक मंदिरांबाहेर लावले होते.
वेगळे द्रविड राष्ट्र हे या पक्षाचे दुसरे उद्दिष्ट होते आणि अजूनही आहे. या उद्दिष्टामधून त्याची फुटीरतावादी वृत्ती दिसून येते. तमिळनाडूमधील जनतेमध्ये पेरियार यांनी हे फुटीरतेचे विष पेरल्यामुळे तमिळनाडूमधील जनता हिंदी या राष्ट्रीय भाषेचा द्वेष करू लागली.
हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष हाच पर्याय !
तमिळनाडूमध्ये अजूनही हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. वर्ष २०११ मध्ये शेवटची जनगणना झाली, त्या वेळी जवळपास ८६ टक्के जनता हिंदु धर्मीय होती. त्यामुळे या राज्यात हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेवर येण्यास वाव आहे. भाजप या दृष्टीने प्रयत्न करत असला, तरी तेथील जनतेवर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत पेरियार विचारसरणीचा त्यातही वेगळ्या द्रविड राष्ट्राचा पगडा एवढा प्रचंड आहे की, आतापर्यंत द्रमुक आणि अण्णाद्रमुक हेच पक्ष आळीपाळीने तेथे सत्तेवर आले आहेत. अण्णाद्रमुक हा पक्षही द्रमुक या पक्षातून फुटलेल्यांपासूनच बनला आहे. त्यामुळे द्रमुक काय किंवा अण्णाद्रमुक काय ? दोन्ही पक्ष हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीपासून फारकत घेतलेलेच आहेत. हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष) यांसारखे काही हिंदुत्वनिष्ठ पक्ष काही वर्षे तेथे हिंदुत्वाचे कार्य करत असले, तरी त्यांना पाठिंबा देणारी जनता अल्पच आहे. त्यामुळे देशातील एक मोठा हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष म्हणून भाजप तेथे त्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असला, तरी पक्षाचा स्थानिक नेता म्हणून चेहरा मिळणे भाजपला अजून तरी शक्य झालेले नाही. तेथील भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई हे तरुण नेतृत्व असून त्यांच्या परीने ते हिंदुत्वाचा पर्याय निर्माण करत असले, तरी हा एक छोटासा प्रयत्न म्हणावा लागेल. तमिळनाडूतील गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ४ उमेदवार निवडून आले, तर लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे ‘तमिळनाडूत सत्तेवर आल्यास हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय बंद करू’, असे अण्णामलाई यांनी सांगितले असले, तरी ‘त्यासाठी हिंदूंना आणखी किती वर्षे थांबावे लागणार ?’, हा प्रश्न आहेच.
संघटित चळवळ आवश्यक !
‘राज्यात भाजपची सत्ता येताच मंदिरांबाहेर लावलेले पेरियार यांचे पुतळे हटवले जातील आणि त्याजागी तमिळनाडूमधील संतांचे पुतळे उभारले जातील’, असेही अण्णामलाई श्रीरंगम् येथील सभेत म्हणाले. अण्णामलाई यांच्या या भूमिकेचे तमिळनाडूतील ‘टेम्पल वर्शिपर्स सोसायटी’चे अध्यक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ टी.आर्. रमेश यांनी स्वागत केले आहे. असे असले, तरी तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन तेथील हिंदुत्वाशी निगडित विविध सूत्रांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. ‘सत्तेवर आल्यावर भाजप हिंदुत्वासाठी काहीतरी करणार’, याऐवजी आताच भाजपसह सर्व हिंदूंनी तमिळनाडूतील हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात मोठी चळवळ उभारल्यास तेथील हिंदूंवरील पेरियार यांच्या विचारसरणीचा पगडा अल्प होईल. तेथील लोकांच्या विचारसरणीत पालट झाल्यावर आपसूकच त्यांची मते हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या पारड्यात पडतील. हे लक्षात घेऊन तळागाळात हिंदुत्वाची विचारसरणी रुजवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !
तमिळनाडूमधील जनतेत हिंदुत्वाची विचारसरणी रुजवण्यासाठी व्यापक चळवळ उभारणे आवश्यक ! |