सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि देहली सरकारांना फटकारले !
नवी देहली – आम्ही लोकांना प्रदूषणामुळे मरू देणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि देहली सरकारांना फटकारले. देहलीतील प्रदूषणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करतांना न्यायालयाने हे वक्तव्य केले.
न्यायालयाने म्हटले की,
१. आमच्या हस्तक्षेपानंतरही प्रत्येक वर्षी प्रदूषणामध्ये वाढच होत आहे. आम्ही प्रदूषण हटवण्याविषयीचे तज्ञ नाही; मात्र आम्हाला समस्येवर तोडगा हवा आहे. आम्ही केवळ या संदर्भातील उपायांना कनिष्ठ स्तरापर्यंत लागू करू इच्छित आहोत.
२. पेंढा जाळणे हे प्रदूषणामागील एक मोठे कारण आहे. पंजाब राज्यात एक विशेष प्रकारचे पीक उगवल्यामुळे असे होत आहे. अशा वेळी शेतकर्यांना दुसरे पीक घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि पेंढा जाळण्यावर बंदीही घालणे आवश्यक आहे.
३. प्रत्येकाला प्रदूषणाचे कारण ठाऊक आहे. सरकारे न्यायालयाच्या हस्तक्षेपाची वाट पहात आहेत. आमच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे; मात्र आम्ही काही करू शकत नाही. आम्ही हे म्हणणार नाही की, हे अगदी सोपे आहे; मात्र राज्य सरकारांना ते करावे लागणार आहे.
४. तुम्हाला काय वाटते की, आम्ही असा आदेश द्यावा का की, सर्व सरकारी अधिकार्यांनी विना मुखपट्टी (मास्क) काम करावे, तेव्हा त्यांना सामान्य जनतेच्या आरोग्याविषयीची जाणीव होईल ?
संपादकीय भूमिकापंजाब आणि देहली येथे आम आदमी पक्षाचीच सरकारे असूनही त्यांच्यात समन्वय नसल्याने ते प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. हे आम आदमी पक्षाला लज्जास्पदच आहे ! अशा पक्षाला निवडून देणार्या जनतेला हे मान्य आहे का ? |