Netanyahu On Gaza : इस्रायलला गाझावर नियंत्रण मिळवायचे नाही ! – पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव –  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, इस्रायल गाझावर नियंत्रण मिळवू इच्छित नाही, शासन करू इच्छित नाही किंवा जिंकू इच्छित नाही. याआधी नेतान्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते की, हमासविरोधातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेचे दायित्व इस्रायल घेईल. एक प्रकारे गाझा कह्यात घेण्याची इस्रायलची इच्छा म्हणून या वक्तव्याकडे पाहिले जात होते.

इस्रायल-हमास युद्धात अमेरिका इस्रायलला उघडपणे पाठिंबा देत आहे; पण नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, युद्धानंतर इस्रायलने गाझा कह्यात घेतल्यास त्याला विरोध करू. अमेरिकेच्या विरोधानंतर इस्रायलचा सूर पालटल्याचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याचे आता म्हटले जात आहे.

वेस्ट बँकमध्ये सत्तेत असलेली ‘पॅलेस्टाईन अथॉरिटी’ गाझावर करू शकते शासन !

दुसरीकडे अमेरिकी सरकारच्या काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, वेस्ट बँकमध्ये सत्तेत असलेल्या ‘पॅलेस्टाईन अथॉरिटी’च्या सरकारला युद्धानंतर गाझावर शासन केले पाहिजे. काही दिवसांपूर्वी अमेरिकी परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांनीही यासंदर्भात वेस्ट बँकच्या दौर्‍याच्या वेळी तेथील राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या भेटीत गाझावर शासन करण्याची गोष्ट केली होती.