आडेली (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) येथे रेशन दुकानात निकृष्ट धान्य : पुरवठादारावर कारवाईची मागणी

तांदुळाच्या पोत्यामध्ये ‘चायनीज’ सदृश पदार्थ

वेंगुर्ला : तालुक्यातील आडेली येथील रास्त दराच्या धान्य दुकानात (रेशन दुकानात) तांदुळाच्या पोत्यामध्ये ‘चायनीज’ सदृश पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची महसूल विभागाकडून त्वरित चौकशी होऊन संबंधित धान्य पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी आडेली सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश गडेकर यांनी केली आहे.

शासनाच्या वतीने गोरगरीब जनतेला रास्त दराच्या धान्य दुकानातून (रेशन दुकानातून) तांदूळ, गहू आदी धान्य विनामूल्य दिले जाते; परंतु आडेली येथे असा प्रकार आढळून आल्याने शासनाने गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळू नये, चांगल्या दर्जाचे धान्य वितरण करावे, तसेच या प्रकारची शासनस्तरावरून त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

८ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी आडेली येथील धान्य दुकानावर धान्य वितरण चालू असतांना तांदुळाच्या पोत्यामध्ये ‘प्लास्टिक’ पिशवीत लालसर रंगाचे ‘चायनीज’ सदृश पदार्थ असल्याचे मापारी आणि ‘सेल्समन’ यांच्या निदर्शनास आले, तसेच तांदुळाच्या पोत्यामध्ये किडे आणि अळ्या सापडल्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याविषयी सोसायटीचे सचिव मोरेश्वर कांबळी आणि प्रकाश गडेकर यांना माहिती मिळाल्यानंतर प्रकाश गडेकर यांनी वेंगुर्ला पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना मािहती दिली. त्यानंतर धान्य साठ्याच्या तपासाची कार्यवाही चालू करण्यात आली. ‘अशा प्रकारच्या धान्याचा पुरवठा करणार्‍या धान्य पुरवठादारावर कारवाई करावी’, अशी मागणी प्रकाश गडेकर यांनी केली आहे.