उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. राघव राकेश देशमाने हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. राघव राकेश देशमाने महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.११.२०२३) |
आश्विन कृष्ण द्वादशी (१०.११.२०२३) या दिवशी कु. राघव राकेश देशमाने याचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने आणि त्याची आजी (आईची आई) सौ. अनुराधा निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे) यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
कु. राघव राकेश देशमाने याला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने (बालरोगतज्ञ, कु. राघवची आई)
१ अ. जिज्ञासा : ‘कु. राघवला एखाद्या गोष्टीचे कुतूहल वाटले की, तो त्या विषयाचा सखोल अभ्यास करतो. त्याविषयीच्या त्यांच्या मनातील शंकांचे पूर्ण निरसन होईपर्यंत तो प्रश्न विचारत रहातो.
१ आ. प्रगल्भ बुद्धीमत्ता : तो अध्यात्म, विज्ञान, तसेच सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारतो. या प्रश्नातून त्याची प्रगल्भता दिसून येते.
१ इ. वेळेचे पालन करणे : राघव शिस्तप्रिय आहे. वर्गातही त्याच्याविषयी कुठलेही गार्हाणे नसते. त्याला शाळेत जायला विलंब झालेला आवडत नाही. तो प्रत्येक वेळ व्यवस्थित पाळतो.
१ ई. स्पष्टवक्तेपणा
१ ई १. ‘चुलत भावांना दूरदर्शन बघणे चांगले नसते’, असे सांगणे : एकदा आम्ही कोल्हापूरला नातेवाइकांकडे गेलो होतो. तिथे राघवच्या वयाचे त्याचे दोन चुलत भाऊ आहेत. काही वेळानंतर त्यांच्यातील एक भाऊ ‘आयपॉड’ घेऊन बसला आणि दुसरा भाऊ दूरचित्रवाणी पहायला बसला. तो राघवला म्हणाला, ‘‘तूही दूरचित्रवाणी पहा.’’ तेव्हा राघवने त्यांना स्पष्टपणे सांगितले, ‘‘मी येथे तुमच्याशी खेळायला आलो आहे. दूरचित्रवाणी पहाणे चांगले नसते. आपण खेळूया.’’
१ ई २. पोहायला शिकवणार्या शिक्षकांना ‘मी मराठीतच बोलणार’, असे सांगणे : फेब्रुवारी २०२० मध्ये राघवला आम्ही पोहायला शिकण्यासाठी घातले होते. तिथे येणारी सर्व मुले इंग्रजी बोलणारी होती. त्यामुळे शिकवणारे शिक्षकही इंग्रजीच बोलायचे. राघव मराठी शाळेत जात असल्यामुळे त्याला इंग्रजी येत नाही; पण त्याने न घाबरता शिक्षकांना सांगितले, ‘‘सर, मी मराठी शाळेत जातो. त्यामुळे मी तुमच्याशी मराठीतच बोलणार.’’
१ उ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यावरील श्रद्धा : ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत मी पुष्कळ रुग्णाईत होते. राघवच्या ते लक्षात आल्यावर त्याला वाईट वाटायचे; पण तसे तो चेहर्यावर दाखवत नव्हता. तो त्या काळात मला सातत्याने धीर द्यायचा, ‘‘आई, तू घाबरू नकोस आणि रडू नकोस. तुला काहीही होणार नाही. प.पू. पांडे महाराज यांनी ‘तुला काहीही होणार नाही’, असे सांगितले आहे ना, म्हणजे ‘तुला काहीही होणार नाही.’ तू काळजी करू नकोस.’’ तेव्हा राघव केवळ ४ वर्षांचा होता.
१ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असणारा भाव : दळणवळण बंदीच्या कालावधीत राघव पुष्कळ वेळ भ्रमणभाष आणि दूरदर्शन पहायला लागला होता. त्याला ते बंद करायला सांगूनही ऐकत नव्हता; म्हणून एकदा त्याच्या आजीने (माझी आई, सौ. अनुराधा निकम हिने) त्याला सांगितले, ‘‘न ऐकणार्या मुलांना रामनाथी आश्रमात सेवा आणि साधना करण्यासाठी जाता येणार नाही. ऐकणारी मुलेच गुरुदेवांना प्रिय असतात.’’ तेव्हापासून आजपर्यंत (वर्ष २०२१ पासून वर्ष २०२३ पर्यंत) त्याने एकदाही दूरदर्शन किंवा भ्रमणभाष पाहिला नाही.
१ ए. स्वभावदोष : आळशीपणा, हट्टीपणा, अपेक्षा करणे, ‘कौतुक व्हावे’, असे वाटणे.’
२. सौ. अनुराधा निकम (राघवची आजी (आईची आई)
२ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘राघव ४ वर्षांचा असतांना आम्ही सर्व चिखलदरा (जिल्हा अमरावती) आणि इतर काही ठिकाणी फिरायला गेलो होतो. परत आल्यावर त्याने नातेवाइकांना ४ – ५ दिवसांचे संपूर्ण प्रवास वर्णन आणि प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन तंतोतंत सांगितले.
२ आ. सभाधीटपणा : राघव शाळेत गोष्ट उत्तमरितीने सांगतो. अल्प कालावधीत तो गोष्टीचे उत्तम सादरीकरण करतो.
२ इ. व्यवस्थितपणा : लहानपणापासून राघव स्वतःच्या वस्तू नीट ठेवतो. कधीच काही हरवत नाही. घरातील अन्यांनाही तो ‘आपापल्या वस्तू घेतल्या का ?’, याची आठवण करतो.
२ ई. तत्त्वनिष्ठता : राघव स्वतःच्या आणि अन्यांच्या चुकाही प्रांजळपणे सांगतो.
२ उ. प्रेमभाव : तो घरातील सर्वांवर पुष्कळ प्रेम करतो, तसेच प्राण्यांवरही प्रेम करतो. झाडे, वेली आणि फुले यांना हळुवारपणे हाताळतो. नातेवाइकांची प्रेमाने विचारपूस करतो. त्यांच्याशी अत्यंत आपलेपणाने वागतो आणि गोड बोलतो.
२ ऊ. उत्तम समज असणे : घरात कुणाही दोन व्यक्तींचा वादविवाद चालू असेल, तर तो शांतपणे ‘योग्य काय आणि कुणाचे चुकले’, हे अचूक सांगतो. नातेवाईकही त्याला ‘किती गुणी मुलगा आहे’, असे म्हणतात.
(सर्व सूत्रांचा दिनांक १८.६.२०२३)