१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘मनबा ! ‘परमात्म्याची सेवा आणि सेवन करणे’, हेच नरजन्माचे उद्दिष्ट आहे. ‘सेवा म्हणजे देवाला आपलासा करण्यासाठी प्रयत्न करणे’ आणि ‘सेवन म्हणजे त्याच्यात समरसून जाणे’ होय. वात्सल्यभक्तीने यशोदेने, मधुराभक्तीने गोपींनी, सख्यभक्तीने सुदामा आणि अर्जुन यांनी, दास्यभक्तीने हनुमंताने अन् विरोधीभक्तीने कंस आणि रावण यांनी देवाला आपलेसे करून घेतले. तूपण देवाशी कोणते तरी नाते जोडण्याचा प्रयत्न कर, म्हणजे त्यांच्याप्रमाणे तुलाही अखंड आनंदात रहाता येईल.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘मनास बोध’, सुवचन क्र. ४२)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
‘ज्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींनी मनाला उद्देशून मनाचे अनेक श्लोक लिहिले आहेत, त्याप्रमाणे प.पू. कलावतीआईंनी मनाला उद्देशून ६२ आध्यात्मिक विचार लिहिले आहेत आणि प्रत्येक विचाराच्या आरंभी त्यांनी मनाला उद्देशून ‘मनबा’, असे म्हटले आहे.
२ अ. ‘मनाशी संवाद साधून स्वतःतील गुण आणि दुर्गुण यांचा शांतपणे शोध घेणे’, म्हणजे आत्मसंवाद ! : आत्मसंवाद साधण्यासाठी आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आपल्याला आपल्याच मनाशी संवाद करावा लागतो. ‘माझ्यात काय न्यून आहे ? माझ्यात कोणते गुण आहेत ? आणि कोणते दुर्गुण आहेत ?’, यांचा शांतपणे शोध घ्यावा लागतो. गुणांचा उपयोग लोककार्यासाठी करावा लागतो, म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो आणि दुर्गुणांचा अतिशय संयमाने त्याग करावा लागतो.
२ आ. ‘सर्वांना प्रेमाने वागवणे’, हाच खरा धर्म ! : ‘आपल्या दुर्गुणांमुळे कोणी दुखावले तर जात नाही ना ? किंवा आपल्या दुर्गुणांनी आपण स्वतःचा घात तर करत नाही ना ?’, याकडे लक्ष द्यावे लागते; अन्यथा आपल्या डोक्यावर पापांचे डोंगर तयार होतात किंवा आपले शरीर हळूहळू रोगांनी पोखरले जाते आणि आपल्याला शारीरिक यातना भोगाव्या लागतात; म्हणून माणसाने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. सर्वांना प्रेमाने, मायेने आणि आदराने वागवले पाहिजे. ‘आपण प्रेम दिले, तर आपल्याला लोकांकडून दुप्पट-तिप्पट प्रेम मिळते’, हे अनेक विद्वानांनी आपल्या ग्रंथांत लिहून ठेवले आहे. ‘प्रेम लाभे प्रेमळाला’, असेही म्हटले आहे. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ।’, असे सानेगुरुजी म्हणतात. जगामध्ये ‘प्रेम अर्पण करणे’, हा खरा धर्म आहे आणि ‘कुणाचा दुस्वास, द्वेष, राग न करणे’, हासुद्धा धर्मच आहे.
२ इ. संतांच्या हृदयात नेहमी माणसांविषयी करुणा, क्षमा आणि शांती वसत असते ! : संत एकनाथ महाराज यांनी तहानलेल्या गाढवालासुद्धा पाणी पाजले होते. संतांचे हृदय असे संवेदनशील, प्रेमळ आणि भेदाभेद न करणारे असते. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ हेसुद्धा चोळाप्पाच्या घरी असलेल्या गायीला मोठ्या प्रेमाने धान्य भरवत असत. तिच्या अंगावरून त्यांचा प्रेमळ हात फिरत असे. संतांच्या हृदयात नेहमी माणसांविषयी दयाबुद्धी, करुणा, क्षमा आणि शांती वसत असते; म्हणून संतांच्या सहवासात येणार्या माणसाला एक प्रकारची सात्त्विक शांती अनुभवता येते.
२ ई. श्रद्धेतून प्रेम निर्माण होते ! : श्रद्धेतून प्रेम आणि प्रेमातून भक्ती निर्माण होत असते. मुळाशी श्रद्धा आणि प्रेम असावे लागते. कुणावर तरी श्रद्धा ठेवावीच लागते; परंतु ही अंधश्रद्धा नसावी. श्रद्धेतून प्रेम निर्माण होते. माणूस एकदा चराचरावर प्रेम करू लागला की, ती एक प्रकारची उच्च कोटीची भक्तीच असते.
२ उ. भक्तीचे प्रकार
२ उ १. वात्सल्यभक्ती : आई मुलांवर जे प्रेम करते, त्या प्रेमालाच ‘वात्सल्य’, असे म्हणतात. जगात सर्वच माता आपापल्या मुलांवर निरतिशय, निःस्वार्थी आणि निष्काम प्रेम करत असतात, त्यांच्या भल्यासाठी झटत असतात आणि त्यांच्या भल्याचा विचार करत असतात. त्यांच्या हातून ही भक्ती आपोआप होत जाते; म्हणून या जगामध्ये सर्वांना आईचे महत्त्व पटलेले आहे. अनेक कवींनी आईवर सुंदर काव्ये केली आहेत. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,
लेकुराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥ १ ॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविणा प्रीती ॥ २ ॥
पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥ ३ ॥
तुका म्हणे माझें । तुम्हां संतावरी ओझे ॥ ४ ॥
– संत तुकाराम महाराज
कवीवर्य फ.मुं. शिंदे म्हणतात,
आई खरंच काय असते ?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही !
‘संत ज्ञानेश्वर’ या हिंदी चित्रपटात एक अतिशय सुंदर आणि विषयाला समर्पक, असे गाणे आहे.
ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो ।
राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो ॥ धृ. ॥
जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला ।
जो निर्धन है, जो निर्बल है, वह है प्रभु का प्यारा ।
प्यार के मोती लुटाते चलो ॥ १ ॥
आशा टूटी, ममता रूठी, छूट गया है किनारा ।
बंद करो मत द्वार दया का दे दो कुछ तो सहारा ।
दीप दया का, जलाते चलो ॥ २ ॥
छाया है चारो ओर अंधेरा, भटक गई हैं दिशाएं ।
मानव बन बैठा है दानव, किसको व्यथा सुनाएं ।
धरती को स्वर्ग बनाते चलो ॥ ३ ॥
प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘याच वात्सल्याने यशोदेने कृष्णाला आपलेसे करून घेतले. कृष्णाची वात्सल्यभक्ती केली.’
२ उ २. मधुराभक्ती : ‘ईश्वराला प्रियकर आणि स्वतःला प्रेयसी मानून केल्या जाणार्या भक्तीच्या प्रकारास ‘मधुरा’ किंवा ‘उज्ज्वला’ भक्ती’, असे म्हणतात. विविध भक्तांनी अपत्य, बंधू, सखा, दास इत्यादी प्रकारे ईश्वराशी आपले नाते जोडले आहे; परंतु पती-पत् ‘या मधुराभक्तीनेच अनेक गोपींनी कृष्णाला आपलेसे करून घेतले आणि स्वतःचा उद्धार करून घेतला’, असे प.पू. कलावतीआई म्हणतात.
२ उ ३. सख्यभक्ती : ‘कृष्ण आणि अर्जुन’, ‘कृष्ण आणि सुदामा’, ही सख्यभक्तीची फार सुंदर उदाहरणे प.पू. कलावतीआईंनी दिलेली आहेत. अर्जुनाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने भर समरांगणात त्याला दिव्य दृष्टी देऊन स्वत:चे भव्य दिव्य रूप दाखवले. त्याला भगवद़्गीतेचे कथन केले. आज भगवद़्गीता पूर्ण जगात वाचली जाते. तिच्यातील तत्त्वज्ञान अनुसरले जाते. सुदामा आणि कृष्ण हे एकाच पाठशाळेमध्ये शिकत होते. तेव्हापासून ते मित्र होते. नंतरसुद्धा सुदामा आणि कृष्ण यांनी त्यांची मैत्री अबाधित अन् अखंडित ठेवली. सुदाम्याच्या हातचे पोहेसुद्धा कृष्णाने अतिशय आवडीने आणि प्रसन्नतेने खाल्ले. त्याने सुदामाची नगरी सोन्याची करून टाकली.
२ उ ३ अ. संतांच्या सहवासाचे महत्त्व
१. आपल्याला जरी कृष्णाचा सहवास मिळाला नाही, तरी संतांचा सहवास नक्की मिळतो. संतांच्या सहवासामध्ये आपल्याला सात्त्विकतेचा मोठा लाभ होतो. आपल्या मनातील सर्व दुर्गुण हळूहळू न्यून होत जाऊन नाहीसे होतात. संतांच्या अमृत दृष्टीने आपले शरीर आणि मन पवित्र होते; म्हणून संतांचा सहवास कायम ठेवावा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपली गुरुभक्तीसुद्धा करत रहावी.
‘सेवाधर्म’ हा जगात पुष्कळ श्रेष्ठ आहे. ‘कुणाचा दास होणे आणि त्याची मनोभावे सेवा करणे’, यातूनसुद्धा आपले हित होऊ शकते. हे हनुमंताने रामाची मनोभावे सेवा करून दाखवून दिले. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ – मनाचे श्लोक, श्लोक ८
अर्थ : हे मना, तू आयुष्यभर चंदनाप्रमाणे इतरांच्या हिताची कार्ये करण्यात तुझा देह झिजव आणि सज्जनांच्या हृदयाला समाधान दे.
२. बाळाप्पा, चोळाप्पा, चिपळूणचे गोपाळराव केळकर, स्वामीसुत हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या समवेत राहिले. त्यांनी स्वामी समर्थांची मनोभावे सेवा केली. त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना या भवसागरातून पार केले.
३. शेगावच्या श्री गजानन महाराजांनी त्यांच्या समवेत रहाणार्या बंकटलालचेसुद्धा भले केले.
४. गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, पुण्याचे शंकर महाराज यांच्या संगतीत जे जे भक्त राहिले, त्या सर्वांच्याच आयुष्याचे या सत्पुरुषांनी सोने केले. त्यांनी भक्तांना आत्मस्वरूपाचे ज्ञान करून दिले.
२ उ ४. विरोधीभक्ती : शत्रू म्हणून का होईना, कंसाने सतत कृष्णाची आठवण ठेवली. तो श्रीकृष्णाचे नाम जपत राहिला; म्हणून कृष्णाने त्याचा उद्धार केला, तसेच रावण सतत रामाची आठवण काढत राहिला. ‘राम, राम’, हे नाम त्याच्या मनातून कधीही पुसले गेले नाही; म्हणून शेवटी रामाने रावणाला मुक्ती दिली. ही झाली विरोधीभक्ती !
म्हणून प.पू. कलावतीआई आपल्या भक्तांना सांगतात, ‘तुम्हीसुद्धा देवाशी आपले नाते जोडा. देवाची सतत आठवण काढा. देवाला स्मरून इतरांची सेवा करत रहा. संतांचा सहवास मिळवा, म्हणजे तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल आणि शांती, सुख अन् समाधान मिळेल. तुमचे जीवन सफल होईल.’
– पू. किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२१.८.२०२३)