गायीचे महत्त्व आणि तिची उपयुक्‍तता !

९ नोव्‍हेंबर या दिवशी ‘वसुबारस’ आहे. त्‍या निमित्ताने…

आमचे प्राचीन ग्रंथ गायीच्‍या महिम्‍याने भरलेले आहेत. सारांश रूपाने त्‍याचे वर्णन या लेखात दिले आहे. गोमाता सर्वोत्तम श्रद्धेचे केंद्र अन् भारतीय संस्‍कृतीची आधारशिला आहे. ‘माता रुद्राणां दुहिता वसूनां स्‍वसादित्‍यानाममृतस्‍य नाभिः ।’ (ऋग्‍वेद, मंडल ८, सूक्‍त १०१, ऋचा १५) म्‍हणजे ‘गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्‍या, आदित्‍यांची बहिण आणि अमृताची नाभी आहे.’

वसुबारसच्‍या दिवशी गोपूजन, म्‍हणजेच मातृत्‍वाचे पूजन !

गोवत्‍स द्वादशीला ‘वसुबारस’ म्‍हणतात. हे एक नैमित्तिक आणि कृतज्ञता व्रत आहे. दीपावलीपूर्वी ते करावयाचे असते. या दिवशी गायीची आणि तिच्‍या वत्‍साची पूजा करण्‍याची प्रथा आहे. प्राचीन काळापासून गायीला पवित्र आणि गोमाता मानून तिची पूजा केली जाते. श्रीकृष्‍ण आणि राजा दिलीप यांनीही गायीची अनन्‍यभावाने सेवा अन् पूजा केली होती. गोपालनामुळे श्रीकृष्‍ण गोपाळ झाले. भारत हा ऋषी अन् कृषिवल (शेतकरी) यांचा देश. दोघांनाही गोमाता आवश्‍यक. गायीचे दूध बल आणि बुद्धी वाढवते; म्‍हणून ती ऋषींना आवश्‍यक. शेतनांगरासाठी बैल आणि शेणखतासाठी गाय उपयुक्‍त. भारतात गायी ‘गोधन’ म्‍हणून ओळखल्‍या जातात. आरोग्‍य, बल आणि ऐश्‍वर्य यांसाठी गाय अतिशय उपयुक्‍त आहे. तिचा वत्‍स कृषीवलांचा आधारस्‍तंभ आहे. या दिवशीचे गोपूजन हे मातृत्‍वाचे पूजन आहे. मातृत्‍वापेक्षा श्रेष्‍ठ या जगात काहीही नाही.

गोदान हे अत्‍यंत श्रेष्‍ठ प्रकारचे दान समजले जाते. ‘ज्‍याचे घरी गाय, तिथे विठ्ठलाचे पाय’, असे जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज म्‍हणतात. वसुुबारस या दिवशी सुवासिनी एक वेळचे भोजन करतात. सायंकाळी दिवेलागणीला सवत्‍स धेनूची, म्‍हणजे गायीची आणि तिच्‍या वासराची पूजा करून तिची मनोभावे प्रार्थना करतात. या दिवशी स्‍त्रिया तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी गायीचे दूध, दही, ताक, लोणी वर्ज्‍य असते. दिवसभर उपवास केला जातो. कांडलेले, कुटलेले, चिरलेले, कापलेले पदार्थ खायचे नसतात. बाजरीची भाकरी खाऊन पारणे फेडले जाते. बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी यांचा गायीला नैवेद्य दाखवला जातो. ‘वसुबारसच्‍या व्रतामुळे आपल्‍या घरात सुख-समृद्धी येते’, अशी भारतियांची श्रद्धा आहे.

–  प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)

१. गायीमध्‍ये ३३ कोटी देवतांचा वास असणे

भारतीय शास्‍त्रानुसार गायीमध्‍ये ३३ कोटी देवतांचा वास आहे.

सर्वे देवाः स्‍थिता देहे सर्वदेवमयी हि गौः ।
पृष्‍ठे ब्रह्मा गले विष्‍णुर्मुखे रुद्रः प्रतिष्‍ठितः ॥

अर्थ : गोमाता सर्वदेवमयी आहे. गायीच्‍या देहात सर्व देवता वास करतात. तिच्‍या पाठीवर ब्रह्मा, कंठात विष्‍णु आणि मुखामध्‍ये शिवाचा वास असतो.

म्‍हणूनच संपूर्ण ३३ कोटी देवतांचे षोडशोपचार अथवा पंचोपचार पूजन करावयाचे असेल, तर केवळ एका गोमातेचे पूजन आणि तिची सेवा केल्‍याने सर्व देवीदेवतांचे पूजन होते.

२. महाभारतकारांनी गायीची केलेली स्‍तुती

महाभारतकारांनी गायीची स्‍तुती करतांना म्‍हटले आहे, ‘मातरः सर्वभूतानां गावः सर्वसुखप्रदाः ।’ (महाभारत, पर्व १३, अध्‍याय ६८, श्‍लोक ७), म्‍हणजे ‘सर्व सुखे प्रदान करणार्‍या गायी सर्व प्राणिमात्रांच्‍या माता आहेत.’ ‘गाव: श्रेष्‍ठाः पवित्राश्‍च पावनं ह्येतदुत्तमम् ।’ (महाभारत, पर्व १३, अध्‍याय ८२, श्‍लोक ३), म्‍हणजे ‘गायी या श्रेष्‍ठ आणि पवित्र आहेत, त्‍या पवित्र वस्‍तूंमध्‍ये सर्वश्रेष्‍ठ आहेत.’

‘ऋते दधिघृतेनेह न यज्ञः सम्‍प्रवर्तते ।’ (महाभारत, पर्व १३, अध्‍याय ८२, श्‍लोक २), म्‍हणजे ‘गायीचे दही आणि तूप यांखेरीज कोणताही यज्ञ होऊ शकत नाही.’ ‘गावो लक्ष्म्‍याः सदा मूलं गोषु पाप्‍मा न विद्यते ।’ (महाभारत, पर्व १३, अध्‍याय ५१, श्‍लोक २८), म्‍हणजे ‘गायींमध्‍ये लक्ष्मीचा वास असतो, गायींचे अस्‍तित्‍व असलेल्‍या ठिकाणी पाप राहू शकत नाही.’

गायीला सर्व प्राणिमात्रांची माता, तसेच गोवंशाला अर्थशास्‍त्राचा मूलाधार असल्‍याचे निश्‍चित केले आहे. महाभारतकारांनी असेही म्‍हटले आहे, ‘गोधनं राष्‍ट्रवर्धनम् ।’ (महाभारत, पर्व ४, अध्‍याय ३३, श्‍लोक १०), म्‍हणजे ‘गोधन हे राष्‍ट्र समृद्ध करणारे आहे.’ प्राचीन काळामध्‍ये ज्‍याच्‍याकडे सर्वाधिक गायी असतील, तो सर्वांत श्रीमंत समजला जायचा.

३. गायीला वंदन करण्‍याच्‍या परंपरेमागील कारण

यज्ञामध्‍ये गायीच्‍या तुपाच्‍या आहुत्‍या दिल्‍या जातात. त्‍यामुळे सूर्यकिरण पुष्‍ट होतात. किरण पुष्‍ट झाल्‍यामुळे पाऊस पडतो आणि पावसामुळे सर्व प्रकारचे अन्‍न, धान्‍य, वृक्ष गवत इत्‍यादींची निर्मिती होते. त्‍यामुळे संपूर्ण प्राणिमात्रांचे पोषण होते. अशा सर्वोपयोगी, सर्वदा आणि सर्वकाळी उपयोगी असणार्‍या गायीला वंदन करण्‍याची परंपरा आहे.

त्‍वं माता सर्वदेवानां त्‍वं च यज्ञस्‍य कारणम् ।
त्‍वं तीर्थं सर्वतीर्थानां नमस्‍तेऽस्‍तु सदाऽनघे ॥

अर्थ : हे निष्‍पाप गोमाते, तू सर्व देवतांची माता आहेस, यज्ञाची आधारभूत आहेस. सर्व तीर्थांची तू तीर्थरूपा आहेस. तू तुला आमचे वारंवार प्रणाम असोत.

४. देशाची परंपरा आणि संस्‍कृतीची प्रतिके

गाय, गंगा, गीता, गायत्री आणि गुरु ही आमच्‍या देशाची प्राचीन काळापासूनच परंपरा अन् संस्‍कृतीची प्रतिके आहेत. ही पाचही प्रतिके आमच्‍या देहप्राणात वसलेली आहेत.

अ. गायीचे दूध आमच्‍या देह आणि मन यांना पुष्‍ट करते.

आ. गंगा आमचा देह आणि मन यांना निर्मळ करते.

इ. गीता आम्‍हाला जीवनाचा खरा उद्देश, तसेच सार्थक जीवन जगण्‍याची कला शिकवते.

ई. गायत्री मंत्र सूर्योपासनेचा मंत्र आहे. भगवान सूर्य हा सर्व प्राणिमात्रांचा, तसेच वनस्‍पतींच्‍या जीवनाचा उगम आहे.

उ. गुरु पदोपदी आम्‍हाला ज्ञानप्रकाश देतात आणि आमचे बोट धरून मार्गदर्शन करतात.

५. गायीचे योगदान

अ. गाय ही धर्म आणि मोक्ष यांचा आधार आहे.

आ. गाय आमच्‍या आरोग्‍याचा आधार आहे.

इ. गाय आमच्‍या आर्थिक समृद्धीचा मुख्‍य उगम आहे.

६. सात्त्विक, पचायला सोपे आणि परिपूर्ण भोजन असणारे गायीचे दूध

गायीचे दूध हे आईच्‍या दुधाच्‍या खालोखाल चांगले पचणारे आणि परिपूर्ण भोजन आहे. गायीच्‍या दुधामध्‍ये खनिजे, जीवनसत्त्वे वगैरे भरपूर प्रमाणात असतात की, जी भोजनामध्‍ये आवश्‍यक समजली जातात. एखादा मनुष्‍य स्‍वतःचे संपूर्ण आयुष्‍य गायीच्‍या दुधावर काढू शकतो आणि स्‍वतःला निरोगी राखू शकतो. गायीच्‍या दुधामधे साय अल्‍प असते. गायीचे दूध एवढे संतुलित असते की, मानवी शरिराला अनुकूल आणि पचन क्रियेमध्‍ये उपयोगी ठरणारे, तसेच शरिराच्‍या इंद्रियांना उत्तम स्निग्‍धता अन् दृढता देऊ शकणारे असते. त्‍याच्‍या या सहज पचणार्‍या गुणधर्मामुळेच गायीचे दूध गर्भवती माता, बालके आणि वृद्ध यांनाही अत्‍यंत उपयुक्‍त असते. नुकत्‍याच जन्‍मलेल्‍या अर्भकाला आईच्‍या दुधानंतर जर कुठला पर्याय असेल, तर तो आहे गायीचे दूध ! या दुधामध्‍ये आईच्‍या दुधातील सर्व गुण असतात. गायीच्‍या दुधात क्षार अधिक प्रमाणात असल्‍यामुळे, तसेच पाचक रसांचा पुरेसा अंतर्भाव असल्‍याने लहान मुलाची कोमल पाचक इंद्रिये ते सहज पचवू शकतात.

गायीचे दूध जेवढे सात्त्विक असते, तेवढे इतर कोणतेच दूध नसते. गायीचे दूध सेवन केल्‍याने बुद्धी तीक्ष्ण होण्‍यासह स्‍वभाव शांत आणि सौम्‍य होतो. मानसिक तणावाने ग्रस्‍त असलेल्‍या रोग्‍यांना, तसेच हृदयविकार असणार्‍यांना गायीचे दूध आणि तूप अत्‍यंत उपयुक्‍त असते. गायीचे दूध शारीरिक आरोग्‍यासह मानसिक आणि आध्‍यात्‍मिक आरोग्‍याचा स्रोत आहे. म्‍हशीच्‍या दुधापासून अधिक प्रमाणात तूप प्राप्‍त होत असते; पण ते सात्त्विक नसल्‍याकारणाने शरीर स्‍थूल बनण्‍यासह बुद्धीलाही ते जड बनवते. बकरीचे दूध निरोगी करणारे आणि पचायला हलके असते; परंतु ते गायीच्‍या दुधाप्रमाणे बुद्धीवर्धक आणि सात्त्विक गुणांची वाढ करणारे नसते.

७. गायीचे बहुउपयोगी शेण

हे मल नसून मलशोधक आहे. गायीचे शेण आणि गोमूत्र एवढे पवित्र असते की, गायीच्‍या शेणामध्‍ये लक्ष्मीचा, तर गोमूत्रामध्‍ये गंगेचा निवास असल्‍याचे मानले जाते. प्राण्‍यांमध्‍ये गाय हा एकच असा प्राणी आहे की, ज्‍याचे उच्‍छिष्‍ट मल नसून ते मलशोधक आहे. ज्‍या शेतामध्‍ये गायीच्‍या शेणापासून सिद्ध केलेले खत वापरले जाते, त्‍या शेतात उगवलेल्‍या पिकांवर वेगळी कीटकनाशके फवारण्‍याची आवश्‍यकता भासत नाही, असे म्‍हटले जाते.

यज्ञवेदींना पवित्र करण्‍यासाठी, तसेच रहात्‍या घरांना प्रदूषणमुक्‍त करण्‍यासाठी सहस्रो वर्षांपासून आपल्‍या देशामध्‍ये गायीच्‍या शेणाने सारवण्‍याची परंपरा आहे. गायीच्‍या शेणाने सारवण्‍याने केवळ प्रदूषणापासूनच नव्‍हे, तर आण्‍विक विकिरणांपासूनही संरक्षण होते.

इंधन म्‍हणून वापरल्‍यानंतर जी राख शिल्लक रहाते, तीही एक उत्तम मलशोधक आहे. इतर मळांची दुर्गंधी दूर करण्‍यासाठी, शौचालयामध्‍ये, तसेच केरकचर्‍यांच्‍या ढिगार्‍यांवर गायीच्‍या गोवर्‍यांची राख शिंपडतात. भांडी घासण्‍यासाठी ही राख प्रदूषणरहित स्‍वच्‍छ करणारी भुकटी आहे.

८. अद़्‍भुत औषध असलेले गोमूत्र !

यामध्‍ये जिवाणूंचा नाश करण्‍याचे अद़्‍भुत सामर्थ्‍य आहे. हे एक अद़्‍भुत औषध आहे. आयुर्वेदामध्‍ये अनेक रोगांवर गोमूत्राचा उपयोग औषध म्‍हणून सांगितलेला आहे. हृदयविकार, कावीळ, रक्‍तदाब, मधुमेह यांसारख्‍या रोगांवर तर हे विशेष गुणकारी आहे. काही लोक गोमूत्रमिश्रित गोळ्‍या सिद्ध करून अनेक रोगांवर त्‍यांचे सेवन करतात. असे असले, तरी ते वैद्यांच्‍या मार्गदर्शनाने सेवन करणे हितावह आहे.

९. पंचगव्‍य

गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या सर्वांचे एका विशिष्‍ट प्रमाणामध्‍ये मिश्रण केल्‍यास पंचगव्‍य बनते. आयुर्वेदामध्‍ये असे म्‍हटले आहे की, पंचगव्‍याचे सेवन केल्‍याने मानवाच्‍या अनेक व्‍याधींचे निवारण होते.

गायीचे महत्त्व आणि तिची उपयुक्‍तता बघता तिची सेवा अन् तिचे रक्षण करणे, हे आपले आद्यकर्तव्‍य आहे.

– श्री. मनोहरराव झोडे

(साभार : मासिक ‘आध्‍यात्मिक ॐ चैतन्‍य’, दिवाळी विशेषांक २००८)