महिलांवरील आक्षेपार्ह विधानावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून क्षमायाचना !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – मी क्षमा मागतो. मी माझे शब्द परत घेतो. मी जे बोललो ते चुकीचे असेल किंवा माझ्यामुळे काही जण दुखावले असतील, तर मी क्षमा मागतो. माझ्या विधानावर कुणी टीका करत असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी स्वतःची निंदा करतो. यानंतरही माझ्यावर कुणी टीका केली, तर मी त्याचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणाविषयी केलेल्या एका आक्षेपार्ह विधानावरून क्षमा मागितली. नितीश कुमार यांनी विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही हात जोडून क्षमा मागितली. नितीश कुमार म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणानंतर लोकसंख्येच्या वाढीमध्ये होणारे पालट सांगणे एवढेच माझे उद्दिष्ट होते.

विधानसभेत नितीश कुमार क्षमा मागत असतांना भाजपच्या आमदारांनी गदारोळ चालू केला. त्यांनी सभागृहातील खुर्च्या उचलल्या. गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

बिहार विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ७ नोव्हेंबर या दिवशी मांडण्यात आलेल्या जात-आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालावरील चर्चेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तर देत होते. त्यांचे म्हणणे होते की, जर महिला शिक्षित असतील, तर प्रजनन दर अल्प होईल. या वेळी नितीश कुमार यांनी पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांविषयी विधान केले. त्याद्वारे नितीश कुमार यांना सांगायचे होते की, सुशिक्षित पत्नी गर्भधारणेची शक्यता टाळते. त्यामुळे जन्मदर घटला आहे; मात्र त्यांचे शब्द आक्षेपार्ह  होते. यामुळे त्यांच्या विधानावर टीका होऊ लागली. विधान परिषदेतील भाजपच्या महिला सदस्या निवेदिता सिंह या नितीश कुमार यांच्या विधानावर रडू लागल्या. त्या म्हणाल्या की, आज आम्हाला लाज वाटली.

क्षमा मागणे, हा उपाय नाही ! – राष्ट्रीय महिला आयोग

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, विधानसभेत नितीश कुमार यांनी ज्या प्रकारचे विधान केले ते ‘सी ग्रेड’ चित्रपटातील संवादासारखे वाटत होते. त्यांनी विधानसभेतील सर्व महिला आणि पुरुष यांच्यासमोर हे विधान केले अन् सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे तेथे बसलेले लोक हसत होते. त्यांनी आज क्षमा मागितली आहे; पण नुसती क्षमा मागणे, हा उपाय नाही. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधात पाऊल उचलले पाहिजे.

भाजप नेते सुशील मोदी म्हणाले की, नितीश कुमार यांनी क्षमा मागितली असली, तरी संपूर्ण बिहारला लाज आणली आहे. असे वक्तव्य करण्याचे त्यांचे धाडस कसे झाले ? त्यांनी केवळ क्षमा मागून चालणार नाही, सर्व महिलांसमोर हात जोडून उभे राहिले पाहिजे.