सिंधुदुर्ग : अनधिकृत बांधकामांवरील पक्षपाती कारवाईच्या विरोधात मालवण येथे समुद्रात बेमुदत उपोषण !

मालवण समुद्र किनार्‍यावरील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचे प्रकरण

प्रशासनाच्या पक्षपाती भूमिकेच्या विरोधात येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर (वर्तुळातील) भर समुद्रात उपोषण करतांना (चित्र सौजन्य : लोकमत)

मालवण : येथील समुद्र किनार्‍यावर असलेले माझे घर अनधिकृत ठरवत प्रशासनाने पाडले; मात्र याच वेळी अन्य ६७ बांधकामांनाही ती अवैध असल्याचे सांगत ७ दिवसांची नोटीस दिली होती; परंतु या नोटिसीला ७ दिवस उलटून गेले असूनही त्या बांधकामांवर प्रशासनाने कारवाई केली नाही, असे सांगत प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी ७ नोव्हेंबरपासून येथील समुद्रात उपोषणास प्रारंभ केला आहे.

पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर

दामोदर तोडणकर यांनी जिल्हा आणि तालुका प्रशासन, तसेच महसूल, बंदर विभाग आणि पोलीस प्रशासन यांना याविषयी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मालवण बंदर जेटी येथे मी आणि माझे कुटुंबीय गेली अनेक वर्षांपासून रहात असलेले निवास स्वरूपातील बांधकाम अतिक्रमण असल्याचे सांगत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रादेशिक बंदर अधिकार्‍यांच्या नोटिसीनंतर युद्धपातळीवर पाडण्यात आले, तसेच याठिकाणी असलेली झाडेही तोडण्यात आली. बंदर विभाग अथवा प्रशासन यंत्रणा यांनी माझ्या बांधकामाचे प्रकरण न्यायालयात असतांनाही तोडले, तशी कारवाई अन्य बांधकामांवरही होणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.