देवस्थान समितीच्या २ गटांमधील वादाचा परिणाम !
पणजी : धुळापी, खोर्ली येथे श्री सातेरी रवळनाथ देवस्थान आहे. देवस्थान समितीने जुने बांधकाम पाडून त्या जागी नवीन बांधकाम केल्यावर देवस्थान समितीतील दुसरा गट न्यायालयात गेला होता. दुसर्या गटाच्या याचिकेवर निकाल देतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने देवस्थान समितीने केलेले नूतन बांधकाम ३ मासांच्या आत पाडण्याचा आदेश दिला आहे.
दुसर्या गटाने नवीन बांधकाम अवैध असल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले, तर नवीन बांधकाम केलेल्या गटाला बांधकाम वैध असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात अपयश आले. विरोध करणार्यांच्या मते नवीन बांधकाम करतांना त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. नवीन बांधकाम केल्यानंतर मार्च २०२३ मध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करतांना दोन गटांमधील वाद पुन्हा उफाळून आला होता आणि त्या वेळी ‘न्यायालयाचा निवाडा येत नाही, तोपर्यंत मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना न करता ती मंडपातच ठेवावी’, असा निर्णय प्रशासनाने घेतला होता. नवीन बांधकाम पाडण्याचा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष भिकू धुळापकर यांच्याकडूनच घेण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.