देहलीतील प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना फटकारले !
नवी देहली – सरकार काय करणार ? कसे करणार ? याच्याशी आमचा संबंध नाही. आमचे म्हणणे आहे पेंढा जाळणे बंद झाले पाहिजे. यावर्षी यात केवळ ४० टक्के घट होऊन काहीच उपयोग नाही, तर ते संपूर्ण थांबले पाहिजे. देहलीच्या प्रदूषणाची समस्या कायम राहू शकत नाही. आता सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे. जर आम्ही बुलडोजर चालवण्यास प्रारंभ केला, तर थांबणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना देहलीतील वायू प्रदूषणाविषयी फटकारले. या वेळी न्यायालयाने पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांना तातडीने पेंढा जाळण्याची प्रक्रिया थांबवण्याचा आदेश दिला.
सौजन्य आजतक
प्रदूषणावरून प्रत्येक वेळी राजकारण नको !
सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारतांना म्हटले की, शेतात पेंढा जाळण्याचे प्रमाण अल्प करण्याच्या संदर्भात वारंवार चर्चा आणि आश्वासने दिली जात आहेत; पण कुठे झाली आहे घट ? गेल्या काही वर्षांत केवळ एक पालट झाला आहे. अचानक तुम्ही या सगळ्याचा आळ दुसर्या राज्यांवर घेऊ लागले आहात. प्रत्येक वेळी या सूत्रावर राजकारण केले जाऊ शकत नाही. वर्षानुवर्षं देहलीला याच अडचणींचा सामना करू देता येणार नाही. आम्ही हे म्हणत नाही आहोत की, पेंढा जाळल्यामुळेच देहलीत प्रदूषण होते; पण देहलीच्या प्रदूषणात भर टाकणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. सातत्याने वाढणार्या प्रदूषणाचा देहलीतील मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
या वेळी ‘पेंढा जाळल्यामुळे निर्माण होणारी समस्या काही दिवसांपुरतीच असते’, असे सांगत पंजाब सरकारच्या अधिवक्त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावर न्यायालयाने ‘त्या विशिष्ट वेळी हे होते. त्यामुळे ही विशिष्ट वेळ हे एक छोटा सूत्र आहे; पण त्याचे गांभीर्य दिसत नाही’, असे म्हटले.
संपादकीय भूमिकागेंड्याच्या कातडीच्या सरकारांवर अशा फटकारण्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि जनतेला जीवघेण्या प्रदूषणाला प्रतिवर्षी सामोरे जावे लागणार. त्यामुळे न्यायालयाने स्वतः यावर जातीने लक्ष देऊन प्रदूषण संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते ! |