बीड येथील जाळपोळीमधील मुख्‍य सूत्रधार शोधणे आवश्‍यक ! – धनंजय मुंडे, पालकमंत्री

पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड – बीड शहरातील जाळपोळीच्‍या घटनेला जो कुणी उत्तरदायी असेल, त्‍याला शिक्षा झाली पाहिजे. देशाला स्‍वातंत्र्य मिळवतांना स्‍वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांची घरे कधी जाळली नव्‍हती. बीड येथील जाळपोळीच्‍या घटनेत अगदी सायबरपर्यंत जाऊन यातील मुख्‍य सूत्रधार शोधणे आवश्‍यक आहे. पालकमंत्री या नात्‍याने मुख्‍यमंत्री आणि दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडे जाळपोळीच्‍या घटनेची विशेष अन्‍वेषण पथका’च्‍या (‘एस्.आय.टी.’द्वारे) वतीने चौकशी करण्‍याची मागणी करणार आहे, अशी माहिती जिल्‍ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ५ नोव्‍हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

पालकमंत्री मुंडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्‍हाप्रमुख सचिन मुळूक, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र मस्‍के यांचे कार्यालय आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्‍या संस्‍था कार्यालयाला भेट दिली, तसेच आमदार संदीप क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्‍या घराची पहाणी करून जाळपोळीच्‍या घटनेची माहिती घेतली. त्‍यानंतर तेे म्‍हणाले की, मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठीच्‍या हिंसक आंदोलनात बीड शहरात ११ ठिकाणी जाळपोळीच्‍या घटना घडल्‍या. आजपर्यंत बीड जिल्‍ह्याच्‍या आणि राज्‍याच्‍या इतिहासात अशा घटना घडल्‍या नाहीत. एका दूरभाषच्‍या अर्थाचा अनर्थ काढून बीड जिल्‍हा पेटवण्‍याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला. तो यापूर्वी कधीही झाला नाही. माजलगाव आणि बीड येथील घटना पहाता यामध्‍ये फार मोठे षड्‍यंत्र दिसून येत आहे.

घटना पूर्वनियोजित होती !

बीड आणि माजलगाव येथील राजकीय नेत्‍यांच्‍या घरावर ज्‍या समाजकंटकांना आक्रमणे करायची होती, त्‍यांना नेत्‍यांच्‍या घराचे क्रमांक दिले होते. पहारी, हातोडे, पेट्रोल बाँब, स्‍कूटीचे टायर यांचा वापर जाळपोळीत करण्‍यात आला. हे आक्रमण पूर्वनियोजित होते, याचीही चौकशी झाली पाहिजे.