तुर्कीयेच्या इंसर्लिक हवाईतळावर पॅलेस्टिनी समर्थकांचे आक्रमण !

अंकारा (तुर्कीये) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर तुर्कीयेची कट्टरतावादी संघटना ‘इन्सानी यार्दिम वक्फी’ हिने दक्षिण तुर्कीयेमधील इंसर्लिक हवाईतळावर आक्रमण केले. संघटनेने पॅलेस्टिनी समर्थकांना सैन्यतळाच्या बाहेर एकत्र केले. या वेळी या हवाईतळावर अमेरिकी सैनिकही उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी ठेवलेले अडथळे (बॅरिकेड्स) पाडले. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष झाला. हिंसक आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच त्यांच्यावर पाण्याचा माराही केला. यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले. या वेळी ‘इन्सानी यार्दिम वक्फी’चे अध्यक्ष बुलेंट यिल्डिरिम यांनी पोलिसांवर आक्रमण न करण्याचे आवाहन केले. या हवाईतळाचा वापर सीरिया आणि इराक येथील इस्लामिक स्टेटशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीमेचा भाग म्हणून केला जातो.