यश आणि मानसिक स्वास्थ्य यांचा समतोल राखण्यासाठी शिक्षणात अध्यात्माचा समावेश होणे अत्यावश्यक !

१. वरकरणी समृद्ध आणि विकसनशील दिसणारे वातावरण तणाव अन् दबाव यांनी भरलेले असणे

‘सध्याच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जगात यशस्वी होण्याचे मूल्य चुकवावे लागते. आपण प्रगती किंवा उत्कर्ष साध्य करत असतांना ‘प्रावीण्य आणि कर्तृत्व यांचे समीकरण प्रचंड ताण अन् चिंता’, असे झाले आहे. एका शैक्षणिक संस्थेला अलीकडेच दिलेल्या भेटीत मला हे प्रकर्षाने जाणवले. या संस्थेत मी काही वर्षांपूर्वी वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (Neet-UG) सिद्धता करण्यासाठी प्रवेश घेतला होता. एका दशकानंतर मला याच संस्थेत पुन्हा जाण्याचा योग आला. संस्थेची भव्य इमारत, पावलापावलावर असलेले सुरक्षा रक्षक आणि प्रचंड संख्येने असलेला विद्यार्थ्यांचा ओघ, असा त्या वातावरणातील लक्षणीय पालट पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. संस्थेतील गजबजलेल्या मार्गिकेवरून जात असतांना शिक्षक (अध्यापकवर्ग) आणि गणवेशधारी विद्यार्थी यांना पाहून तेथील वातावरण शिस्तबद्ध अन् शिष्टाचारयुक्त असल्याचे दिसत होते; परंतु वरकरणी समृद्ध आणि विकसनशील दिसणारे हे वातावरण ‘तणाव अन् दबाव यांनी भरलेले आहे’, असे मला वाटले.

२. शिक्षणाचे पालटलेले स्वरूप

गेल्या दशकात शिक्षणव्यवस्थेत पुष्कळ पालट झाला आहे. शिक्षणसंस्था झपाट्याने वाढल्या असून या संस्था विद्यार्थ्यांची संख्या अधिकाअधिक वाढवत आहेत आणि मूलभूत सुविधांचा विस्तारही करत आहेत; मात्र या विकासाचे मूल्य चुकवावे लागत आहे. शिक्षणातील स्पर्धा वाढल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावरील ताण वाढतच आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी चाललेले हे प्रयत्न कौतुकास्पद असले, तरी त्यामुळे मानसिक आरोग्य आणि एकूणच स्वास्थ्य यांवर होणारे दुष्परिणाम दुर्लक्षित केले जाऊ शकत नाहीत.

३. विद्यार्थ्यांवर असलेले यशाचे ओझे

आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा

३ अ. विद्यार्थ्यांमध्ये यश मिळवण्याची धडपड आणि अपयशाची भीती अन् शिक्षकांमधील उणावलेला उत्साह स्पष्ट दिसणे : या भेटीत मी काही साहाय्य करू शकले नसले, तरी संस्थेवर पुष्कळ ताण असल्याचे माझ्या लक्षात आले. विद्यार्थ्यांमध्ये यश मिळवण्याची धडपड आणि अपयशाची भीती स्पष्ट दिसत होती. १० वर्षांपूर्वी मला ज्या शिक्षकांनी शिकवले, त्या काही शिक्षकांशी मी बोलले. त्यांपैकी पूर्वी अत्यंत उत्साही आणि आनंदी असणार्‍या एका शिक्षकांना भेटल्यावर मला त्यांच्या वागण्यात पुष्कळ पालट जाणवला. ते गंभीर आणि शांत दिसत होते. हे शिक्षक गेली १८ वर्षे या संस्थेत शिकवत आहेत. ‘शिकवण्यातील उत्साह टिकवून ठेवणे, हे शिक्षकांसमोरील आव्हान आहे’, असे त्यांनी मला सांगितले. प्रतिदिन वर्गात जाणे, शिकवणे आणि नंतर निघून येणे, हे काही कालावधीनंतर सवयीचे अन् कंटाळवाणे बनते. त्यामुळे शिकवण्याचा उत्साह उणावत जातो. एकेकाळी त्यांच्या शिकवण्याला चालना देणारी त्यांच्यातील उत्कटता हळूहळू नीरसतेत परावर्तित झाली आहे.

३ आ. शिक्षकांना आर्थिक यश मिळत असूनही शांती आणि आनंद न मिळणे : शिक्षकांमध्ये शिकवण्याचे कौशल्य आणि समर्पण असूनही ते सतत वाढत जाणार्‍या शैक्षणिक गुणवत्तेची पूर्तता करण्यासाठी चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळले असल्याचे दिसून आले. यांना आर्थिक यश मिळत असूनही शांती आणि आनंद मिळत नाही, हे पाहून मला पुष्कळ वाईट वाटले. आजच्या स्पर्धात्मक जगात मानसिक स्थिरता आणि आनंद मिळवणे, यांविषयी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

४. अध्यात्माची शिक्षणातील भूमिका

प्रचंड तणावात असणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांना खर्‍या अर्थाने साहाय्य करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात अध्यात्माचा समावेश करून शिक्षणाला एक नवीन अर्थ प्राप्त करून देणे क्रमप्राप्त बनले आहे. प्रचंड ताण आणि स्पर्धा असलेल्या या क्षेत्राचा कायापालट अध्यात्मामुळे होऊ शकतो. अध्यात्मामुळे आत्मचिंतन, सजगता आणि मानसिक बुद्धीमत्ता (स्वतःच्या भावना हाताळता येण्याची आणि इतरांच्या भावना जाणण्याची क्षमता) वाढण्यास साहाय्य होईल. अध्यात्माचा शिक्षणातील समावेश, ही काळाची आवश्यकता आहे. अध्यात्माचा शिक्षणात समावेश केल्याने व्यक्तीमधील सुप्त गुणांचा पुढीलप्रमाणे अनेक प्रकारे विकासही होईल.

४ अ. ताण न्यून होऊन शांत आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण होणे : विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या प्रतिदिनच्या दिनचर्येमध्ये ध्यानधारणा, दीर्घ श्‍वसन, नामजप (हा प्रत्येकाने स्वतःच्या पंथानुसार करावा.) आणि योगाभ्यास यांचा समावेश केल्यास ताण न्यून होईल, तसेच शांत आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.

४ आ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर रहाणे : विद्यार्थ्यांना अध्यात्मातील ‘प्रारब्ध’ आणि ‘कर्मसिद्धांत’ या संकल्पनांची ओळख करून दिल्यास ‘त्यांना काही प्रसंग अन् घटना आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत’, याची जाणीव होईल. यशस्वी होण्याचा प्रवास हा अडचणी आणि आव्हाने यांनी भरलेला असतो. आध्यात्मिक शिक्षणामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांना प्रतिकूल परिस्थितीतही स्थिर रहाता येईल. ते अपयशातून सावरून पुढे जातील, तसेच त्यांना देवाच्या कृपेची दैवी अनुभूती घेता येईल. अध्यात्मामुळे जीवनाकडे पहाण्याचा एक परिपक्व आणि समाधानी दृष्टीकोन विकसित होईल.

४ इ. जीवनाच्या खर्‍या ध्येयाची जाणीव होणे : अध्यात्मामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास होईल आणि त्यांना स्वतःच्या जीवनातील मूल्यांना धरून ध्येय निश्‍चित करता येईल. ‘शैक्षणिक यशाच्या पलीकडेही काहीतरी साध्य करायचे आहे’, याची जाणीव झाल्यामुळे त्यांच्या जीवनात अधिक समाधान निर्माण होईल.

४ ई. सद्सद्विवेकबुद्धीचा विकास होऊन सूज्ञ निर्णय घेता येणे : अध्यात्मामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात दायित्व घेण्याची भावना निर्माण होईल. यामुळे ते सूज्ञ (योग्य) निर्णय घेऊ शकतील. त्याचप्रमाणे त्यांना इतरांशी सहानुभूतीने अन् प्रेमाने वागण्याचे सामर्थ्य मिळेल.

५. शिक्षणाचे अध्यात्मीकरण कसे करावे ?

५ अ. प्रतिदिन शालेय अभ्यासक्रमात ध्यानधारणा, दीर्घ श्‍वसन, नामजप इत्यादी समाविष्ट करणे, तसेच भावनिक स्वास्थ्य आणि आत्म-जागृती यांविषयी चर्चा करण्यासाठी वेळ देणे आवश्यक ! : शिक्षणक्षेत्रात अध्यात्माचा समावेश अत्यंत विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. प्रतिदिन शालेय अभ्यासक्रमात ध्यानधारणा, दीर्घ श्‍वसन, नामजप (प्रत्येकाने स्वतःच्या पंथानुसार करावा) आणि योगाभ्यास समाविष्ट केल्याने, तसेच भावनिक स्वास्थ्य आणि आत्म-जागृती यांविषयी चर्चा करण्यासाठी वेळ दिल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा लक्षणीय प्रभाव पडेल. व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे तिचे जीवन तणावपूर्ण बनते आणि त्यामुळे तिच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक क्षमतेच्या विकासात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे व्यक्तीमधील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी तिला नियमित सूचनासत्रे करण्याचे महत्त्व सांगणेही आवश्यक आहे. या व्यतिरिक्त शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना महत्त्व देऊन त्यांना पाठिंबा देणारे सर्वसमावेशक वातावरण निर्माण झाल्यास पुष्कळ पालट घडून येतील.

५ आ. अध्यात्माचा अंगीकार करून त्यातील ‘प्रारब्ध’, ‘कर्मसिद्धांत’ आणि ‘जीवनाचा उद्देश’ या संकल्पनांचा अंतर्भाव केल्यास शैक्षणिक वातावरणात पालट घडवून आणता येईल ! : संस्थेतून निघतांना माझे मन संमिश्र भावनांनी भरलेले होते. एकीकडे संस्थेचा लक्षणीय विकास आणि प्रगती दिसत होती; परंतु दुसर्‍या बाजूला तणावग्रस्त विद्यार्थी अन् निराश शिक्षक पाहून ‘तेथे परिवर्तनाची अत्यंत आवश्यकता आहे’, याची मला जाणीवही होत होती. अध्यात्माचा अंगीकार करून त्यातील ‘प्रारब्ध’, ‘कर्मसिद्धांत’ आणि ‘जीवनाचा उद्देश’ या संकल्पनांचा अंतर्भाव केल्यास शैक्षणिक वातावरणात पालट घडवून आणता येईल. परिणामी तेथे मानसिक स्थिरता, आनंद आणि ध्येयनिष्ठता निर्माण करता येईल. शैक्षणिक यश आणि वैयक्तिक आनंद यांचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शैक्षणिक संस्थांनी ‘केवळ चांगले गुण मिळवणे’ हा यशाचा मापदंड नाही’, हे लक्षात घेऊन प्रत्येक कृती विद्यार्थी आणि शिक्षक यांना समाधान मिळण्याच्या दृष्टीकोनातून कृती करायला हवी.’

– आधुनिक वैद्या (त्वचारोगतज्ञ) (कु.) श्रिया साहा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), कोलकाता, बंगाल. (२४.७.२०२३)

सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात ! – डॉ. पूजा, कस्तुरबा विद्यानिकेतन, धोरी (झारखंड)

सनातन हिंदु धर्माचे शिक्षण आणि आचरण केलेली मुले आत्मबळाने युक्त असतात. अशी मुले निराशेची शिकार होत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉन्व्हेंट व्यतिरिक्त अनेक शाळांमध्ये इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे शिकवली जाते. आमच्या देशभरातील विद्याभारती शाळांमध्ये हा प्रयत्न चालू आहे.