(इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतियांना तेथून सुखरूप परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम म्हणजे ‘ऑपरेशन अजय’ !)
‘७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी जेव्हा इस्रायलमधील लोक ‘सुकोत’ सणाचा शेवटचा दिवस साजरा करत होते, त्या दिवशी सकाळी ६ वाजता गाझा पट्टीकडील इस्रायल सीमेचे कुंपण तोडून मोटरसायकल्स, जीप्स, ‘पॅराग्लायडर्स’मधून, तसेच समुद्रमार्गे ‘हमास’चे सहस्रो आतंकवादी इस्रायलच्या हद्दीत घुसले आणि गाझा सीमेजवळील छोट्या छोट्या इस्रायली गावांमध्ये त्यांनी मृत्यूचे तांडव केले. गाझा सीमेनजीकच्या वाळवंटात सुकोतनिमित्त जो संगीत महोत्सव चालू होता, त्या महोत्सवातही घुसून आतंकवाद्यांनी नृशंस गोळीबार केला, अनेकांना ठार मारले, लहान मुलांना जिवंत जाळले, तरुणांचे गळे कापले. ओलीस ठेवण्यासाठी लहान मुले, स्त्रिया आणि वयस्कर लोक यांचे अपहरण केले. अनेक स्त्रियांवर अमानुष बलात्कार केले. या सगळ्याने इस्रायलमधील सगळेच प्रचंड धक्क्यामध्ये आहेत. जेव्हा तिथे इस्रायली संरक्षण दल पोचले, तेव्हा या आक्रमणाची भयानकता आणि व्याप्ती लक्षात आली. बरेच मृतदेह मिळाले; पण ते ओळख न पटण्याच्या अवस्थेतील होते. यात किमान १ सहस्र ४०० इस्रायली मारले गेले, तर ३ सहस्रांहून अधिक घायाळ झाले आहेत. किमान १ सहस्र ५०० जणांची बेपत्ता म्हणून नोंद झालेली आहे. इतक्या सगळ्यांवर अंत्यसंस्कार शक्य नाही; म्हणून हे सर्व मृतदेह लाल समुद्राजवळील वाळवंटात एकाच वेळी एकावर एक ठेवून पुरले.
१. भूमध्य समुद्रात युद्ध भडकण्याची शक्यता
हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलने तात्काळ हमास आणि पॅलेस्टाईन यांच्या विरुद्ध अधिकृत युद्धाची घोषणा केली अन् गाझा पट्टीमध्ये रॉकेट, तसेच विविध प्रकारे आक्रमणाला प्रत्युत्तर देणे चालू केले आहे. जगभरात कामानिमित्त विखुरलेल्या तरुण इस्रायली पुरुषांनी युद्धासाठी देशाच्या लष्करात सहभागी होण्यासाठी मायदेशी, म्हणजेच इस्रायलमध्ये परतण्यास प्रारंभ केला. उत्तरेकडून हिजबुल्ला लॅबेनॉनमधून आक्रमण करण्यास उत्सुक आहे. हमास आणि हिजबुल्ला या दोघांनाही इराणचा पूर्ण पाठिंबा आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध चालू झालेलेच आहे; पण यात हिजबुल्ला उतरले, तर अमेरिका इस्रायलच्या बाजूने उतरणार, हे नक्की. एकूणच इस्रायल आणि अरब देश यांच्यात भूमध्य समुद्रातील युद्ध कधीही भडकू शकते, अशी परिस्थिती आहे.
२. भारताने राबवलेली ‘ऑपरेशन अजय’ मोहीम
इस्रायलमध्ये सहस्रो भारतीय विविध कारणांनी रहात आहेत. त्यातील बरेचसे इस्रायली विद्यापिठांत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, त्यांची कुटुंबे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, हिर्याचे व्यापारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि शुश्रुषा कर्मचारी, भारतीय दूतावासातील कर्मचारी अन् त्यांचे कुटुंबीय इत्यादी असे जवळजवळ १८ सहस्र भारतीय नागरिक या अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत. अजून संपूर्ण युद्ध चालू झालेले नसल्याने ‘ज्यांना भारतात परत यावे, असे वाटत आहे’, अशांसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तेल अविवमधील भारतीय दूतावासाच्या साहाय्याने या नागरिकांना इस्रायलमधून सुखरूप परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ चालू केले.
त्या अंतर्गत सर्वप्रथम दूतावासाच्या वतीने इस्रायलमधील सगळ्या भारतीय पारपत्रधारकांना (पासपोर्ट) परतण्यासाठी स्वतःची नावे नोंदणी करण्यास सांगितले. एकूण किती नागरिक परत येऊ इच्छितात ? याचा अंदाज घेऊन प्रारंभीला ४ चार्टर्ड विमानांची सोय केलेली होती; पण आवश्यकतेनुसार ५ वे विमानही वापरले गेले. १८ ऑक्टोबरपर्यंत १ सहस्र १८० हून अधिक भारतीय आणि काही नेपाळी नागरिक यांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यात आले आहे. आतापर्यंत भारताने ‘ऑपरेशन गंगा’ (अफगाणिस्तान-तालिबान युद्धाच्या वेळी राबवलेली मोहीम) आणि ऑपरेशन ‘कावेरी’ (युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी राबवलेली मोहीम) या त्या त्या देशांतून भारतियांना मायदेशी परत आणण्यासाठी यशस्वीरित्या राबवलेल्या मोहिमा (ऑपरेशन्स) आहेत. ‘ऑपरेशन गंगा’ आणि ‘ऑपरेशन कावेरी’ या मोहिमा सगळ्यात अधिक अवघड होत्या; कारण तिथे पूर्णपणे युद्ध चालू झालेले होते; पण इस्रायलमधील परिस्थिती अजूनही आटोक्यात आहे. त्यामुळे भारत सरकारला भारतीय नागरिकांना सुरक्षित हालवण्यासाठी वेळ मिळाला.
३. इस्रायलमध्ये आलेले अनुभव
माझा इस्रायलमधील एकूणच अनुभव असा आहे की, तेल अविवमधील भारतीय दूतावास पुष्कळ चांगले सहकार्य करतो. त्यासह इस्रायलमध्ये त्यांची यंत्रणाच इतकी परिणामकारकरित्या काम करत असते की, भारतीय नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची तेच मुळात काळजी घेतात. यातच गाझा पट्टीजवळच्या एका किबुत्समध्ये ‘केअर टेकर’ म्हणून काम करणार्या केरळमधील सविता आणि मीरा या दोघींच्या शौर्याची कहाणी समजली. हमासचे आतंकवादी किबुत्समध्ये घुसल्यानंतर या दोघी ज्या घरात होत्या, त्या घराच्या दिशेने ते आले, तर दोघींनी स्वतःची सर्व शक्ती पणाला लावून घराचा दरवाजा उघडू दिला नाही. शेवटी आतंकवाद्यांना वाटले असेल की, घरात कुणीच नाही आणि म्हणून ते पुढे गेले असावेत. या दोघींनी स्वत:चा आणि त्यांच्या वृद्ध रुग्णाचाही जीव वाचवला. बेपत्ता असलेल्यांमध्ये काही भारतीय आणि नेपाळी नावेही आहेत. नक्की किती लोक गेले ? बाकीचे सगळे तपशील हळूहळू मिळतीलच. ज्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत येण्याची इच्छा आहे, त्यांना भारत सरकार ‘ऑपरेशन अजय’च्या अंतर्गत परत आणण्याची सुविधा आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत चालू ठेवेलच; पण असेही अनेक भारतीय आहेत, जे आपल्या इस्रायली मित्रांवर संकट आलेले असतांना त्यांना सोडून परत येऊ इच्छित नाहीत.
कदाचित् मी तिथे असते, तर परत यायचे कि नाही ? याचा मी १० वेळा विचार केला असता. ‘या परिस्थितीतून इस्रायल लवकर बाहेर पडो’, अशी आपण सगळेच प्रार्थना करूया.’
– डॉ. अपर्णा लळिंगकर (साभार : साप्ताहिकक ‘विवेक, २१.१०.२०२३)