जगातील तथाकथित नेते गाझातील नरसंहाराचे समर्थन करत आहेत  ! – प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा थयथयाट !

प्रियांका गांधी

नवी देहली – गाझामध्ये ५ सहस्राहून अधिक मुलांसह सुमारे १० सहस्र लोकांची हत्या करण्यात आली आहे. हे अत्यंत लज्जास्पद आणि भयानक आहे. रुग्णालये आणि रुग्णवाहिका यांवर बाँब फेकले, निर्वासितांच्या छावण्यांवर आक्रमणे करण्यात आली, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. (या ठिकाणी हमासचे आतंकवादी लपून कारवाया करत असल्यानेच इस्रायल येथे आक्रमणे केली आहेत. इस्रायलने आक्रमणापूर्वीच उत्तर गाझातील लोकांना दक्षिण गाझामध्ये जाण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ते न ऐकल्याने त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत, हे जगजाहीर असतांना प्रियांका गांधी त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !- संपादक) हे सर्व होत असतांना जगातील तथाकथित नेते नरसंहाराचे समर्थन करत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित युद्धविराम अमलात आणावा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून केले आहे.

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या अलिप्ततेवरून प्रियांका वाड्रा यांनी केली होती टीका !

यापूर्वी प्रियांका वाड्रा यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत गाझाच्या शांततेसाठी झालेल्या मतदानापासून भारताने स्वतःला दूर ठेवल्यावरून टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, भारताच्या या वृत्तीचे आश्‍चर्य वाटत आहे. शांततेसाठी झालेल्या मतदानापासून दूर रहाणे म्हणजे अहिंसा, न्याय आणि शांतता, या तत्त्वांना नाकारणे आहे. (या प्रस्तावामध्ये हमासच्या आक्रमणाचा कुठेही उल्लेख नव्हता, त्यामुळेच भारत यापासून अलिप्त राहिला. मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतर ब्राह्मणांचा आणि इंदिर गांधी यांच्या हत्येनंतर शिखांचा नरसंहार करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी शांततेच्या, अहिंसेच्या बाता मारणे म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ सारखेच आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • ‘जगभरातील इस्लामी नेते इस्रायलच्या दीड सहस्र नागरिकांच्या हत्यांविषयी, हमासने पकडलेल्या ओलिसांविषयी मौन बाळगून का आहेत ?’, असे प्रियांका गांधी का विचारत नाहीत ?
  • हमासने इस्रायलवर आक्रमण करून त्याच्या दीड सहस्र लोकांना ठार केल्यानंतर (यात मुले, महिला आणि वृद्ध होते) इस्रायलने हमासच्या विरोधात कारवाई चालू केली. या कारवाईच्या विरोधात हमासने गाझामधील निरपराध नागरिकांना ढाल म्हणून पुढे केले आहे आणि ते या आक्रमणात ठार होत आहेत. जर या निरपराध्यांविषयी प्रियांका गांधी यांना पुळका असेल, तर त्यांनी हमासला खडसावणे आवश्यक आहे !
  • हमासने २४० ओलिसांना पकडून ठेवले आहे. त्यांची सुटका करण्यास तो सिद्ध नाही. या ओलिसांमध्ये मुले, महिला आणि वृद्ध यांचा समावेश आहे. याविषयी प्रियांका गांधी तोंड का उघडत नाहीत ?