आश्रमातील संत आणि सहसाधक यांच्या समवेत अनौपचारिक बोलतांना साधनेविषयी शिकायला मिळालेले प्रेरणादायी सूत्र !
‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसादाच्या वेळी संत आणि सहसाधक यांच्या समवेत साधनेविषयी अनौपचारिक बोलतांना मला पुष्कळ शिकायला मिळते. त्यातून मला साधना आणि सेवा करण्यास प्रेरणा मिळते.
अ. खोलीत आलेल्या साधकाला खाऊ दिल्यावर त्याची ताटली धुण्याची सेवा करण्यात आनंद असल्याचा विचार मनात येणे : ‘आश्रमातील खोलीमध्ये माझ्याकडे आलेल्या एका साधकाला मी एका लहान ताटलीत खाऊ दिला. त्यानंतर मी त्यांना ताटली न धुता तशीच ठेवण्यास सांगितली; परंतु त्यांनी ताटली स्वतःच धुऊन स्वच्छ केली. ही कृती शिष्टाचार, तारतम्य आणि व्यावहारिक दृष्टीने योग्य आहे; परंतु ‘मला ती सेवा मिळाली असती, तर अधिक आनंद मिळाला असता’, असे वाटले; कारण श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगून जगभरातील भक्तांना आनंद देऊन त्यांचा उद्धार केला, तरीही सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी श्रीकृष्णाने संत एकनाथ महाराज यांच्या घरी श्रीखंड्या होऊन चाकरी केली, खरकट्या पत्रावळी उचलल्या, अर्जुनाच्या रथाचे घोडे धुतले इत्यादी केले.
आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले श्रीकृष्णासारखीच त्यांच्या भक्तांची सेवा करत असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना भगवद्गीतेप्रमाणे ‘गुरुकृपायोग’ सांगून साधकांचा उद्धार केला आहे, तरीही ते सत्सेवेतील आनंद घेण्यासाठी साधकांच्या प्रत्येक अडीअडचणीत स्थूल, तसेच सूक्ष्म रूपात धावून येऊन साहाय्य करतात. ‘ते श्रीकृष्णासारखीच भक्ताची सेवा करतात’, असे मला वाटते. जो श्रीखंड्या होऊ शकतो, तोच श्रीकृष्ण असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे तसेच आहे. यावरून श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांचे ईश्वरत्व मला जाणवले. त्यांनीच मला स्वतःच्या उदाहरणातून सत्सेवेतील आनंद शिकवला. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे समष्टी संत, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१२.२०२२)
|